पर्युदर : (पेरिटोनियम). उदर-श्रोणी गुहेत (उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्‍या पोकळीत) भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर (अंतर्गत इंद्रियांवर) कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ लसी-कलेला (अस्तरासारख्या पटलाला) ‘पर्युदर’ म्हणतात. सर्व सस्तन प्राणी आणि इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या उदर-श्रोणी गुहेचे पर्युदर हे अस्तर असते. मानवी शरीरातील सर्वांत मोठी लसी-कला म्हणूनही तिचे वर्णन करता येते. तिची रचनाही जटिल (गुंतागुंतीची) असून समजण्यास सुलभ नाही. भ्रूणावस्थेत साध्या पसरलेल्या या पडदेवजा या लसी-कलेला उदरगुहेतील अंतस्त्यांच्या वाढ आणि रचनात्मक बदलांबरोबरच फुगवटे आणि घड्या पडत जातात. या पडद्यामुळे आंत्रासारख्या (आतड्यासारख्या) लांब नळीला आधार मिळून ती पश्चोदर (उदराच्या मागील बाजूच्या) भित्तीशी काहीशी घट्ट बांधली जाते. त्यामुळे आंत्रनलिका उदरगुहेत लोंबकळत राहून तिच्या अनेक हालचाली सुरळीत चालू शकतात [⟶ पचन तंत्र]. पर्यदर ही संरक्षक  लसी-कला असून तिच्या आतील ओलसर गुळगुळीत पृष्ठभागामुळे उदरगुहेतील अंतस्त्यांच्या हालचाली घर्षणविरहीत व सुरळीत चालतात. ओलसर राहण्याकरिता पर्युदर कोशिकांचे (पेशींचे द्रवस्रवण सतत चालू असते. पर्युदर पृष्ठभाग जसा स्रवणक्षम असतो तसाच तो अभिशोषणक्षमही असतो. पाणी आणि स्फटिकाभ पदार्थ त्यातून रक्तात आणि लसीकेत (रक्तद्रवाशी साम्य असलेल्या व ऊतकांतून–समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतून–रक्तात जाणाऱ्‍या द्रव पदार्थात) अभिशोषिले जातात. शरीराच्या संबंध त्वचेचे पृष्ठफळ १·९ चौ. मी. आहे, तर संपूर्ण पर्युदराचे पृष्ठफळ ६ चौ. मी.एवढे मोठे आहे. उदरगुहेतून सर्वसाधारणपणे दर ताशी ३० ते ३५ मिलि. द्रव पर्युदरातून  रक्तद्रवात मिसळत असतो. मूत्रलता (लघवी होण्याचे प्रमाण) कितीही वाढवली, तरी या क्रियेत कोणताही बदल होत नाही. पर्युदराची अभिशोषणक्षमता (प्राण्यावरील) प्रायोगिक शस्त्रक्रियेकरिता नेम्बुटालासारख्या शुद्धिहारक औषधाचे पर्युदरगुहेत अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन उपयोगात आणतात. मूत्रविषरक्तते (मूत्रातील घटक रक्तात शिरल्यामुळे निर्माण होणाऱ्‍या विषारी अवस्थेत) पर्युदराची अर्धपारगम्यता पर्युदर अपोहनाकरिता [विद्रावातील स्फटिकाभ व कलिल द्रव्ये अलग करण्याकरिता ⟶  अपोहन] वापरता येते. शोथाच्या (दाहयुक्त सुजेच्या) सान्निध्यात पर्युदराची प्रतिक्रिया प्रथिनसमृद्ध निःस्राव उत्पन्न करण्याची आणि तंतुमय बंध तयार करून शोथ रोखण्याची असते. 

पर्युदराबद्दलची माहिती ईजिप्तमधील ३,५०० वर्षांपूर्वीच्या एबर्स पपायरसमध्ये (एका विशिष्ट वनस्पतीपासून तयार केलेल्या लेखनपत्रावरील नोंदीमध्ये) आढळते. १७३० मध्ये एडिंबरो येथील जेम्स डग्लस या शरीररचना आणि प्रसूतिविद्यातज्ञांनी पर्युदराचे प्रथम प्रसिद्ध केलेले सखोल वर्णन आजतागायत जसेच्या तसेच ग्राह्य असून त्यात कोणताही फरक आढळलेला नाही.

आ. १. भ्रूणाचा अग्रपश्च किंवा उभा छेद : (१) परिहृदय गुहा, (२) पर्युदरगुहा, (३) अनुप्रस्थपट (भावी मध्यपटल) - अपूर्ण वाढलेला, (४) अग्र भाग, (५) पश्च भाग.

भ्रूणविज्ञान : भावी मध्यपटल (उदरगुहा व वक्षीय गुहा यांना विभागणारे पटल) ज्यापासून बनते त्या ‘अनुप्रस्थपटां’मुळे भ्रूणातील आद्य देहगुहेची दोन भागांत विभागणी होते व भ्रूणावस्थेच्या चौथ्या आठवड्यात हा पट अपूर्णावस्थेत असल्यामुळे दोन्ही गुहा एकमेकींशी जोडलेल्याच असतात. या दोन भागांपैकी मोठ्या भागापासून पर्युदरगुहा बनते व ती छोट्या भागापासून (भावी परिहृदय गुहेपासून) कालांतराने पूर्ण निराळी होते. सुरुवातीस पर्युदरगुहेचे आद्य आंत्रामुळे (आतड्यामुळे) डावा आणि उजवा असे दोन भाग पडतात. आद्य आंत्राच्या दोन बंधांपैकी अभ्युदरीय (उदराच्या बाजूचा) भाग नाहीसा होऊन एकच गुहा बनते.

आ. २. भ्रूणाचा आडवा छेद : (१) पाठीच्या कण्यातील कशेरूक दंड, (२) महारोहिणी, (३) वृक्क, (४) पर्युदराचा भित्तिस्तर, (५) आंत्रबंध, (६) पर्युदराचा अंतस्त्यस्तर, (७) आंत्रनलिका, (८) पर्युदरगुहा.

रचना व कार्य : पर्युदर हा एक सलग पडदा असला, तरी त्याचे उदरभित्तीच्या आतल्या पृष्ठभागावरील एक व उदरातील अंतस्त्यांशी निगडित असा एक मिळून दोन विभाग वर्णितात. भित्तीशी निगडित असलेला तो ‘भित्तिस्तर’ व अंतस्त्यांवर कमी-अधिक प्रमाणावर आच्छादलेला तो ‘अंतस्त्यस्तर’ अशी वर्णनसुलभ नावे त्यांना दिलेली आहेत. हे दोन्ही स्तर प्रत्यक्षात एवढे संलग्न असतात की, जेव्हा ‘पर्युदरगुहा’ हा शब्द वापरला जातो तेव्हा फक्त ‘संभाव्य पोकळी’चाच उल्लेख केला जातो, हे लक्षात ठेवावयास हवे. शिवाय या गुहेत कोणतेही अंतस्त्य नसते. पर्युदरगुहेसंबंधी रेखाचित्रेही अशी पोकळी खरोखरच असल्याचा केवळ भासच निर्माण करतात. पर्युदर ही एक बंद पिशवीच असून तिचा पुरुषात बाह्य हवेशी अजिबात संबंध नसतो. स्त्रीमध्ये मात्र या पिशवीचा अंडवाहिन्यांची दोन मोकळी तोंडे ⟶  गर्भाशय गुहा ⟶  योनिमार्ग या मार्गाने बाह्य हवेशी संबंध येतो म्हणजेच अंडवाहिन्यांची मोकळी तोंडे पर्युदरगुहेत उघडतात.

पर्युदरगुहेचे दोन भाग पाडता येतात : (१) उदरगुहेचा अधिकांश भाग व्यापणाऱ्‍या मोठ्या भागाला ‘बृहत‌्कोश’ आणि (२) जठराच्या मागे यकृताखालून मध्यपटलापर्यंत गेलेल्या छोट्या भागाला ‘लघुकोश’ म्हणतात. हे दोन्ही भाग ज्या रंध्रामुळे एकमेकांस जोडलेले असतात त्याला ‘वपा रंध्र’ किंवा जे. बी. व्हिन्सलौ या फ्रेंच शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘व्हिन्सलौ रंध्र’ म्हणतात.


भित्तिस्तराचा बाह्य पृष्ठभाग (म्हणजे भित्तीजवळचा) खरखरीत असून तो उदरभित्तीशी अवकाशोतकाने (कोशिकांची सैलसर रचना असलेल्या व कमी प्रमाणात आधारद्रव्य असलेल्या ऊतकाने) घट्ट चिकटल्यासारखा असतो. भित्ती आणि पर्युदर यांमधील ऊतकाला ‘पर्युदर बाह्य ऊतक’ म्हणतात व त्यात काही ठिकाणी वसा (स्निग्ध पदार्थ) साठवलेली असते. भित्तिस्तर हा मध्यपटल, पश्च आणि अग्र उदरभित्ती यांना विशेषेकरून श्वेतरेषेच्या (उदरगुहेच्या उभ्या मध्यरेषेवरून जाणाऱ्‍या आतील बाजूस असलेल्या जाड संयोजी ऊतक थराच्या) भागात घट्ट चिकटलेला असतो. काही ठिकाणी तो सैलसर पसरलेला असल्यामुळे तेथील अंतस्त्यांना त्यांचे आकारमान बदलण्यास अडथळा येत नाही. उदा., उदरभित्तीचा खालचा आणि अग्र भाग व श्रोणीगुहेतील भाग सैल असल्यामुळे मूत्राशयाचे आकारमान मूत्रसंचयानुरूप सहज बदलू शकते. पश्चभित्तीजवळ वृक्कांच्या (मूत्रपिंडांच्या) जवळ वसा मोठ्या प्रमाणात साठविलेली असते. सोलून अलग करणे जवळजवळ अशक्यच असते. अंतस्त्यस्तराखालील संयोजी ऊतक आणि अंतस्त्याच्या बाह्य पृष्ठभागावरील ऊतक एवढे एकजीव झालेले असतात की, अंतस्त्यस्तर अंतस्त्यांचाच भाग बनतो.

अंतस्त्यांच्या वाढ आणि रचनाबदलाबरोबरच पर्युदराला जे फुगवटे, चुण्या आणि घड्या पडतात त्यांपासून आंत्रबंध व इतर विविध बंध तयार होतात. या बंधांमुळे उदरातील अंतस्त्ये आपापल्या जागी घट्ट बसविली जातात व त्यांमुळे आंत्राची हालचाल कोणताही अडथळा न येता चालू राहते. आंत्रादी अंतस्त्यांना बंधांच्या दोन थरांमधून रक्तवाहिन्या, तंत्रिका (मज्जा) आणि लसीका यांचा पुरवठा होतो.

उदरगुहेतील अग्निपिंड, वृक्क, अधिवृक्क ग्रंथी (प्रत्येक वृक्कावर टोपीसारख्या असलेल्या ग्रंथी) ही अंतस्त्ये पर्युदरगुहेच्या मागे उदराच्या पश्चभित्तीजवळ टेकून असल्यामुळे ती ‘पर्युदर बाह्य’ म्हणून संबोधली जातात. त्यांना ‘पर्युदर पश्च’ असेही म्हणतात. यकृत, प्लीहा (पानथरी), जठर, लघ्वांत्र (लहान आतडे), बृहदांत्र (मोठे आतडे), गर्भाशय, मूत्राशय, अंडाशय या अंतस्त्यांवर पर्युदराचा एक थर कमीजास्त प्रमाणात असतो. या थराचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चमकदार असतो.

अंतस्त्यस्तराचा एक चौपदरी पडद्यासारखा भाग जठराच्या खालच्या मोठ्या कडेपासून काही अंतरापर्यंत लोंबकळत राहून परत वर वळतो आणि बृहदांत्राच्या आडव्या भागावरील ऊतकाशी जोडला जातो. पर्युदराची ही सर्वांत मोठी घडी असून तिला ‘बृहद्वपा’ म्हणतात. तिच्या चौपदरापैकी पुढच्या दोन पदरांमध्ये काही रक्तवाहिन्यांचे मीलन होते. बृहद्वपा वसा साठविण्याचे कार्य करीत असून प्रामुख्याने पर्युदरगुहेतील सूक्ष्मजंतूंचे संक्रामण (फैलाव) रोखण्याचे कार्य करते. जेथे जेथे सूक्ष्मजंतूच्या संक्रामणास सुरुवात होते, तेथे तेथे बृहद्वपा गुन्ह्याच्या जागी पोलीस जावे त्याप्रमाणे जाऊन संक्रामणास रोखते. याशिवाय ती विशिष्ट प्रतिपिंडेही (सूक्ष्मजंतू, त्यांपासून तयार होणारी विषे इत्यादींना विरोध करण्याकरिता रक्तरसात निर्माण होणारे विशिष्ट पदार्थ) तयार करीत असावी. तीमध्ये अनेक स्थिर महाभक्षिकोशिका(सूक्ष्मजंतूंचे भक्षण करणाऱ्‍या मोठ्या कोशिका) विखुरलेल्या असतात व जरूर पडल्यास त्या भ्रमण करू शकतात. इतके असूनही बृहद्वपा हा शरीराचा आवश्यक भाग नसावा. कारण पुष्कळ वेळा तिचा जन्मजात अभाव आढळतो आणि शस्त्रक्रियेत तिचे संपूर्ण उच्छेदन करूनही हानी झाल्याचे आढळत नाही.

आ. ३. पर्युदर रचना : उदरगुहा आणि श्रोणिगुहेचा उभा छेद (स्त्री-शरीर) : (१) लघुवपा, (२) यकृत, (३) लघुकोशाची वरची खाच, (४) जठर, (५) कशेरुक नाल, (६) अग्निपिंड, (७) ग्रहणी, (८) महारोहिणी, (९) लघुकोश, (१०) आडवे बृहदांत्र, (११) लघ्वांत्राचा आंत्रबंध, (१२) लघ्वांत्र, (१३) गर्भाशय, (१४) गुदांत्र, (१५) गर्भाशय-गुदांत्र कोष्ठ किंवा डग्लस कोष्ठ, (१६) योनिमार्ग, (१७) मूत्राशय, (१८) गर्भाशय-मूत्राशय कोष्ठ, (१९) बृहद्वपा, (२०) बृहतकोश.

जठराच्या लघुवक्र कडेपासून यकृताकडे जाणाऱ्‍या पर्युदराच्या घडीवजा पडद्यासारख्या भागाला ‘लघुवपा’ म्हणतात. या दुपदरी पडद्याच्या घडीत डावी आणि उजवी जठर रोहिणी व नीला, जठर तंत्रिका शाखा, लसीका ग्रंथी आणि त्यांच्या वाहिन्या विखुरलेल्या असतात. लघुवपेचा डावा भाग उजव्या भागापेक्षा नेहमी पातळ असतो आणि उजव्या भागाची जाडी वसा आणि संयोजी ऊतक यांच्या संचयावर अवलंबून असते.

उदरगुहा आणि श्रोणीगुहा यांतील अंतस्त्यावरून पसरलेल्या पर्युदराच्या घड्या पडल्यामुळे तसेच अंतस्त्यांच्या आकार विविधतेमुळे काही खाचा, कोष्ठ व खळगे तयार होतात. शस्त्रक्रियाविज्ञान आणि विकृतिविज्ञान यांच्या दृष्टिकोनातून या सर्वांना फार महत्त्व असते. अशा एखाद्या खाचेत आतड्याचा काही भाग अडकल्यास ‘अंतःस्थअंतर्गळ’ उद्भवण्याचा संभव असतो. स्त्रीमध्ये गर्भाशय आणि गुदांत्र तसेच गर्भाशय आणि मूत्राशय यांच्या मधे कोष्ठ (छोटी पिशवी किंवा कप्पा) तयार होतो. या पहिल्या कोष्ठास जेम्स डग्लस या स्कॉटिश शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘डग्लस कोष्ठ’ म्हणतात. स्त्रीरोगविज्ञानात हो कोष्ठ महत्त्वाचे आहेत. आंत्रपुच्छ (अँपेंडिक्स), उंडुक (बृहदांत्राचा गोमुखाकार पिशवीसारख्या टोकाशी बंद असेलेला सुरुवातीचा भाग) व  वग्रहकारी बृहदांत्र (श्रोणीफलकाच्या वरच्या भागापासून श्रोणीच्या आत खाली गेलेल्या इंग्रजी S अक्षराच्या आकाराच्या बृहदांत्राचा भाग) यांच्या भोवती अशाच काही पोकळ जागा असतात.

पुरूषात भ्रूणावस्थेत वृषणांची (पुं-जनन ग्रंथीची) वाढ उदरगुहेत होते. कालांतराने वृषण मुष्कात (पिशवीसारख्या भागात) उतरतात प्रत्येक वृषण (डाव्या बाजूस एक आणि उजव्य बाजूस एक) खालीसरकताना पर्युदराच्या अंतस्त्यराची एक घडी वृषणाबरोबरच मुष्कात उतरते. कालांतराने या घडीचा आणि पर्युदरगुहेचा संबंध तुटतो. हा संबंध कायम राहिल्यास उदरगुहेतील अंतस्त्य मुष्कात उतरू शकते. या विकृतीला ‘वंक्षण अंतर्गळ’ म्हणतात [⟶ अंतर्गळ].


सूक्ष्मरचना, रक्त व तंत्रिका पुरवठा : पर्युदराचा पृष्ठभाग भ्रूणाच्या मध्यस्तरजनित उपकला कोशिका एकाशेजारी एक रचून बनलेला असतो. या कोशिका शल्क (खवल्यासारख्या) आणि चापट आकाराच्या असतात. या थराखाली सैल संयोजी ऊतकाचा थर असून त्यात कोलॅजेन (आधार देणारे मुख्य प्रथिन), प्रत्यास्थ (ताण काढून घेतल्यानंतर मूळ स्थितीत परत येणारे) तंतू, वसा कोशिका, जालिका कोशिका आणि महाभक्षकोशिका विखुरलेल्या असतात. शेजारी शेजारी असलेल्या दोन चपट्या कोशिकांच्या दरम्यान जो संधी असतो त्यातून महाभक्षकोशिका जाऊ-येऊ शकतात.

 पर्युदराच्या भित्तिस्तराला उदर आणि श्रोणी भित्तींना पुरवठा करणाऱ्‍या रोहिण्यांच्या शाखांपासून रक्तपुरवठा होतो. अंतस्त्यराला ज्या अंतस्त्यावर तो असतो त्याच्या रोहिण्यांच्या शाखा रक्तपुरवठा करतात. भित्तिस्तराला विशेषेकरून उदरभागातील स्तराला खंडयुक्त कायिक तंत्रिकांचा भरपूर पुरवठा असतो. अग्र उदर भित्तीच्या पर्युदरभागाला खालच्या सहा वक्षीय तंत्रिकांच्या शाखा पुरवठा करतात. या अंतरापर्शुक (बरगड्यांच्या मधल्या भागातील) तंत्रिका प्रत्येक बाजूस त्वचा, स्नायू  आणि त्याखालील पर्युदराला पुरवठा करतात, त्यामुळे हा पर्युदराचा भाग सर्व प्रकारच्या संवेदनांना सक्षम असतो. म्हणून पर्युदरीय प्रक्षोभ वेदना जाणवतात व उदर स्नायूंचे संरक्षणात्मक आकुंचन होते (पोट तपासताना स्नायू ताठ झाल्याचे समजते). अंतस्त्यराला अनुकंपी तंत्रिका शाखा [⟶ तंत्रिका तंत्र] पुरवठा करतात. त्यामुळे संवेदनक्षमता जवळजवळ नसतेच. म्हणून यकृत, जठर किंवा आंत्र कापल्यास किंवा चिमट्यात घट्ट पकडल्यास किंबहुना जाळल्यासही वेदना जाणवत नाही.

 पर्युदरगुहेतील द्रव : पर्युदरगुहेत सर्वसाधारणपणे ७५ ते १०० मिलि. द्रव असतो. तो जल, विद्युत् विच्छेद्य (विद्युत् प्रवाहामुळे ज्यातील घटक अलग होऊ शकतात असे) पदार्थ, प्रथिने आणि विविध कोशिका मिळून बनलेला असतो. प्राकृतावस्थेत प्रत्येक घ. मिमी. द्रवात २,००० ते २,५०० कोशिका असतात. त्यांपैकी बहुसंख्य महाभक्षिकोशिका असून उरलेल्या झडलेल्या उपकला कोशिका व लसीका कोशिका असतात. या द्रवाची तपासणी पर्युदराच्या रोगनिदानास उपयुक्त असते. सूक्ष्मदर्शकीय, ऊतक संवर्धन आणि रासायनिक विश्लेषण या तपासण्या करतात.

पर्युदराचे अभिशोषणक्षम पृष्ठफळ बरेच मोठे असल्यामुळे पर्युदर द्रव शरीरातील एकूण कोशिकाबाह्य द्रवसाठ्याचा महत्त्वाचा भाग असतो.  

विकार : पर्युदराच्या विकारांत पुढील गोष्टींचा समावेश होतो. 

संक्रमणजन्य विकार : (अ) तीव्र पर्युदरशोथ. (आ) चिरकारी (दीर्घकालीन) पर्युदरशोथ. (इ) कवकजन्य व परजीवजन्य रोग (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे व दुसऱ्‍यावर उपजीविका करणाऱ्‍या सजीवांमुळे होणारे रोग): (१) कॅन्डिडिॲसिस (कॅन्डिडा अल्बिकान्स नावाच्या सूक्ष्म परजीवीमुळे होणारा रोग) (२) हिस्टोप्लाझ्मोसिस (ऊतक द्रव्य कवकजन्य रोग) (३) शिस्टोसोमियासिस [पर्णकृमींच्या प्रकारांपैकी शिस्टोसोमा नावाच्या कृमीमुळे होणारा रोग ⟶ खंडितकायी-कृमिरोग]. 

अर्बुदे : (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्‍या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) : (अ) दुय्यम कर्करोग (शरीरात इतर भागात प्रथम सुरू होऊन नंतर पर्युदरात फैलावलेला), (आ) प्राथमिक कर्करोग (पर्युदरातच प्रथम सुरू होणारा).

इतर काही विकार : (अ) कणार्बुदीय पर्युदरशोथ (कणीदार स्वरूपाच्या अर्बुदामुळे होणारा पर्युदरशोथ): (१) सारकॉयडोसिस (ग्रंथिक रोग : त्वचा, लसीका ग्रंथी इ. शरीरऊतकांमध्ये छोट्या छोट्या गाठी तयार होणारा रोग) (२) क्रॉन रोग (शेषांत्र व उंडुक या आतड्याच्या भागांचा शोथयुक्त रोग बी. बी. क्रॉन या अमेरिकन वैद्यांच्या नावावरून येणाऱ्‍या पावडरीतील स्टार्च कण शस्त्रक्रियेच्या वेळी पर्युदरावर पडून कणार्बुदे उत्पन्न करणारा पर्युदरशोथ). (आ) व्हिपल रोग (आंत्रभित्तीचा विशिष्ट रोग जी.एच्. व्हिपल या अमेरिकन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग). (इ) स्त्रियांचे काही रोग : (१) गर्भाशय-अंतःस्तर ऊतकाची आढळणारी अपसामान्य वाढ). (ई) पर्युदर लसीकावाहिकास्फीती (लसीका वाहिन्यांचे विस्फारण).

वरील सर्व विकारांमध्ये ⇨जलोदर हे एक लक्षण असू शकते. पर्युदरगुहेतील अपसामान्य जलसंचयाला जलोदर म्हणतात. प्रस्तुत नोंदीत फक्त नेहमी आढणाऱ्‍या पर्युदरशोथ या विकाराविषयीची माहिती दिली आहे. 

पर्युदरशोथ : पर्युदराच्या दाहयुक्त सुजेला ‘पर्युदरशोथ’ म्हणतात. पर्युदरशोथाचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत : असंक्रामणजन्य, संक्रामणजन्य, तीव्र प्रसृत, तीव्र स्थानीय, न्यूमोकोकायजन्य, गोनोकोकायजन्य वगैरे. प्रस्तुत नोंदीत फक्त दोन प्रमुख प्रकारांचीच माहिती दिली आहे.

आ. ४. तीव्र पर्युदरशोथ : (१) उंडुक, (२) आंत्रपुच्छशोथामुळे फुगून फुटलेले आंत्रपुच्छ, (३) दूषित द्रवाचा फवारा.

आ. ५. पर्युदरशोथ : उदरावर शस्त्रक्रिया करून दिसणारे आतील दृश्य: (१) आंत्राची वेटोळी, (२) पू, (३) प्रतिकर्षक (शस्त्रक्रियेमध्ये छेदाच्या कडा ओढून धरणारे शस्त्र).

तीव्र प्रसृत पर्युदरशोथ : सुरुवातीस बहुतकरून तीव्र स्थानीय स्वरूप असलेल्या विकाराचे फैलावामुळे या प्रकारात रूपांतर होते. उदा., ⇨ आंत्रपुच्छशोथ, अंडवाहिनीशोथ किंवा ⇨ पचनज व्रणाचे छिद्रण. या विकाराची सुरुवात स्थानिक पर्युदरशोथाने होते. प्रसृत पर्युदरशोथ बहुतकरून संक्रामणजन्य असतो. स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, न्यूमोकोकाय, बॅसिलस कोलाय, प्रोटियस, बॅसिलस पायोसायानिअस, बॅसिलस टायफोसस आणि बॅसिलस ट्युबरक्युलॉसिस हे  सूक्ष्मजंतू त्यास कारणीभूत असतात. अलीकडील संशोधनानुसार आंत्रमार्गाच्या खालच्या भागात नेहमी वास्तव्य करीत असलेल्या सहभोजी (परस्परांना फायदेशीर होईल असे सहकार्य करणाऱ्‍या) सूक्ष्मजंतूंपैकी ‘बॅक्टिरॉइड‌्स’ (टोके गोल असलेले सूक्ष्मजंतू) गटाचे सूक्ष्मजंतू पर्युदरशोथास कारणीभूत होतात, असे सिद्ध झाले आहे. सूक्ष्मजंतूंचे संक्रामण बाहेरून आंत्रमार्गात शिरलेल्या सूक्ष्मजंतूंमूळे आंत्रमार्ग यत्किंचितही दुखावलेला नसतानाही होऊ शकते. न्यूमोकोकायजन्य किंवा स्ट्रेप्टोकोकायजन्य संक्रामण बहुधा रक्तजन्य (सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहातून वाहत जाऊन शोथाच्या जागी पोहोचल्यामुळे) असते. कोणत्याही पर्युदराच्छादित अंतस्त्याच्या संक्रामणजन्य विकारामुळे पर्युदरशोथ उद‌्भवण्याची नेहमी शक्यता असते. नेहमी आढळणाऱ्‍या विकारस्थानांमध्ये पुढील भागांचा समावेश होतो : पचनजव्रण, शेषांत्रातील आंत्रज्वरातील (टायफॉइड रोगातील) व्रण किंवा क्षयरोगजन्य व्रण, बृहदांत्रातील आमांशजन्य व्रण व आंत्रपुच्छशोथ. यांशिवाय अंधवर्धशोथ (बृहदांत्राच्या सीमाभागात लहान लहान पिशव्या तयार होऊन त्यांत आंत्रातील निरुपयोगी पदार्थ साचून निर्माण होणारा शोथ), अंधवर्ध विदारण, यकृत विद्रधी (ऊतकनाशकामुळे तयार झालेल्या खळग्यात स्थानीय स्वरूपात पूजनक संक्रामण, पित्तमार्गाचे संक्रामण, प्लीहा विद्रधी किंवा अभिकोथ (रक्तपुरवठा बंद झाल्याने होणारा ऊतक मृत्यू), आंत्रांच्या वेधी (आरपार झालेल्या) जखमा व स्त्रीमध्ये अंडाशय, अंडवाहिनी आणि आणि गर्भाशय या अंतस्त्यांचा शोथही पर्युदरशोथाचे कारण असू शकतो. पित्तजन्य पर्युदरशोथ बहुतकरून पित्तमार्गावरील शस्त्रक्रियेनंतर (उदा., पित्ताशयोच्छेदन) उद‌्भवतो. पित्त पर्युदरगुहेत शिरल्यास ते प्रक्षोभकारक असून तीव्र पर्युदरशोथास कारणीभूत होते. उदरातील अंतस्त्यांवरील शस्त्रक्रियेनंतर पर्युदरशोथ उद‌्भवण्याची नेहमी शक्यता असते.


पर्युदरशोथाची लक्षणे स्थानीय व सार्वदेहिक स्वरूपाची असतात. स्थानीय लक्षणे पर्युदरशोथाबरोबरच दिसू लागतात. सार्वदेहिक लक्षणे कालांतराने उद‌्भवतात. वेदना सुरुवातीस स्थानीय असतात व नंतर सर्व उदरात पसरतात. वेदना एकसारख्या चालू राहणाऱ्‍या, खोकल्यासरशी वाढणाऱ्‍या व पोट दाबून न शमणाऱ्‍या असतात. छिद्रण विकृतीत त्या अतिशय जोरदार आणि असह्य असतात. त्या एकाएकीच सुरू होऊन अवसादोत्पादक (सार्वदेहिक प्रतिक्षोभ निर्माण करणाऱ्‍या) असतात. उलट्या बहुतकरून उशीरा सुरू होतात. त्या राहून राहून व ठराविक कालांतराने चालू राहतात. सुरुवातीस अन्न बाहेर पडते व नंतर हिरवट रंगाचा पित्तमिश्रित द्रव बाहेर पडतो. आंत्रमार्गात वायू साठून पोट फुगते. हाताने चाचपून तपासल्यास उदरभित्ती ताठ लागते. कधीकधी ठराविक जागी स्पर्शासह्यता आढळून येते. नाडीची गती वाढणे, रक्तदाब कमी होणे, श्वसनक्रिया पूर्णपणे वक्षीय बनणे इ. सार्वदेहिक लक्षणे आढळतात.

इलाजाकरिता रोग्यास ताबडतोब रुग्णालयात नेऊन ठेवणे जरूरीचे असते. या रोग्यांचे विद्युत् विच्छेद्य पदार्थांचे संतुलन नेहमी बिघडलेले असून रक्ताचे शरीरातील एकूण घनफळ कमी झालेले असते. त्याकरिता नीलेतून लवणद्रावाची अंतःक्षेपणे देतात. रक्तातील प्रथिने पर्युदरातून एकसारखी शोषिली जाऊन त्यांची कमतरता उत्पन्न होते. त्याकरिता रक्तद्रवाची नीलेतून अंतःक्षेपणे देतात. जठरात स्राव सारखा साचत राहू नये म्हणून नासा-जठर नलिकेद्वारे साचणारा स्राव सारखा काढून टाकतात. पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन किंवा टेट्रासायक्लीन यांसारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे उपयुक्त असतात. योग्य त्या वेळी शस्त्रक्रिया करून मूळ कारण काढून टाकतात. पर्युदरगुहेत साचलेले पू, मृत ऊतक आदी हानिकारक पदार्थ चूषण (खेचून घेणाऱ्‍या) उपकरणांनी काढून टाकतात. बॅक्टिरॉइड्स सूक्ष्मजंतू कारणीभूत असल्यास मेट्रोनिडाझोल, क्लिन्डामायसीन किंवा लिंकोमायसीन ही औषधे गुणकारी आहेत.

चिरकारी पर्युदरशोथ : हा प्रकार पुष्कळ वेळा तीव्र पर्युदरशोथाचा परिणामभूत विकार असतो. क्षयरोग आणि कर्करोग या रोगांत हा विकार परिणामभूत विकार म्हणून उद्भवतो. कधीकधी तो उपदंशजन्य किंवा जंतुविषरक्तताजन्यही (सूक्ष्मजंतू व त्यांच्यापासून तयार झालेली विषे रक्तात मिसळून निर्माण होणाराही) असतो. अधिहृषता (ॲलर्जी) हेही या रोगाचे एक कारण असू शकते. जलोदराच्या उपचाराकरिता वारंवार केलेला उदर पारवेध या विकराचे कारण असू शकते. चिरकारी आंत्रपुच्छशोथ, चिरकारी अंडवाहिनीशोथ, पित्ताशयशोथ व प्लीहेच्या काही विकृती यांच्या जवळच्या पर्युदरात स्थानीय स्वरूपाचा चिरकारी पर्युदरशोथ नेहमी आढळतो.

लक्षणांमध्ये वेदना, पोट सतत आवळल्यासारखे वाटणे, क्षुधानाश, बद्धकोष्ठ, उलट्या, अल्प प्रमाणात ज्वर वगैरेंचा समावेश होतो.

या विकाराचे फलानुमान (विकाराचे स्वरूप व लक्षणे विचारात घेतल्यास रोगी बरा होण्याची शक्यता) आशादायक नसते व कारण शोधून काढून त्यावर इलाज करतात. 

संदर्भ :1. Beeson, P. B. McDermot, W., Ed. Textbook of Medicine, Tokyo, 1975.

    2.Hamilton, W. J. Textbook of Human Anatomy, London, 1958.

    3.Rains, A. J. H. Ritchie, D. H., Ed. Bailey and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.

    4. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.

    5. Warwick, R. Williams, P.L., Ed. Gray’s Anatomy, London, 1973.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.