बकून्यिन, म्यिकईल अल्थिक्सांद्र व्ह्यिच : (३० मे १८१४-१ जुलै १८७६). एकोणिसाव्या शतकातील प्रसिध्द रशियन क्रांतिकारक व ⇨अराज्यवादाचा प्रणेता. त्याचे वडील उदारमतवादी असून पाश्चात्य विचारांची छाप त्याच्यावर होती. त्याचा जन्म टवेर परगण्यात टरझॉक गावी रशियातील एका उदारमतवादी सरदार घराण्यात झाला. रशियन आणि इटालियन नगरांत त्याने माध्यामिक शिक्षण घेतले. तत्त्वज्ञान हा त्याचा आवडीचा विषय. विद्यापीठाची पदवी त्याने घेतली नाही. तत्पूर्वीच त्याने सैन्यात प्रवेश केला होता. पुढे लवकरच त्याने सैनिकी पेशा सोडला. इ.स.१८४१ ते १८४६ या काळात ⇨हेगेल, ⇨लूटाव्हिख फॉइरबाख, ⇨प्येअर प्रुदाँ इत्यादींच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडला होता. विशेषतः फॉइरबाखच्या तत्त्वज्ञानप्रेरित मानवतावादाने आणि व्हिटलिंगने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी विचाराने त्याच्या मनाची पकड घेतली पण त्यानतंर प्रूदाँच्या विचारातील अराज्यवादी विचारसरणीकडे तो अधिक आकर्षिक झाला आणि नंतर प्रत्यक्ष क्रांतिकारक चळवळीच्या अनुभवाने अराज्यवादाला त्याने स्वतंत्रपणे तत्त्वज्ञानाची बैठक दिली.

 

बकून्यिन तत्त्वज्ञानाचा केवळ अभ्यास करून थांबणारा नव्हता. ते कृतिशील विचारवंत होता. त्याने १८४७ पासून पश्चिम यूरोपीय देशांत घडत असलेल्या क्रांतिकारक घटनांत भाग घेतला. झारविरोधी मुक्तिसंग्रामात त्याचा प्रमुख वाटा होता. स्लाव्हिक राष्ट्रांच्या संघटनेने झारविरोधी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात त्याने प्रामुख्याने भाग घेतला. १८४९ मधील ड्रेझ्डेन येथील बंडात भाग घेतल्याबद्दल त्याला सॅक्सन परगण्यातील प्रतिगामी राजवटीने अटक करून फाशीची शिक्षा सुनावली आणि ऑस्ट्रियन सरकारच्या ताब्यात देण्यात आले. तेथून त्याची रशियात रवानगी झाली. रशियन सरकारने त्याला सायबीरियात हद्दपार केले. तेथून  तो १८६१ मध्ये निसटला. भूमिगत स्थितीत त्याने विद्यार्थिसंघटना आणि युवक चळवळीचे मार्गदर्शन केले. यूरोपच्या निरनिराळ्या देशांत फिरून क्रांतिकारक संघटना स्थापन केली. १८६१ ते १८७० या दरम्यान इटली, स्पेन, रशिया व स्वित्झर्लंड या देशांतील क्रांतिकारक चळवळींना त्याने वैचारिक बैठक दिली.

 

आतंरराष्ट्रीय पातळीवर बकून्यिनने लोकशाहीवाद्यांची एक गुप्त संघटना इ.स.१८६४ मध्ये स्थापन केली. इ.स.१८६८ मध्ये तो पहिल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत सामील झाला पण या संघटनेत तात्विक भूमिकेबाबत त्याचा मार्क्सशी मतभेद झाला. किंबहुना त्या जागतिक कामगार संघटनेत मार्क्सचा प्रतिस्पर्धी  म्हणून बकून्यिन ओळखला जाऊ लागला. बकून्यिन आणि मार्क्स हा कामगार यांचे मतभेद राजकीय डावपेच आणि क्रांतिकारक चळवळींच्या सिध्दांतांसंबंधी होते. बकून्यिन हा अराज्यवादी होता, तर मार्क्स हा कामगार वर्गाच्या राजकीय अधिनायकत्वाचा पुरस्कर्ता होता. मार्क्सच्या अनुयांयांनी बकून्यिनच्या विचारावर आणि धोरणावर अविश्वास दाखविला. या जागतिक संघटनेत १८७२ मध्ये फूट पडली. तेव्हा बकून्यिनने स्वतंत्र चळवळ चालू ठेवली पण त्यातूनही त्याने नंतर अंग काढून घेतले.

 

बकून्यिनची वैचारिक झेप फार मोठी होती. राजकीय सामाजिक, नैतिक, बौध्दिक, इ. क्षेत्रांत संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, हे त्याच्या विचाराचे मध्यवर्ती सूत्र होते आणि त्याला अनुसरूनच तो आपल्या प्रचाराची आणि कार्याची आखणी करीत असे. प्रथम ईश्वरविषयक कल्पनांवर त्याची श्रध्दा होती पण नंतरच्या काळात मानवामानवातील बंधुभाव हेच त्याचे श्रध्दास्थान बनले आणि अशा विचाराने प्रेरित होऊनच त्याने प्रत्थापित राजकीय व सामाजिक चौकट झुगारून देण्याची गरज प्रतिपादन केली धर्मशास्त्राविरूध्द बंड पुकारले धर्मसंस्थांची जागा संघराज्य, समाजवाद आणि निरीश्वरवाद यांनी घेतली पाहिजे असे त्याने मत व्यक्त केले. राज्यसंस्थेवरही त्याने अविश्वास व्यक्त केला. राज्याची संघटना नष्ट करून त्याच्या जागी स्वायत्त संस्थांचा संघ असला पाहिजे, असे तो प्रतिपादन करू लागला. पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष शिक्षण आणि आपल्या परिश्रमांचे फळ माणसाला मिळाले पाहिजे, अशी त्याची धारणा होती. अर्थात असे विचार त्याला त्या काळात उघडपणे मांडता येणे शक्य नव्हते. म्हणून अनेकदा तो भूमिगत कार्य करीत असते. गुप्तसंघटनांच्या द्वारे आपल्या विचारांचा त्याने प्रसार केला. अशा लहानसहान गुप्तसंघटना स्थापून त्यांना एकमेकांच्या सहकार्याने सार्वत्रिक बंडाचा उठाव करता येईल, अशी त्याची योजना होती.

 

रशियात शेतकरी क्रांतीने समाजवाद आणता येईल व भांडवलदारी अर्थव्यवस्थेची पायरी टाळून अशी शेतकरी क्रांती करणे शक्य होईल, असे बकून्यिनचे मत होते. याच भूमिकेवरून त्याने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत अराज्यवाद्यांचे नेतृत्व केले. त्याच्या काही अनुयायांनी  १८७६ साली रशियात भूमिगत चळवळ केली आणि जमीन हस्तगत करून काही भागांत स्वातंत्र्यही जाहीर केले पण त्याच वर्षी बकून्यिन निधन पावला आणि नंतर त्याच्या अनुयायांत फूट पडली. अराज्यवादाचा प्रथम संघटितपणे प्रचार करण्याचे श्रेय बकून्यिनलाच दिले पाहिजे.

बकून्यिनने आपल्या चळवळीच्या प्रचारार्थ व तुरूंगात असताना विपूल ग्रंथलेखन केले. त्यांतून त्याचे क्रांती, अराज्यवाद इत्यादीसंबंधीचे मौलिक विचार प्रकट होतात. अखेरच्या दिवसांत त्याने पुस्तपत्रे व चळवळीचा कार्यक्रम यांची मोहिम काढून आतंरराष्ट्रीय कामगार जगतात आपले विचार प्रसृत केले. तो प्राग येथील स्लाव्ह काँग्रेसला हजर होता. त्यासंबंधी त्याने ॲनअपील टू द स्लाव्ह्ज (इं.भा.-१८४८) हे पुस्तपत्र प्रसिध्द केले. पुढे सेंट पीर्ट्झबर्ग येथे तुरूंगात असताना पहिल्या झार निकोलसच्या आज्ञेवरून त्याने पापनिवेदन तयार केले. ते कनफेशन्स टू द झार (इं.भा.-१८५१) या नावाने प्रसिध्द झाले. अराज्यवादाची रूपरेषा व कार्यक्रम यांविषयी त्याने रिव्होलूशनरी कॅटिकाइझम (इं.भा.-१८६६) ही गाजलेली पुस्तिका लिहिला. त्यानंतर तो जिनीव्हा येथील शांतता व स्वातंत्र या संघटनेच्या उद्घाटनास हजर होता. तत्संबंधीचे आपले विचार फेडरॅलिझम, सोशॅलिझम अँड अँटी थिऑलोजिझम (इं.भा.-१८६८)  या प्रसिध्द प्रबंधात मांडले परंतु त्याचे ऐकान्तिक विचार संघटनेस मानवले नाहीत. त्याने ही स्वातंत्र्य –शांततेची संघटना सोडली आणि दुसरी संघटना स्थापन केली. फ्रँको-प्रशियन युध्दाच्या वेळी त्याने फ्रान्समधील शेतकरी व कामगारांना तिसऱ्या नेपोलियनविरूध्द उठाव करण्याचे आवाहन लेटर्स टू ए फ्रेंचमन (इं.भा. -१८७०) या पुस्तिकेद्वारा केले. नवीन जर्मनीचे राज्य हा स्वातंत्र्यास मोठा धोका आहे. जर्मनांबद्दलचा द्वेष आणि क्रांतीबद्दलची त्याची आसक्ती द नौटो-जर्मन एम्पायर अँड द सोशल रिव्होलूशन (इ.भा.-१८७०-७२) या त्याच्या ग्रंथात दिसून येते. त्यात त्याने राजकारणापासून ज्योतिषापर्यंतच्या विविध विषयांचा ऊहापोह केला आहे. त्याचा उर्वरित भाग त्याने गॉड अँड द स्टेट या नावाने  प्रसिध्द  केला. याशिवाय त्याची द पोलिटिकल थीअरी ऑफ मॅझिनी (इ.भा. १८७१) स्टेटिझम अँड अनार्किझम (इं.भा.-१८७२) इ. पुस्तके प्रसिध्द आहेत. त्याच्या लेखनात अनेक वेळा विसंगती आढळते. त्याचे समग्र लेखन पुढे प्रसिध्द झाले.

 

बकून्यिनच्या रक्तातच बंडखोर वृत्ती होती. त्याने क्रांतिकारकांची चळवळ वाढविली अनेक संघर्षात हिरिरीने भाग घेतला. किंबहुना त्याचे सर्व जीवनच संघर्षमय लढ्यात व्यतीत झाले. काही वेळा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आणि ते गैरसमज अगदी विसाव्या शतकापर्यंत कायम होते पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची वैयक्तीक कागदपत्रे, पत्रव्यवहार व समकालीनांनी लिहिलेल्या  त्याच्या आठवणी व काही शासकीय कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत.त्यावरून त्याचे खाजगी जीवन एकाकीचे होते असे दिसते. सायबीरियातील हद्दपारीच्या सु. चार वर्षाच्या काळात (१८५७-६१) त्याचा विवाह एका पोलिश व्यापाऱ्याच्या अँटोनिया नावाच्या मुलीशी झाला होता. पण त्याला वैवाहिक जीवन असे फारसे लाभले नाही. अखेरच्या काळात व्याधिग्रस्त झाल्याने त्याने सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतले (१८७३) तथापि मे १८७४ मध्ये इटलीतील बोलोन्या येथे बंड उद्भवले. त्या वेळी त्याचे नेतृत्व करण्याचा मोह त्यास झाला. हे बंड मोडले गेले आणि बकून्यिनही कायमचा अंथरूणाला खिळला गेला आणि लवकरच बर्न (स्वित्झर्लंड) येथे मरण पावला.

 

एकोणिसाव्या शतकातील अराज्यवादी तत्त्वज्ञानाची पायाभरणी प्रूदाँ आणि बकून्यिन या उभयतांनी केली. या उभयतांत बकून्यिनचे व्यक्तिमत्व अधिक वादळी आणि क्रियाशील ठरले. त्याच्या निधनानंतर ⇨प्यॉटर क्रपॉटक्यिन या रशियन विचारवंताने अराज्यवादाची ध्वाजा पुढे सांभाळली.

संदर्भ : 1. Bose, Atindranath, A History of Anarchism, Calcutta, 1967.

          2. Carr, E,H. Michael Bakunin, New York, 1961.

          3. Dolgoff, Sam, Ed,&amp Trans, Bakunin an Anarchy Selected Works by the Activisi-Founder of World Anarchism, London, 1973.

          4. Florinsky, M.T.Ed. McGraw-Hill Emcyelopedia of Russia and the Soviet Union, New York, 1961.

          5. Hare R.Partralts of Russian Personalitels Between ?Reform and Revolution New York 1959. 

          6. Lchning Arthur, Ed,M.A. Bakumin, Selected Writings, New York, 1974.

गर्गे. स. मा.