व्हॅन व्ह् लेक, जॉन हॅसब्रूक : (१३ मार्च १८९९-२७ ऑक्टोबर १९८०). अमेरिकन गणितीय भौतिकीविज्ञ. त्यांनी चुंबकत्वाचा आधुनिक पुंजयामिकीय सिद्धांत [→ पुंजयामिकी] विकसित केला. १९७७ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक त्यांना फिलिप डब्ल्यू. अँडरसन आणि ⇨ सर नेव्हिल फ्रान्सिस मॉट यांच्याबरोबर विभागून मिळाले.

व्हॅन व्ह् लेक यांचा जन्म मिड्लटाउन (कनेक्टिकट) येथे झाला. त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून ए.बी.(१९२०) आणि हार्वर्ड विद्यापीठातून ए.एम. (१९२१) व पीएच.डी. (१९२२) या पदव्या संपादन केल्या. हार्वर्ड विद्यापीठात निदेशक म्हणून त्यांची अध्यापकीय कारकीर्द सुरू झाली व पुढे मिनेसोटा, हार्वर्ड, लायडन इ. विद्यापीठांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. व्हॅन व्ह् लेक यांनी चुंबकीय गुणधर्मांशी संबंधित असलेल्या रासायानिक बंधाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला [→ चुंबकत्व]. रेणवीय बंधाच्या स्फटिकीय क्षेत्र सिद्धांताचा विकास करण्यास त्यांनी हातभार लावला [→ संयुजा]. त्यांनी घन अवस्थेतील मुक्त रेणू व आयन (विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट) यांच्या वर्णपटाचा सिद्धांत, समचुंबकीय शिथिलीकरण सिद्धांत आणि ⇨ विरल मृत्तिका किंवा ⇨ संक्रमणी मूलद्रव्ये यांचे आयन असलेल्या घनांचे अनुस्पंद या विषयांमध्येसुद्धा संशोधन केले.

व्हॅन व्ह् लेक यांनी समचुंबकत्वाची पुंज सिद्धांतानुसार मीमांसा केली. या मीमांसेत अणू किंवा रेणूचे चुंबकीय परिबल अणूतील सर्व इलेक्ट्रॉनांच्या एकत्रित कोनीय संवेगांकावर अवलंबून असते [→ पुंज सिद्धांत]. लँथॅनाइड [अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ५७ ते ७१ असलेल्या मूलद्रव्यांच्या → आवर्त सारणी] आयनांच्या चुंबकीय परिबलांची सैद्धांतिक दृष्टीने मिळालेली मूल्ये आणि प्रयोगाद्वारे काढण्यात आलेली मूल्ये यांमध्ये त्यांना वैशिष्ट्यपूर्ण साम्य दिसून आले, हे या मीमांसेचे मोठे यश आहे. अणूच्या ४f कवचामधील [→ अणू व आणवीय संरचना ] अयुग्मित इलेक्ट्रॉनांमुळे लँथॅनाइडांमध्ये समचुंबकत्व आलेले आढळते. कारण हे इलेक्ट्रॉन अनन्य असे असून, त्यांच्यावर सभोवतालच्या ऋण आयनांच्या विद्युतक्षेत्रांचा फार कमी परिणाम होतो.

व्हॅन व्ह् लेक यांना अनेक बहुमान मिळाले. अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९३४)  या व इतरही काही संस्थांचे सदस्यत्व त्यांना लाभले. त्यांनी क्वांटम प्रिन्सिपल्स अँड लाइन स्पेक्ट्रा (१९२६) आणि द थिअरी ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटिज (१९३२) हे ग्रंथ लिहिले.

केंब्रिज (मॅसॅच्युसेट्‌स) येथे ते मरण पावले.

सूर्यवंशी, वि. ल.