व्हिट्गेन्श्टाइन, लूटव्हिख योझेफ योहान : (२६ एप्रिल १८८९–२९ एप्रिल १९५१). विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ. जन्माने तो ऑस्ट्रियन असला, तरी त्याने आपली सारी हयात केंब्रिज विद्यापीठात प्रथम विद्यार्थी म्हणून आणि नंतर प्राध्यापक म्हणून इंग्लंडमध्ये व्यतीत केली. तो व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील एका श्रीमंत कुटुंबात जन्मला. प्रारंभी त्याने अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यानंतर विमानविद्येच्या (एअरोनॉटिक्स) अभ्यासासाठी तो १९०८ साली मँचेस्टर येथे गेला. अभ्यासकाळातच गणितीय तत्त्वज्ञानामध्ये रस उत्पन्न झाल्यामुळे त्याने १९११ साली जर्मन गणितज्ञ ⇨ गोटलोप फ्रेगची गाठ घेतली. फ्रेगच्या सूचनेनूसार केंब्रीज येथे ⇨ बर्ट्रंड रसेल याचा विद्यार्थी म्हणून त्याने दोन वर्षे अध्ययन केले (१९१२-१३). १९१४मध्ये पहिल्या महायुद्धाच्या आरंभी तो ऑस्ट्रियन सैन्यात दाखल झाला. या काळात त्याने तार्किकीय तत्त्वज्ञानावर ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिक्स हा प्रबंध लिहिला. १९२१ साली तो जर्मन व इंग्लिश भाषांमध्ये प्रकाशित झाला आणि एक महान तत्त्वज्ञ म्हणून तो एकदम प्रसिद्धीस आला.
तत्त्वज्ञानातील सर्व प्रमेये सुटली आहेत असे त्याचे मत असल्यामुळे त्याने तत्त्वज्ञानाला रामराम ठोकला आणि पुढील दहा वर्षे लहान मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून घालविली. या काळात त्याचा व्हिएन्ना येथील प्रसिद्ध व्हिएन्ना मंडळाशी परिचय झाला. तेथे मंडळाचे काही सदस्य आणि विशेषतः केंब्रीज येथील ⇨ फ्रँक प्लम्टन रॅम्झी या तरुण तत्त्वज्ञाच्या आग्रहावरून तो १९३९ साली केंब्रीज येथे आला आणि लवकरच तेथे प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. १९४७मध्ये प्राध्यापकीचा राजीनामा देईपर्यंत तो तेथे होता. १९५१मध्ये कर्करोगाने त्याचे निधन झाले.
व्हिट्गेन्श्टाइनची तत्त्वज्ञानात्मक कारकीर्द अतिशय आश्चर्यकारक आहे. तिचे दोन कालखंडांत विभाजन करण्याची रीत आहे. व्हिट्गेन्श्टाइन –१ (१९१२ ते १९२१) आणि व्हिट्गेन्श्टाइन – २ (१९३९ ते १९५१). या दोन कालखंडांत त्याने दोन स्वतंत्र आणि अत्यंत महत्त्वाची तत्त्वज्ञाने निर्माण केली. पहिल्या कालखंडात त्याने ट्रॅक्टेटस् लॉजिको-फिलॉसॉफिक्स हा प्रबंध लिहिला आणि दुसऱ्या कालखंडात फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स ह्या ग्रंथाची मुद्रणप्रत तयार केली. या दुसऱ्या कालखंडात त्याने तत्त्वज्ञानाचे अनेक ग्रंथ रचले पण त्यांपैकी एक सोडून बाकी कुठलाही प्रकाशनयोग्य स्वरूपात येऊ शकला नाही. त्याला अपवाद फक्त फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स हा ग्रंथ होय. तो १९५३ मध्ये व्हिट्गेन्श्टाइनच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला. अन्य ६७ ग्रंथ यथावकाश १९६९ पर्यंत प्रसिद्ध झाले. हे ग्रंथ त्याची व्याख्यानांची टिपणे आणि विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेली टिपणे यांच्या आधारे तयार करण्यात आले. सर्व ग्रंथ जर्मन आणि इंग्लिश अशा दोन भाषांत छापलेले आहेत.
या दोन्ही कालखंडात व्हिट्गेन्श्टाइनचा प्रधान विषय भाषेचा आशय आणि सीमा हा होता. प्रामुख्याने भाषा या विषयात त्याला जन्मभर रस होता. पहिल्या पुस्तकात म्हणजे, ट्रॅक्टेटस···मध्ये, भाषेकडे केवळ प्रतिनिधानाचे माध्यम म्हणून, म्हणजे जगात वस्तूंचा विन्यास कसा असतो, हे सांगण्याचे माध्यम म्हणून तो पाहतो. असे प्रतिनिधान शक्य होण्याकरिता जग आणि भाषा यांचे स्वरूप काय असावे लागेल, हे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न करतो : जग हे वास्तवांचे , वस्तुस्थितींचे साकल्य आहे. वास्तव्ये ही कमी-अधिक मिश्र असू शकतात. अधिक मिश्र वास्तवांचे विश्लेषण कमी मिश्र वास्तवांत करता येते, पण विश्लेषणाची सीमा म्हणजे पारमाण्विक वास्तवे त्यांच्याहून कमी मिश्र वास्तवे असू शकत नाहीत. जगातील सर्व मिश्र वास्तवे ही या अमिश्र वास्तवंच्या मिश्रणापासून निर्माण झालेली असतात. पारमाण्विक वास्तवे परस्परस्वतंत्र असली पाहिजेत म्हणजे एकाच्या अस्तित्वाने अन्य वास्तव्ये अशक्य होत नाहीत आणि एक वास्तव आहे म्हणून अन्य एखादे वास्तव असलेच पाहिजे असेही होत नाही. अशा असंख्य पारमाण्विक किंवा केवल वास्तवांच्या मिश्रणाची तऱ्हा रसेलच्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिकामधील सत्यताफलात्मक विधानांच्या तऱ्हेवर आधारलेली आहे. सत्यताफलात्मक विधान म्हणजे ज्याची सत्यासत्यता त्याच्या अवयवांच्या सत्यासत्यतेने पूर्णपणे ठरते असे विधान. केवल विधानांच्या विविध मिश्रणांनी मिश्र विधाने बनतात. ही विधाने आणि जगातील वास्तवे यांचा संबंध काय आहे? व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो की, त्यांचा संबंध चित्र आणि चित्रित वस्तू या स्वरूपाचा आहे. हीच व्हिट्गेन्श्टाइनची ट्रॅक्टेटस्…मधील सत्याची प्रसिद्ध ‘चित्र-उपपत्ती’ होय.
एखादे विधान वास्तवाचे चित्र आहे, याचा अर्थ त्या दोहोंमध्ये काहीतरी समान आहे. जसे भौतिक चित्रामध्ये चित्रित वस्तू आणि चित्र यांच्यात आवकाशिक रचनेचे साम्य असते किंवा एखादे गीत आणि त्याचे संगीतलेखन (नोटेशन) यांच्यात कालिक रचनेचे साम्य असते, तसेच साम्य एखादे वास्तव आणि त्याचे प्रतिनिधान करणारे सत्यविधान यांच्यात असते. हे साम्य म्हणजे तार्किकीय अवकाशातील आकाराचे. या संबंधात व्हिट्गेन्श्टाइन दाखविणे आणि भाषेत वर्णन करणे यांत भेद करतो. विधान आणि त्याचे तदनुरूप वास्तव यांच्यातील तार्किकीय आकाराचे साम्य आपण दाखवू शकतो पण भाषेत व्यक्त करू शकत नाही. कारण ते तार्किकीय आकाराचे साम्य आपण सांगू लागलो, तर ते वर्णन सत्य होण्याकरिता तार्किकीय आकार आणि त्याचे वर्णन करणारे विधान ह्यांत तार्किकीय आकाराचे साम्य असावे लागेल, आणि ते प्रतिपादणारे विधानही सत्य होण्याकरिता फिरून तार्किकीय आकार समान असावा लागेल, आणि या बाबीला अंत नाही म्हणून दाखविता येतो, पण त्याचे भाषेत वर्णन करता येत नाही, असे व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो.
हे झाले प्रतिनिधान करणाऱ्या विधानासंबंधी, पण चित्र-उपपत्तीला काही स्पष्ट अपवाद आहेत. उदा. तर्कशास्त्रातील आणि गणितातील विधाने. त्यांना तुल्य अशी वास्तवे नसतात. खरे म्हणजे त्यांना सामान्य अर्थी विधाने म्हणणेही चूक आहे. व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो की, ही विधाने केवळ आकारिक आणि निराशय/आशयरहित असतात. त्यातील चिन्हांना कोणताही द्रव्यात्मक आशय नसतो. उदा. ‘प किंवा ~प’ या सूत्रात कोणतेही वास्तव प्रतिनिधान स्वरूपात नाही. व्हिट्गेन्श्टाइन निराशय आणि निरर्थक यांत भेद करतो. तार्किकीय विधाने निराशय असतात ती निरर्थक नसतात. तीच गोष्ट गणितीय समीकरणांची आहे. चित्र-उपपत्तीवर दुसरा आक्षेप आहे, तो खुद्द व्हिट्गेन्श्टाइनच्या ग्रंथातील विधानांच्या संदर्भात. उदा. ‘जग हे वास्तवांचे साकल्य आहे.’ यांसारखी विधाने म्हणजे जे सांगता येत नाही, पण फक्त दाखविता येते, ते व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून काटेकोर अर्थाने अशी विधाने निरर्थक आहेत, असे म्हणण्याचे प्रांजळ धैर्य व्हिट्गेन्श्टाइन दाखवितो. मात्र ही विधाने निरर्थक असली, तरी त्यांचे निरर्थकत्व हे मर्मदृष्टी देणारे आहे, असे तो म्हणतो कारण त्याचे चित्र आणि गीतांचे संगीतलेखन यांचे दृष्टान्त भाषा कशी व्यवहार करते, या विषयी वाचकाला दृष्टी देण्याकरिता आणि तिचा दुरुपयोग करण्यापासून रोखण्याकरिता मदत करू शकतात.
ट्रॅक्टेटस् ··· नंतर फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्सकडे नजर टाकल्यास या तत्त्वज्ञाने एक वेगळाच दृष्टीकोन स्वीकारल्याचे दिसते. पहिल्या पुस्तकातील ‘काही झाले तरी अमुक गोष्ट खरी असली पाहिजे.’ या वृत्तीऎवजी ‘खरी गोष्ट काय आहे, भाषा वापरणारे लोक काय करतात याचा काळजीपूर्वक वेध घेऊ या’, ही वृत्ती त्याने स्वीकारली आहे. भाषा सामाजिक साधन म्हणून वापरली जाते, याकडे त्याने लक्ष पुरविले आहे. चित्रदृष्टान्ताच्या जागी उपकरणे आणि खेळ हे दृष्टान्त वापरले आहेत. भाषेची तुलना आता सुताराच्या उपकरणाच्या पोतडी किंवा पेटीशी केली आहे. प्रत्येक उपकरणाचे कार्य वेगळे आहे, यावर आता भर आहे किंवा भाषेची तुलना खेळांशी केली आहे. प्रत्येक खेळाचे उद्देश वेगळे, त्याचे नियम वेगळे, यशापयशाचे निकष वेगळे. भाषेचे उपयोगही अनेक आहेत. भाषेचा कोणताही उपयोग हा अनेक खेळांपैकी एक म्हणून त्याकडे पाहावयास हवे. भाषेचा कोणताही उपयोग समजावून घेण्याकरिता खेळ खेळला जात आहे आणि त्याचे नियम आणि उद्देश काय आहेत, ते पाहावे लागते. भाषेतील प्रत्येक चाल खेळांच्या मैदानावरील किंवा पत्त्यांच्या टेबलावरील चालीसारखी एखाद्या खेळातील चाल असते आणि तिचे यशापयश किंवा अनुज्ञेयता आणि निषिद्धता त्यानुसार ठरवावी लागते.
पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वज्ञ सरलता आणि एकविधता हुडकताना दिसतात. त्यामुळे महत्त्वाच्या भेदांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. ट्रॅक्टेटस···मध्ये भाषेचे कार्य प्रतिनिधान, म्हणजे जगातील वस्तूंच्या विन्यासाचे वर्णन हे मानले होते पण भाषेची अनेक कार्ये आहेत. उदा. आज्ञा करणे, सल्ला देणे, विनंती करणे, मोजमाप करणे, गणना करणे, परस्परांबद्दल अगत्य दाखविणे इत्यादी. या भिन्न व्यापारांना व्हिट्गेन्श्टाइन भाषिक खेळ हे नाव देतो आणि अनेक खेळांचा मिळून एक जीवनप्रकार होतो. तत्त्वज्ञानात हे वैविध्य दुर्लक्षिले जाते आणि सामान्यीकरण व निष्कर्षण यांच्यामुळे अभ्यास विकृत होतो. जेव्हा तपशिलांकडे दुर्लक्ष होते, तेव्हा विधानांचे कार्यही दुर्लक्षिले जाते. अशा वेळी ‘भाषा सुटीवर जाते’ असे व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो. म्हणून पारंपरिक तत्त्वज्ञानातील उपपत्तींच्या ऎवजी तत्त्वज्ञानाला रुग्ण-चिकित्सेची गरज आहे. ही चिकित्सा म्हणजे शब्द प्रत्यक्ष जीवनात कसे वापरले जातात, याचे स्मरण देणारी उदाहरणे देणे. उदा. ‘मन’ हा शब्द प्रत्यक्ष कसा वापरला जातो, याची आठवण देणारी उदाहरणे देणे आवश्यक असते.
या कल्पनांचा उपयोग अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी पद्धतीने या ग्रंथातील मनोविषयक तत्त्वज्ञानात केला आहे. त्यात अंतर्निरीक्षण, वेदने, उद्दीष्टे, विश्वास हे व्यापार प्रत्यक्ष जीवनात कसे होतात, त्याचा वेध घेतला आहे. त्यांपैकी खाजगी किंवा आत्मगत भाषेचा युक्तिवाद उदाहरणादाखल संक्षिप्तपणे पुढीलप्रमाणे सांगता येण्यासारखा आहे.
आत्मगत भाषा म्हणजे जी भाषा फक्त एकाच माणसाला कळते आणि जी अन्य कोणालाच शिकविता येत नाही. व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो की, अशी भाषा अशक्य आहे, कारण आत्मगत भाषा निर्माणच होऊ शकणार नाही. सकृद्दर्शनी असे वाटेल की, अशी भाषा असू शकेल. उदा. आपल्या मनात वेळोवेळी उद्भवणाऱ्या वेदनांना नावे देऊन विचारात त्यांचा उपयोग करणे शक्य आहे, असे कोणी म्हणेल पण व्हिट्गेन्श्टाइन म्हणतो की, आपण एका वेदनाविषयी त्याच्याकरिता ठरविलेल्या नावाचा उपयोग करतो, याची शाश्वती काय आहे? आपल्याला वाटते की, आपण नावे ठरल्याप्रमाणे वापरीत आहोत पण इथे नावाचा उपयोग बिनचूक आहे असे वाटणे आणि तो खरोखर बिनचूक असणे, यांत फरक कसा करणार? एखादी भाषा वापरणारे अनेक लोक असतील, तरच असा भेद करणे शक्य आहे कारण भाषा हे सामाजिक व्यवहाराचे माध्यम आहे, आणि एखाद्याचा उपयोग चुकला, तर दुसरा तो दुरुस्त करू शकतो पण इथे तर ही भाषा जाणणारा एकच मनुष्य आहे. म्हणून आत्मगत भाषा सर्वथा अशक्य आहे.
आपण आपल्या मानसजीवनाविषयी बोलताना सामाजिक भाषाच वापरतो. हे कसे शक्य होते, याच्या परीक्षणावर व्हिट्गेन्श्टाइनने पुष्कळ लक्ष दिले आहे. त्या परीक्षणातून निष्पन्न होणारे मत हे मन आणि शरीर यांचा द्वैतवाद (⇨ रने देकार्तप्रणीत) आणि मेनेजर नाकारणारा वर्तनवाद या दोन्हींहून भिन्न आहे. आपण आपली वेदने वर्तनापासून स्वतंत्रपणे ओळखतो आणि नंतर उद्गमनाने मानसव्यापार आणि वर्तन यांच्यात अन्योन्यान्वय आहे हे अनुमानाने निश्चित करतो, हे सामान्य मत खरे नाही. वेदने ओळखणे बाह्य वर्तनावाचून अशक्य आहे पण त्याचबरोबर मनोव्यापार म्हणजे वर्तन नव्हे. वर्तनाने मनोव्यापार काय आहे हे निश्चित होते आणि नंतर वर्तनप्रकार मनोव्यापाराचा निकष बनतो. त्यामुळे इतरांचे मनोव्यापार (इच्छा, विचार इ.) आपण केवळ वर्तनावरून साम्यानुमानाने ओळखतो, हे खरे नव्हे.
संदर्भ : 1. Baker, G. P. Hacker, P. M. S. An Analytical Commentary on the Philosophical Investigations, Oxford, 1990.
2. Kenny, A. Wittgenstein, London, 1973.
3. McGuinness, B. Wittgenstein : A Life, Young Ludwig 1889-1921, London, 1988.
देशपांडे, दि. य.