मॉडस्ले, हेन्री: (२२ ऑगस्ट १७७१–१४ फेब्रुवारी १८३१). इंग्लिश यांत्रिक अभियंते. धातुकामाच्या लेथचा व इतर प्रयुक्तींचा त्यांनी महत्त्वपूर्ण शोध लावल्याने त्यांना यांत्रिक हत्यारांच्या उद्योगाचे जनक मानण्यात येते.

मॉडस्ले यांचा जन्म केंटमधील वूलविच येथे झाला. तेथील दारूगोळ्याच्या कारखान्यात त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. १७८९ पासून ते जोझेफ ब्रामा यांच्या कुलपे बनविण्याच्या कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करू लागले. ब्रामा यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले कुलूप व द्रवीय दाबयंत्र [→ दाबयंत्र] विकसित करण्यात मॉडस्ले यांचा मोठा वाटा होता. लवकरच ते ब्रामा यांच्या कारखान्यात कार्यदेशक झालेपरंतु वेतनात वाढ देण्यास नकार मिळाल्याने त्यांनी १७९७ मध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटजवळ स्वतःचा व्यवसाय सुरू केला. १८०० सालाच्या सुमारास त्यांनी स्क्रू तयार करणारा लेथ तयार केला व त्यांनी स्क्रूच्या आट्यांचे मानकीकरण (प्रमाणीकरण) करण्यासाठी प्रारंभ केला. १८०१–०८ या काळात त्यांनी सर एम्. आय. ब्रनेल यांच्या जहाजांसाठी कप्पी संच तयार करण्याच्या कारखान्याकरिता यंत्रे (यांपैकी काही अद्यापही पोर्टस्मथ येथील जहाज बांधणीच्या गोदीत वापरात आहेत) बनविण्याचे काम केले. या यंत्रामुळे त्या काळी वार्षिक १७,००० पौंडांची बचत झाल्याचे दिसून आले. यानंतरच्या काळात मॉडस्ले यांनी औद्योगिक क्रांतीत मूलभूत महत्त्वाच्या ठरलेल्या कित्येक यंत्रांचा शोध लावला. यांपैकी धातुकामाच्या लेथचा शोध सर्वांत उल्लेखनीय आहे. त्यांनी कॅलिको कापड छपाई पद्धतीचा, तसेच जहाजांतील बाष्पित्रात (बॉयलरमध्ये) वापरण्यासाठी सागरी पाण्याचे निर्लवणीकरण करण्याच्या पद्धतीचा शोध लावला. त्यांनी ०·०००१ इंच इतके अचूक मापन करणारा सूक्ष्ममापकही १८३० च्या सुमारास तयार केला [→ तंत्रविद्या]. हत्यारांच्या मार्गदर्शनाकरिता यंत्रशाळेत आवश्यक असलेल्या अचूक सपाट पृष्ठांचे आत्यंतिक महत्त्व त्यांनीच प्रथम जाणले. आपल्या कारखान्यातील कारागिरांसाठी त्यांनी प्रमाणभूत अचूक सपाट पृष्ठे तयार केली होती. १८१० मध्ये त्यांनी जोशुआ फिल्ड यांच्या भागीदारीत लॅम्बथ येथे मॉडस्ले, सन्स अँड फिल्ड ही कंपनी सुरू केली. पुढे ही कंपनी नाविक इंजिनांच्या निर्मितीकरिता जगप्रसिद्ध झाली. जेम्स नेस्मिथ, सर जोझेप व्हिटवर्थ यांच्यासारख्या व्हिक्टोरियन काळात प्रसिद्धीस आलेल्या अभियंत्यांनी या कंपनीच्या कारखान्यात आपले व्यावसायिक शिक्षण घेतले होते. मॉडस्ले लंडन येथे मृत्यू पावले.

कुलकर्णी, सतीश वि.