हिस्टामीन : हिस्टिडीन या ॲमिनो अम्लाचा कार्बॉक्सिलनिरास होऊन हिस्टामीन या जैविक दृष्ट्या सक्रिय अमाइनाची निर्मिती होते. याचा प्रसार निसर्गात सर्वत्र असून ते प्राणी व वनस्पती यांच्या ऊतकांमध्ये तसेच कीटकांच्या विषारी द्रव्यांत आढळते. मानवात हिस्टामीन हे ⇨ शोथ प्रतिक्रियेचा मध्यस्थ म्हणून, तसेच जठरातील हायड्रोक्लोरिक अम्ल स्रवण क्रियेचा उद्दीपक म्हणून कार्य करते. 

 

हिस्टिडिनाची कार्बॉक्सिलनिरास विक्रिया
 

जास्तीत जास्त ऊतक-हिस्टामीन हे स्नेहकोशिकांत साठलेले आढळून येते. तेथून ते विविध उत्तेजकांमुळे मुक्त होते. एकदा ते मुक्त झाले की, त्यामुळे श्वसनिका, जठरांत्र व गर्भाशय यांच्या मऊ स्नायूंचे आकुंचन होणे, रक्तदाब कमी होणे अशा प्रकारचे वेगवेगळे शारीरिक परिणाम घडून येतात. हिस्टामिनाचा त्वचेत स्राव झाल्यास त्यामुळे खाज सुटणे, वाहिका-विस्फारामुळे चट्टे पडणे, ऊतकांमध्ये द्रावाची (द्रव किंवा वायू याची) गळती झाल्यामुळे उत्स्फोट निर्माण होणे इ. परिणाम आढळून येतात. 

 

हिस्टामिनाच्या या सर्व क्रिया सक्रिय असलेल्या क किंवा क हिस्टामीनग्राही मध्यस्थामुळे घडतात. हिस्टामीनरोधी औषधे हिस्टामीन व या ग्राहींच्या संयोगास प्रतिबंध करणारे परिणाम दाखवितात. 

 

ऊतकांना इजा झाल्यास, बाह्य वातावरणाचा प्रभाव (उदा., थंडी, दाब), अमली पदार्थाचे (उदा., हेरॉईन) अतिप्रमाणात सेवन आणि सर्वांत महत्त्वाचे प्रतिरक्षा तंत्रात घडलेला बदल हे हिस्टामीन मुक्त होण्यास कारणीभूत असू शकतात. काही प्रतिजने (उदा., परागकण) त्वचा, फुप्फुस, नासिकाद्वार, श्वसनमार्ग किंवा इतर भागांतील स्नेह कोशिकांना संवेदनशील असू शकतात आणि त्यामुळे हिस्टामीन आणि इतर जैविक दृष्ट्या सक्रिय असलेले पदार्थ मुक्त होतात. त्यावेळेस मुक्त झालेले हिस्टामीन वर नमूद केलेल्या स्नायूंचे आकुंचन, सर्दी, उत्स्फोट आणि साधारण सामान्यॲलर्जी सारखे परिणाम घडवून आणते. 

 

प्रथिन पदार्थ त्वचेखाली टोचले असता त्याविरुद्ध शरीरातील ऊतकांची प्रतिक्रिया होऊन त्या प्रथिन पदार्थाविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार होतात आणि ती ऊतकांत हिस्टामिनाशी संयोजी स्वरूपात साठून राहतात. १५–२० दिवसांनंतर तोच प्रथिन पदार्थ पुन्हा टोचल्यास ती प्रतिद्रव्ये ऊतकांतून एकदम मुक्त होतात. त्यामुळे हिस्टामीन एकाएकी सुटे होऊन ते रक्तावाटे शरीरभर पसरले तर गंभीर प्रतिक्रिया दिसून येते. या परिणामाला हिस्टामीनजन्य अवसाद, अधिहृषिकी किंवा तीव्र प्रत्यधी अवसाद असे म्हणतात. या परिणामामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत एपिनेफ्रिनाचा ताबडतोब वापर केल्यास हिस्टामीनरोधी क्रिया होऊन रुग्णाचा जीव वाचू शकतो. 

वाघ, नितिन भरत