तृतीय नेत्र पिंड : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध, (२) तृतीय नेत्र पिंड, (३) पुच्छक केंद्रक, (४) थॅलॅमस, (५) निमस्तिष्काचा भाग, (६) ऊर्ध्वस्थ उन्नतांग.

तृतीय नेत्र पिंड : मेंदूतील तिसऱ्या मस्तिष्क विवराच्या (मेंदूतील पोकळीच्या) छतावर किंचित पुढे आलेल्या लहान फुगवटीला तृतीय नेत्र पिंड (किंवा ग्रंथी) म्हणतात. स्फीनोडॉन या प्राचीन कालीन सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यामध्ये या पिंडाचा भाग डोक्यावर डोळ्यासारखा, भिंग व जालपटलयुक्त असल्यावरून मानवातील या भागाला हे नाव पडले आहे. हा पिंड पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत प्रायः आढळतो. पक्ष्यांमध्ये हा पिंड लहान असतो शिंशुकात (पॉरपॉइजमध्ये) सूक्ष्म तर कोंबड्या, शिशुधान (ज्यांच्या पोटावर पिलू ठेवण्यासाठी पिशवीसारखी संरचना असते असे) प्राणी, कृंतक (कुरतडणारे) प्राणी, खुरी प्राणी व मानव यांत सापेक्षतः मोठा असतो. मानवातील हा पिंड भ्रूणातील अग्रमस्तिष्काच्या छतातील ⇨पोष ग्रंथी तयार होणाऱ्या भागापासून तयार होतो. लहान शंक्वाकार लालसर–करड्या रंगाचा हा पिंड दोन्ही ऊर्ध्वस्थ उन्नतांगांच्या (मध्यमेंदूच्या पृष्ठभागावर असणाऱ्या दोन उंचवट्यांच्या) बेचक्यात असतो. त्याची लांबी केवळ ८ मिमी. असून तळभाग शरीराच्या पुढच्या भागाकडे असतो. देठ पांढऱ्या ऊतकाचा (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) बनलेला असून त्याच्या अग्रभागाचे विभाग होऊन त्यामध्ये तिसऱ्या मस्तिष्क विवराचा भाग असतो.

पिंडाचा गाभा गोलाकार कोशिकांचा (पेशींचा) बनलेला असून जन्मवेळी त्यामध्ये अल्प तंत्रिका (मज्जा) कोशिका व तंत्रिका श्लेष्मकोशिका [→ तंत्रिका तंत्र] असतात. संयोजी (जोडणाऱ्या) ऊतक कोशिका व तंतू वयाच्या पहिल्या वर्षात उत्पन्न होतात. हळूहळू पिंडामध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) होत जाते. सातव्या वर्षानंतर कॅल्शियमाचे लहान खडे नेहमीच आढळतात. म्हणून या वयानंतर घेतलेल्या डोक्याच्या क्ष–किरण चित्रामध्ये पिंडाचे स्थान व त्यावरून मेंदूच्या इतर भागांचे स्थान निश्चित करता येते.

तृतीय नेत्र पिंडाच्या कार्याबाबत अद्याप निश्चित माहिती झालेली नाही. या पिंडाच्या मेलॅटोनीन (इंडॉल या द्रव्याचे संयुग) नावाच्या स्रावामुळे उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या) प्राण्यांच्या जनन तंत्रात, मेंदूत, स्त्रीमदचक्रात तसेच त्वचेतील रंगद्रव्ययुक्त कोशिकांत बदल घडून येत असावा, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. या पिंडाची अर्बुदे (कोशिकांच्या विकृत वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) नेत्रगोल पक्षाघात, जलशीर्ष (कवटीतील अंतर्दाब वाढून मस्तिष्क–मेरुद्रवाचे प्रमाण वाढणे), कालपूर्व लैंगिक वाढ यांना कारणीभूत होतात [→ तंत्रिका तंत्र].

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.