रीतिसिद्धांत : संस्कृत साहित्यशास्त्रातील एक महत्त्वाचा काव्यसिद्धांत. संस्कृत साहित्यशास्त्रात काव्याच्या स्वरूपाचा विचार, साधारणपणे ध्वनिकारांपर्यंत, बहुधा बाह्य रूपानेच म्हणजे शब्द आणि अर्थ यांच्या रूपानेच केला जात असे. या विचारांत वामनाचा (इ. स. सु. आठवे शतक) वाटा फार मोठा आहे. त्याने रीती आणि गुणांची कल्पना प्रथम मांडली, असे म्हणायला हरकत नाही. वामनाने ‘विशिष्टा पदरचना रीति:’ (काव्यालंकार १·२·७), विशेष पदरचना म्हणजे रीति होय, अशी रीतीची कल्पना मांडली आणि ही रीती ‘आत्मा काव्यस्य’ (काव्यालंकार १·२·६) असे सांगितले. रीतीला तो ‘मार्ग’ अशीही संज्ञा वापरतो. ही रचना म्हणजे काही मौलिक आणि ठराविक उत्तमांचे एकत्रीकरण होय. या उत्तमांना गुण असे पारिभाषिक नाव आहे. आणि हे गुण म्हणजे ‘काव्यशोभायाः कर्तारो धर्मा:’ (काव्यालंकार ३·१·१) होत. काव्यरचनेत ‘आत्मा’ येण्यासाठी वामनाने पदरचनेत काही वैशिष्ट्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि हे वैशिष्ट्य मुख्यतः पारिभाषिक धर्माचे म्हणजे गुणांचे सुयोग्य एकत्रीकरण केल्याने येते, असे आपले मत मांडले. हे गुण नेहमीच्या अर्थाने ‘अलंकार’ नव्हते, ते काव्याचे अविभाज्य गुण असून, काव्याचा आत्मा जी रीती तिची मांडणी करतात.

दंडीलाही (इ. स. सातवे शतक) याची कल्पना होती पण ⇨दंडीपेक्षा वामनानेच रीती आणि गुण या दोन तत्त्वांची अविभाज्य कल्पना प्रथम पुढे आणली. वामनच्या मताप्रमाणे हे मार्ग किंवा रीती तीन प्रकारच्या आहेत: ‘वैदर्भी’ रीतीत सर्व गुण येतात (समग्रगुणोपेता १·२·११) ‘गौंडी’ रीतीत ‘ओजस’ आणि ‘क्रांती’ हे गुण असतात, तर ‘पांचाली’ रीतीत ‘माधुर्य’ आणि ‘सौकुमार्य’ या गुणांचा समावेश असतो. या तिन्ही रीतींत वैदर्भी ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण तिच्यात सर्वाधिक वैशिष्ट्य असते. त्या मानाने गौडी आणि पांचाली या कमी पडतात. एका दृष्टीने काव्यस्वरूपासंबंधी एका समावेशक तत्त्व वामनाने प्रथमतः मांडले, असे म्हणायला हरकत नाही.

काव्यात सौंदर्य येते ते दोष टाळण्यामुळे आणि गुण आणि अलंकार यांच्यामुळे, असे वामन सांगतो. वामनाच्या मते गुण हे काव्यात आवश्यक आणि नित्य असतात, अलंकार मात्र आवश्यक असतातच असे नाही. ते बदलते असू शकतात. ‘काव्यशोभायाःकर्तारो धर्माः’ ही गुणांची व्याख्या आणि ‘तदतिशय हेतवः तु अलंकारः’ (काव्यालंकार ३·२·१) ही अलंकाराची व्याख्या या दोहोंतील भेद स्पष्ट करतात. उत्साह, माधुर्य हे जसे आत्मिक गुण होत, तसे अलंकार हे देहावरचे अलंकार होत.

काव्यात सौंदर्य येण्यासाठी ते दोषविरहीत असावे. दोष म्हणजे −‘गुणविपर्ययात्मनः’ −गुणांच्या अगदी उलट होत. गुमांमुळे काव्यसौंदर्य येते, तर दोषांमुळे ते नाहीसे होते. दोषांमध्ये काही ‘स्थूल’ दोष असतात, तर काही ‘सूक्ष्म’ दोष असतात, म्हणजे गुणांच्या तुलनेनेच ते दोष वाटतात, हे दोष दंडीनेही सांगितले आहेत.

वामनाने एकंदर दहा गुण सांगितले आहेत व त्यांचे शब्दगुण व अर्थगुण असे वर्गीकरण केले आहे. (१) ‘ओजस्’ची व्याख्या ‘गाढवन्धत्व’, एकाच वर्गाची जोडाक्षरे किंवा ‘र्’ आणि ‘य्’ यांच्याशी संयुक्त अशी कोणतीही अक्षरे अशी केली आहे. ‘विलुलितमकरन्दा मत्र्जरीर्नर्तयन्ति’ या उदाहरणात न् व द्, न् व त् आणि र् व न् यांच्या जोडाक्षराने रचनेत बांधीवपणा येतो, असे वामनाचे मत आहे. रचनेत येणारा हा एकजिनसीपणा एस्. के. डे यांच्या मते वामनाचा शब्दगुण ‘ओजस्’ (दंडीच्या मते ‘श्लेष’) होय. (२) ‘प्रसाद’ हा शब्दगुण ओजस् बरोबर वापरल्याने येतो, असे वामन सांगतो. जसे सुख आणि दुःख ही शोकाबरोबरच योग्य होतात. अर्थवैमल्य आणताना अनावश्यक शब्द टाळणेच इष्ट असेत. (३) श्लेष−यात ‘मसृणत्व’ म्हणजे अनेक शब्द एकत्र येऊनही त्यांतून एकच कल्पना व्यक्त होते किंवा ‘घटना’ म्हणजे अनेक कल्पना एकत्र येतात. (४) समता−‘प्रसीद चण्डि त्यज मन्युमत्र्जसा’ यात कर्तरी व कर्मणी प्रयोगांची गल्लत झाली आहे, ती टाळणे. (५) समाधीची व्याख्या ‘आरोहावरोहक्रमः’ अशी केली आहे. जोरदार शब्दरचनेत क्रम योग्य मृदू शब्दांच्या पखरणीने कमी करण्याचा प्रयत्न यात केलेला असतो किंवा याच्या उलट रचना असते किंवा चढ-उतारीचा योग्य क्रम शब्दांच्या मध्ये राखला जातो. ओजस् आणि प्रसाद यांचा उपयोग करून असा क्रम राखला जातो. (६) माधुर्य हे पृथक्पदत्वामुळे म्हणजे दीर्घ समास टाकून सुट्या शब्दांमुळे येते. ‘उक्ति-वैचित्र्य’ हे आडवळणाने केलेल्या सुंदर वाक्यासारखे असते. (७) सौकुमार्य हे अजठरत्व म्हणजे कठोर अक्षरे किंवा सामासिक शब्द टाळल्यामुळे येते. ‘अपारूध्य’ म्हणजे न पटणाऱ्या किंवा अशुभ कल्पना सांगणारी वाक्ये टाळण्याने येते. (८) उदारता ही रचनेत ‘लीलायमानत्व’ म्हणजे शब्द नाचल्यासारखे वाटून जी शोभा येते ती. अग्राम्यत्व म्हणजे ग्राम्य अर्थ कटाक्षाने टाळणे. (९) अर्थ व्यक्ती−अर्थ चटकन ध्यानात येईल अशी शब्दांची मांडणी. ‘वस्तु-स्वभाव-स्फुटत्व’ येईल अशी रचना. दंडीच्या स्वभावोक्तीशी ही कल्पना जुळती आहे. (१०) कांती−शब्दयोजनेत एक श्रीमंत दाखवून विधान नेहमीसारखे न होईल अशी रचना. ही कल्पना कुन्तकाच्या वक्रोक्तीशी बरीच जुळणारी आहे. ‘दीप्त-रसत्व’ किंवा रसाचे अस्तित्व चटकन लक्षात येईल अशी रचना, हा आणखी एक प्रकार.

शब्द आणि अर्थ यांच्या गुणांतील फरक जरी स्पष्ट नसला, तरी तो एकाला शोभवीत असला तरी पुरे कारण दुसऱ्याला तो साहचर्याने शोभा देऊ शकतोच. खरे तर प्रत्येक गुणाचे जे स्पष्टीकरण वामनाने दिले आहे, ते काही त्याच्या सिद्धांताचे वैशिष्ट्य नव्हे. काव्यातील शब्दयोजनेचे महत्त्व वामनाने प्रथम सांगितले, की ज्यामुळे तात्विक किंवा तांत्रिक लेखनापासून काव्य अगदी वेगळे पडते. केवळ शब्दरचनेमुळे काव्यत्व येते, ही वामनाची चूक असेल. परंतु काव्याचे बाह्य रूप तरी शब्द आणि अर्थ यांच्या सौंदर्यामुळे निष्पन्न होते, हे म्हणणे काही चूक नाही.

ध्वनिकारांनी ओजस्, प्रसाद आणि माधुर्य हे तीनच गुण स्वीकारले आहेत आणि ते मुख्यतः रसाचे गुण असून, शब्दरचनेशी त्यांचा संबंध गौण आहे, त्यांचे मत आहे. मम्मटाने गुण हे रसाचे ‘अचलस्थितयो धर्माः’ म्हणून सांगितले आहेत आणि त्यांच्यामुळे रस कळून येतो, असे म्हटले आहे. त्यामुळे अलंकाराहून ते वेगळे आहेत, हे स्पष्ट होते. मम्मटाने ध्वनिकारांप्रमाणे तीनच गुण मानले आहेत−माधुर्य, ओजस् आणि प्रसाद.

वामनाने काव्याच्या बहिरंगाचा−शब्द व अर्थ यांचा−विचार केला, तरी त्याच्या विवेचनाचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही.

संदर्भ : 1. Lahiri, P .C. Concept of Riti and Guna in Sanskrit Poetics, Dacca, 1937.

२. चौधरी, सत्यदेव, भारतीय काव्यशास्त्र (अष्टम अध्याय, रीति और गुण, ३६४-४८५), १९७४.

भट, गो. के.