व्हिटवर्थ, सर जोझेफ : (२१ डिसेंबर १८०३–२२ जानेवारी १८८७). यांत्रिक हत्यारांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ब्रिटिश अभियंते, संशोधक व उत्पादक. इंग्लंडमधील स्टॉकपोर्ट (चेशर) येथे त्यांचा जन्म झाला. मँचेस्टरमध्ये विविध यंत्र-उत्पादकांकडे त्यांनी काम केले. लंडन येथील मॉडस्ले सन्स अँड फील्ड या अभियांत्रिकीय उद्योगातील प्रसिद्ध कंपनीत त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतले (१८२५ – ३३). १८३३ मध्ये मँचेस्टरला त्यांनी यांत्रिक हत्यारे बनविण्याचा उद्योग सुरू केला. १८४० – ५० या दशकात त्यांनी मूळ मापन यंत्र तयार केले व त्या अनुषंगाने अचूक परिणात्मक मानकांची प्रणाली किंवा प्रमाण मानके बनविली. पुढे रायफलीतील व बंदुकीतील अधिक अचूकतेसाठी त्यांनी १८५७मध्ये प्रयोग केले. त्यांनी संशोधलेली रायफल नॅशनल रायफल ॲसोसिएशनने (१८६०) व पुढे युद्धअधिकाऱ्यांनी स्वीकारली (१८६९). शस्त्रनिर्मितीत कठीण पोलादाऎवजी तन्य पोलाद वापरण्यासाठी त्यांनी तन्य पोलादाच्या ओतकामाची एक पद्धतही शोधून काढली. तथापि व्हिटवर्थ यांच्या एकूण काऱ्याचे विशेष महत्त्व हे त्यांनी यंत्रात आणलेली गुणवत्ता आणि कामातील व मापातील परिशुद्धी (काटेकोरपणा) व अचूकता यांतच आहे. त्यांची यांत्रिक हत्यारे अचूकता व गुणवत्ता यांसाठी १८५१पर्यंत जगभर मान्यता पावली. प्रचलित यंत्रांमध्ये सुधारणा करून १८५०च्या सुमारास त्यांनी सरळ दातांची, शंक्वाकारी व मळसूत्री दंतचक्रे तयार करणारी यंत्रे विकावयास सुरुवात केली. हाताने गज वाकविण्याचे जिम क्रो हे त्यांनी शोधलेले महत्त्वाचे यांत्रिक हत्यार आहे. व्हिटवर्थ यांनी ⇨ जेम्स नेस्मिथ यांच्या राधित्रात (शेपिंग यंत्र लहान सपाट पृष्ठभाग, खाचा इ. तयार करणारे यंत्र) सुधारणा करून त्यातील कर्तक हत्यार बसविण्याच्या वाशाच्या परतीच्या फेरीचा काल कमी केला. त्यामुळे प्रत्यक्ष कर्तनाचा काल वाढला व काम चांगले होऊ लागले. यंत्रांच्या चौकटी व बैठका यांच्यासाठी त्यांनी पेटीसारख्या पोकळ आकाराच्या छेदांची योजना केली. यामुळे त्या भागांचे भार सहन करण्याचे बल वाढले. व्हिटवर्थ यांनी स्क्रूचे प्रमाणभूत त्रिकोणी आटे सुरू केले व ते पुढे कायदेशीर मानले गेले. १८४१ साली हे आटे वूलईच आर्सेनल या दारुगोळा-कारखान्याने स्वीकारले. या आट्यांमुळे त्यांचे नाव अजरामर झाले. ०·००१ इंचापर्यंतची परिशुद्धी व इंचाचा दशलक्ष भाग मोजू शकणारे तुल्यक उपकरण आपल्या कारखान्यात बनवून त्यांनी मोठेच यश संपादन केले. [→ तंत्रविद्या ]. त्यांच्या अन्य प्रकारच्या संशोधनांत सुयांचे विणकाम करणारी यंत्रे (१८३५) व रस्ते साफ करणारे यंत्र (१८४२) यांचा उल्लेख करावा लागेल. १८५६ साली त्यांनी बनविलेले जलीय दाबयंत्र धातूच्या अवजड घडाईसाठी उपयुक्त ठरले. [→ धातुविज्ञान].
व्हिटवर्थ यांनी स्थापलेली कंपनी यांत्रिक हत्यारांच्या अभिकल्पनासाठी व उत्पादनासाठी प्रसिद्ध होती. पुढे मँचेस्टरमधील त्यांच्या कारखान्यांचे सर विल्यम आर्मस्ट्राँग यांच्या एल्सविक कारखान्यात विलीनीकरण झाले (१८९७).
माँटी कार्लो (मोनाको) येथे त्यांचे निधन झाले.