नोएल–बेकर, फिलिप जॉन : (१ नोव्हेंबर १८८९ –  ). जागतिक निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता व १९५९ च्या नोबेल शांतता पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म लंडन येथे क्वेकर कुटुंबात झाला. त्याचे वडील ॲलन बेकर हे संसद सदस्य होते. फिलिपचे शिक्षण बुथॅम विद्यालय, हॅव्हरफर्ड महाविद्यालय (पेनसिल्व्हेनिया) व किंग्ज महाविद्यालय (केंब्रिज  विद्यापीठ) येथे झाले. एम्.ए. झाल्यावर त्याने अध्यापनाचे काम केले. विद्यार्थिदशेत तो केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता (१९१२). तसेच १९२४ च्या ऑलिंपिक क्रीडासामान्यात ब्रिटिश व्यायामी खेळाडूंच्या गटाचे त्याने नेतृत्व केले. तत्पूर्वी त्याने आयरीन नोएल या श्रीमंत तरुणीशी विवाह केला (१९१५) आणि पुढे १९२६ मध्ये तिचे आडनाव आपल्या आडनावामागे लावले. त्या वेळेपासून तो नोएल-बेकर म्हणून ओळखला जाऊ लागला.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याच्याकडे फ्रेंड्स ॲम्ब्यूलन्स युनिटचे नेतृत्व आले (१९१४). ब्रिटिशांतर्फे त्याने या युनिटमधून इटली, फ्रान्स, बेल्जियम इ. देशांत रुग्ण सैनिकांची सेवा केली (१९१५–१८). या त्याच्या कार्याबद्दल त्यास मॉन्स स्टार हे सुवर्णपदक मिळाले. १९१९ च्या शांतता परिषदेत भाग घेणाऱ्या ब्रिटिश शिष्टमंडळात तो होता. त्यानंतर त्याने राष्ट्रसंघातील सचिवालयात सचिव म्हणून काम केले (१९१९–२२). निर्वासितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नात रॉबर्ट सेसिल व आर्थर हेंडरसन यांना त्याने मदत केली. १९३२–३३ च्या जिनीव्हा निःशस्त्रीकरण सभांत तो अध्यक्षांचा सहायक होता. तत्पूर्वी त्याची लंडन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१९२४–२९). तो मजूर पक्षातर्फे कॉव्हेंट्री (१९२९–३१), डर्बी (१९३६–५०) व दक्षिण डर्बी (१९५० नंतर सलग) या मतदार संघातून संसदेवर निवडून आला. ॲटलींच्या मंत्रिमडळात त्याने विविध पदांवर काम केले (१९४५–५१). त्यानंतरही मजूरपक्षाच्या विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध कार्यात त्याचा मोठा वाटा होता. १९४५ मध्ये त्याने संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेच्या सनदेचा खर्डा तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

त्याला सात भाषा चांगल्या अवगत असून, त्याने आपले निःशस्त्रीकरणासंबंधीचे विचार अनेक पुस्तकांतून तसेच स्फुटलेखांद्वारे मांडले. त्याच्या प्रमुख ग्रंथांपैकी द जिनीव्हा प्रोटोकॉल (१९२५), डिस्आर्मामेंट (१९२६), द लीग ऑफ नेशन्स ॲट वर्क (१९२६), डिस्आर्मामेंट अँड द कूलीज कॉन्फरन्स (१९२७), द आर्मस रेस : ए प्रोग्रॅम फॉर वर्ल्ड डिस्आर्मामेंट (१९५८) इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांखेरीज खासगी शस्त्रास्त्रे निर्माण करणाऱ्या कारखानदारांसंबंधी त्याने विपुल लेखन केलेले आहे. संयुक्त राष्ट्रे, ब्रिटिश संसद, राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय परिषद वगैरेंमधील त्याचे कार्य व लेखन यांचा सर्वांगीण विचार होऊन त्याचा १९५९ चे नोबेल शांतता पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यास हॉलंड पारितोषिक, आल्‌बेअर श्वाइत्सर बुक प्राइस व अनेक सन्माननीय किताब मिळाले.

देशपांडे, सु. र.