सुरिनाम भेक : उभयचर प्राण्यांच्या पिपिडी कुलातील एक आदिम प्राणी. दक्षिण अमेरिकेतील ‘सुरिनाम’ येथे सर्वांत प्रथम सापडल्याने याला सुरिनाम भेक असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव पिपा पिपा असे आहे.

सुरिनाम

हा दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतरांगांच्या पूर्वेस आणि ॲमेझॉनच्या उत्तरेकडील प्रदेशांत जास्त आढळतो मात्र भारतीय उपखंडात आढळत नाही. हा पूर्णपणे जलवासी आहे. ह्याच्या शरीराची लांबी १८–२० सेंमी. असते. शरीर चपटे असून नाकावर आणि जबड्यांवर त्वचेच्या सैल घड्या पडलेल्या असतात. याच्या तोंडात जीभ व दात नसतात. डोळे अगदी बारीक असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संरक्षक आवरण नसते. पुढील पायांच्या बोटांच्या टोकाचा तारकाकृती आकार असतो. मागील पायाची बोटे खूप लांब व एकमेकांना पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. रंग काळसर उदी असून त्वचा खडबडीत असते. त्वचेत विषग्रंथी असतात.

सुरिनाम भेकच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजोत्पादनाच्या पद्घतीमुळे शास्त्रज्ञांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. नरामध्ये वेगळे मैथुनांग नसते. प्रजोत्पादनाच्या काळात मादीची त्वचा जाड आणि स्पंजासारखी सच्छिद्र होते. नर मादीच्या पाठीवर चढून तिला पायांनी आवळून धरतो. मादी आपला अवस्कर (मूत्र व जननमार्ग ज्यात उघडतात असा शरीराच्या पाठीमागच्या बाजूचा समाईक कोष्ठ) लांबवून तो पाठीवर आणते व त्यातून अंडी बाहेर येतात. मादी एका वेळी सु. १०० अंडी घालते. या अंड्यांवर नर आपले शुक्राणू सोडून त्यांचे फलन करतो. ही फलित अंडी नराच्या वजनामुळे मादीच्या पाठीवर एका थरात पसरतात व तिच्या त्वचेत रुतल्याप्रमाणे होतात. काही वेळातच मादीची त्वचा आणखी फुगून प्रत्येक अंड्याभोवती एक खळगा तयार होतो. यावेळी मादीची पाठ मधमाश्यांच्या पोळ्याच्या छेदाप्रमाणे दिसते. काही काळाने प्रत्येक खळग्यावर एक टणक शृंगी पदार्थांचे आवरण तयार होते.

मादीच्या पाठीवरच अंड्याचे डिंभांत (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेत) व डिंभाचे पिलात रुपांतरण होते. यासाठी सु. ८० दिवसांचा कालावधी लागतो.

पहा : भेक.

जोशी, लीना