हरिण खुरी : (गु. भिंत गलोडी, कानोडी इं. टोडफ्लॅक्स लॅ. लायनॅरिया रॅमोसिसिमा कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी (फिगवर्ट कुल). आधारापासून अनेक बारीक फांद्या असलेली ही एक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) लहान ओषधी असून तिचा आढळ सस.पासून १,२००–१,९०० मी. उंचीवर आहे. तिच्या उत्तर उष्ण कटिबंधात लायनॅरिया प्रजातीमध्ये १०० पेक्षा जास्त जाती आढळतात. त्यांपैकी काही तण असून इतर बागेमध्ये शोभेसाठी लावतात. तिचा प्रसार इथिओपिया, केन्या, सुदान इ. ठिकाणी झाला आहे. सिंध, अफगाणिस्तान व भारतात ती सर्वत्र खडकाळ जागी, पडक्या इमारती, बुरुज, तट इत्यादींच्या दगडी भिंतीतून वाढलेली आढळते.

हरिणखुरी वनस्पतीची उंची ३०–६० सेंमी. असते. पाने पातळ, साधी, एकाआड एक, विविध आकारांची, खालची त्रिकोणी, तोमराकृती व वरची शराकृती असून वृंत ४–१२ मिमी. लांब फुले लहान, पिवळी, बहुधा पानांच्या बगलेत, एकेकटी (सप्टेंबर – डिसेंबर) संवर्त पंचदली पुष्पमुकुट ३.५–११ मिमी. लांब, प्रपिंडीय, बाहेरून लोमश, द्य्वोष्ठक, शुंडिकायुक्त केसरदले ४, द्य्वोन्नत किंजपुटात दोन कप्पे व बीजके अनेक बोंड अनेकबीजी, गोलसर व फार लहान असते. बी ०.३–०.६ मिमी. लांब, काळसर ते तांबूस तपकिरी असून तिच्यावर बारीक काटे असतात.

हरिणखुरी वनस्पती मधुमेहावर उपयुक्त व ती पौष्टिक असून धातुक्षयावर आणि परम्यावर दूध व खडीसाखरेसोबत देतात. बागेमध्ये शोभेकरिता तिची लागवड बी लावून किंवा मूलक्षोडापासून करतात. तिचा प्रसारवेगाने होतो.

पहा : स्क्रोफ्यूलॅरिएसी.

परांडेकर, शं. आ.