डोके : द्विपाद पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या शरीरातील सर्वांत वरच्या भागाला ‘डोके’ म्हणतात. चतुष्पाद पृष्ठवंशी आणि इतर खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या शरीरातील अग्र (पुढच्या) भागाला ही संज्ञा लावतात. डोके धडाला मानेने जोडलेले असून मानेतील पहिल्या शीर्षधर कशेरुकावर (मणक्यावर) टेकलेले असते. मानेतील स्नायू व अस्थी यांच्या आकुंचन व हालचालीमुळे डोके मागे-पुढे व बाजूला सहज हालविता येते. काही प्राण्यांमध्ये मान अशी वेगळी नसून डोके एकदम धडाला जोडलेले असते उदा., मासे, बेडूक, सरीसृप (सरपटणारे) प्राणी वगैरे. 

 

डोक्याचे कंकाल तंत्र (सांगाडा) कवटी आणि अधोहन्वस्थी (खालच्या जबड्याचे हाड) यांचे बनलेले असते. कवटीचे कर्पर (ज्या भागामध्ये मेंदू असतो असा कवटीचा भाग) आणि चेहऱ्याच्या अस्थी असे दोन भाग असतात. कर्परामध्ये मस्तिष्क (मेंदू), त्याची तीन आवरणे, मेरुपृष्ठाचा (पाठीच्या कण्याचा) सर्वांत वरचा भाग, श्रवणेंद्रिय, रक्तवाहिन्या असून त्याच्या अस्थीमधील अनेक छिद्रांतून मस्तिष्कतंत्रिका (मेंदूपासून निघणाऱ्या मज्जा), रक्तवाहिन्या वगैरे डोक्याकडून मानेकडे आणि मानेकडून डोक्याकडे गेलेल्या असतात. चेहऱ्याच्या भागातील मोठ्या विवरात डोळे, नाक व जीभ अशी अनुक्रमे दृष्टी, गंध व रुची या ज्ञानेंद्रियांची ग्राहक स्थाने असतात. या भागाच्या मागे ग्रसनी (घसा), ग्रसिका (घसा व जठर यांच्या दरम्यानचा अन्ननलिकेचा भाग) आणि स्वरयंत्र असून त्यांच्याशी या भागाचा संधी झालेला असतो. डोक्याच्या सर्व दिशांनी होणाऱ्या या भागातील महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांकडे परिसरातील पदार्थांमध्ये उत्पन्न झालेल्या फरकांची संवेदना त्वरित होऊन त्यानुरूप प्रतिक्रिया होऊ शकते.

 मानवी कर्पराची धारिता (व्याप) सापेक्षतः अधिक असते. चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, लहान दात व जबड्याचे लघुस्नायू ही मानवी डोक्याची वैशिष्ट्ये होत.

 लहान मुलांच्या डोक्याचा कर्पर-विभाग चेहऱ्याच्या विभागापेक्षा बराच मोठा असतो. मस्तिष्क, डोळे व कान यांची बरीच वाढ झालेली असते परंतु तोंड, जबडा, स्वरयंत्र, ग्रसनी वगैरे भाग अजून वाढावयाचे असतात. जन्माच्या वेळी चेहरा व कर्पर यांचे सापेक्ष आकारमान १ : ८ असे असते ते वयाच्या पाचव्या वर्षी १ : ५ असे आणि प्रौढपणी १ : २ असे होते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत कर्परभागाची नव्वद टक्के वाढ झालेली असते. चेहऱ्याच्या उत्तर हन्वस्थीमधील (वरच्या जबड्याच्या हाडातील) कोटरे (पोकळ्या) उत्पन्न झालेली असतात, परंतु कपाळाचे हाड आणि जतुकास्थीतील (कर्पराच्या मध्य भागाच्या अस्थीतील) कोटरे अजून तयार व्हावयाची असतात. कर्णरंध्रातील हाडही अजून तयार झालेले नसते. 

मानवी डोक्याच्या व मानेच्या बाजूचे स्नायू : (१) चर्वणाचे स्नायू, (२) चेहऱ्याचे भावदर्शक स्नायू, (३) शिरोवल्काचे स्नायू.

डोक्याच्या स्नायूंचे तीन गट पडतात : (१) चर्वणाचे स्नायू, (२) चेहऱ्याचे भावदर्शक स्नायू आणि (३) शिरोवल्काचे (कवटीच्या टोपीसारख्या भागावरील पडद्याचे) स्नायू. 

मानवमितिशास्त्रात (मानवाच्या शरीराच्या मोजमापासंबंधीच्या तौलनिक अभ्यासाच्या शास्त्रात) मानवाच्या पोटजातींचे वर्गीकरण करण्याकरिता कर्प-परिमाण वापरतात. हे परिमाण खालील सूत्राने ठरवितात :

डोक्याची अघिकतम रुंदी × १००

= कर्पर-परिमाण 

डोक्याची अधिकतम लांबी

हे परिमाण साधारणपणे ७५ ते ८० च्या दरम्यान असते. ७५ पेक्षा कमी असल्यास त्या व्यक्तीला ‘दीर्घ कर्पर’ आणि ८० पेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला ‘लघु-कर्पर’ असे म्हणतात.

काही देशांत डोक्याचा विशिष्ट आकार सौंदर्यदर्शक मानतात व त्याकरिता डोक्याचा आकार बदलण्यासाठी लहानपणीच डोक्यावर चपटे पदार्थ बांधून त्याचा आकार पाहिजे तसा करण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार मध्य आफ्रिका, आशिया मायनर, पेरू, चिली व दक्षिण अमेरिकेतील इतर देशांतील लोक करतात. भारतात अशी प्रवृत्ती क्वचित दिसते. या कृतीमुळे डोक्याची लांबी व रुंदी फार तर २·५ सेंमी. बदलू शकते परंतु एकूण कर्पराच्या धारितेत फारसा फरक पडत नाही. ही धारिता सु. १,३०० ते १,६०० घ. सेंमी. असते. 

जन्मत: डोक्याच्या घडणीमध्ये काही दोष आढळतात. (१) अकर्पर : कर्पराच्या वरच्या घुमटाकार भागाची वाढच झालेली नसते व त्यामुळे आतील मस्तिष्काचीही वाढ होत नसल्यामुळे जन्मजात मनोदौर्बल्य असते. (२) लघुशीर्ष : कर्पराचा आकार सरासरीपेक्षा कमी असतो. (३) दीर्घशीर्ष : कर्पराचा आकार सरासरीपेक्षा अधिक असतो. 

पहा : कवटी चेहरा.

भालेराव, य. त्र्यं. सलगर, द. चि.