नीरीज: ⇨ ॲनेलिडा (वलयी) संघाच्या ⇨ कीटोपोडा वर्गातील ⇨ पॉलिकीटा या गणातील एक समुद्री प्राणी. हा जगभर आढळणारा प्राणी असून याच्या विविध जाती वेला चिन्हांच्या (भरती व ओहोटी यांच्या सीमांच्या) मधील जागेत शैवलांमध्ये, दगडांखाली अथवा कधीकधी बिळात राहतात. ते विविध आकारमानांचे असून नीरीज व्हायरन्स या सगळ्यांत मोठ्या जातीच्या प्राण्यांची लांबी ४५ सेंमी. पर्यंत असते. हे कृमी भक्ष्य शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात.

आ.१. नीरीज : सबंध कृमी

शरीर ⇨ गांडुळासारखे लांब असून त्याचे समखंडन झालेले (सारखे खंड पडलेले) असते. ते वरून खाली दबलेले असते. डोके स्पष्ट असते. मुखावर अभिमुख (भाग न पडलेला तोंडाच्या पुढील भाग) असून त्यावर साध्या डोळ्यांच्या दोन जोड्या व त्याच्या टोकावर संस्पर्शकांची (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे, चिकटणे इ. कार्यांकरिता उपयुक्त असणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांची) एक जोडी असते. त्यांच्या दोन्ही बाजूंना एकेक जाड स्पर्शक असतो. पहिल्या खंडाला परिमुख (मुखाभोवतीची संरचना) म्हणतात याच्या प्रत्येक बाजूपासून चार संस्पर्शक निघालेले असतात. लहान कवचधारी (क्रस्टेशियन) आणि इतर प्राणी हे यांचे भक्ष्य होय. यांच्या ग्रसनीवर (मुखगुहेच्या लगेच मागे असलेल्या अन्ननलिकेच्या पुढच्या भागावर) असलेले दोन मजबूत व दाते असलेले कायटिनी जंभ (शृंगमय चिवट पदार्थाचे जबडे) ग्रसनीसुद्धा बाहेर काढून हे प्राणी भक्ष्य पकडतात. नंतर ग्रसनी आत ओढून घेतात. डोक्याच्या मागे प्रत्येक खंडाच्या दोन्ही बाजूंवर एक मांसल उद्वर्ध (पुढे आलेला भाग) असतो. ही चलनांगे असून त्यांना पार्श्वपाद (बाजूवरील पाय) म्हणतात. अग्र व पश्च टोकांजवळ पार्श्वपादांची चांगली वाढ झालेली नसते. परिमुख आणि अंतिम खंड यांवर पार्श्वपाद नसतात. शेवटच्या खंडावर रोमांची (राठ केसांची) एक जोडी व गुदद्वार असते.

शरीरावर उपत्वचेचे आवरण असते व देहभित्तीमध्ये (शरीराच्या भिंतीमध्ये) स्नायूंचे (वर्तुळ, अनुदैर्ध्य – म्हणजे शरीराच्या लांबीला समांतर – व तिरकस) कित्येक स्तर असतात. देहभित्ती व आहारनाल (अन्नमार्ग) यांच्यामध्ये देहगुहा (शरीराची पोकळी) असून तिचे आडव्या पडद्यांनी कोष्ठांत (कप्प्यांत) विभाजन झालेले असते आणि प्रत्येक कोष्ठ बाहेरच्या खंडाशी जुळणारा असतो. देहगुहा द्रवाने भरलेली असते. पडद्यांना असणाऱ्या छिद्रांतून हा द्रव पदार्थ एका कोष्ठातून दुसऱ्यात जाऊ शकतो.

आ.२. नीरीज : आंतरिक संरचना दाखविण्याकरिता पृष्ठीय देहभित्ती काढून टाकली आहे. (१) अभिमुख, (२) अभिमुख-संस्पर्शक, (३) स्पर्शक, (४) परिमुख-संस्पर्शक, (५) परिमुख, (६) पार्श्वपाद, (७) ग्रसनी, (८) ग्रसिका, (९) आंत्र, (१०) वक्कक, (११) तंत्रिकारज्जू, (१२) अधर वाहिनी, (१३) पृष्ठवाहिनी, (१४) ग्रसिका ग्रंथी.

आहारनाल सरळ असून त्याचे मुख, ग्रसनी, ग्रसिका (ग्रसनीपासून जठरापर्यंत जाणारा आहारनालाचा भाग) आणि आंत्र (आतडे) असे भाग असतात. ग्रसनी (जंभांसह) प्रकर्षक (लांबविणाऱ्या) स्नायूंच्या योगाने बाहेर काढता येते आणि प्रत्याकर्षक (आत ओढून घेणाऱ्या) स्नायूंनी आत ओढून घेता येते. ग्रसिकेच्या प्रत्येक बाजूला एक पचन ग्रंथी असून त्या ग्रसिकेत उघडतात. यांच्या स्रावाने अन्नाचे पचन होते.

नीरिजांचे रक्त लाल रंगाचे असून कित्येक रक्तवाहिन्यांतून त्याचा शरीराच्या सगळ्या भागांना पुरवठा होतो. आंत्राच्या वर एक मोठी अनुदैर्ध्य रक्तवाहिनी – पृष्ठवाहिनी – असून तिच्यात रक्त पुढच्या बाजूला वाहत जाते आंत्राच्या खाली दुसरी मोठी रक्तवाहिनी – अधरवाहिनी – असून तिच्यात रक्त पुढून मागे वाहत जाते. प्रत्येक खंडात या दोन्ही वाहिन्या जोडणाऱ्या दोन अनुप्रस्थ (शरीराच्या लांबीला लंब असलेल्या) रक्तवाहिन्या असतात. त्यांच्यापासून दोन पृष्ठीय (वरच्या) व दोन अधर (खालच्या) रक्तवाहिन्यांच्या जोड्या निघून त्या पार्श्वपादांकडे जातात आणि तेथे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या केशिकांचे (सूक्ष्मनलिकांचे) जाळे तयार होते. पार्श्वपाद श्वसनाचेही कार्य करतात.

प्रत्येक खंडात (पहिला व शेवटचा खंड सोडून) वृक्ककांची (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांची) एक जोडी असून ती उत्सर्जनाचे (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे) कार्य करते. वृक्ककाचे आतले टोक एका पक्ष्माभिकायुक्त (केसांसारख्या वाढींनी युक्त) नसराळ्याने देहगुहेत उघडते आणि बाहेरचे टोक पार्श्वपादाच्या बुडाशी अधर पृष्ठावर एका छिद्राने बाहेर उघडते. या छिद्रातून निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकले जातात.

नीरिजाचे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) गांडुळाच्या तंत्रिका तंत्रासारखेच असते. डोक्यात ग्रसनीच्या वर दोन गुच्छिकांचा (ज्यांपासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांच्या समूहाचा) बनलेला मेंदू असतो. हा दोन संयोजकांनी अधोग्रसिका (ग्रसिकेखालील) गुच्छिकांच्या जोडीला जोडलेला असतो. अधोग्रसिका गुच्छिकांपासून निघून सर्व खंडांतून मागच्या टोकापर्यंत गेलेली एक दुहेरी अधर तंत्रिकारज्जू (तंत्रिकांचा दोरीसारखा जुडगा) असते. प्रत्येक खंडात हिच्यावर एक गुच्छिका असते. मेंदूपासून डोक्याच्या पुढच्या भागाला आणि प्रत्येक खंडातील गुच्छिकेपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना तंत्रिका गेलेल्या असतात. मेंदूपासून आहारनालाच्या अग्र भागाला गेलेल्या तंत्रिकांचे बनलेले मुख जठर-तंत्रिका तंत्र असते. संस्पर्शक, स्पर्शक आणि रोम ही यांची स्पर्शग्राही ज्ञानेंद्रिये होत. डोळे साधे असतात. अभिमुखाच्या पश्च भागाजवळ मेंदूशी निकट संबंध असणारे दोन पृष्ठीय खळगे असतात. यांना ग्रीवापृष्ठीय अंगे म्हणतात व ही घ्राणेंद्रिये असावीत, असा समज आहे.

लिंगे भिन्न असतात. प्रजोत्पत्तीच्या काळात प्रत्येक खंडातील (अग्र टोकाजवळील खंड वगळून) देहगुहेच्या भित्तींपासून अंडाणू (स्त्री-जनन कोशिका) अथवा शुक्राणू (पुं-जनन कोशिका) उत्पन्न होतात. वृक्ककांच्या बाह्य रंध्रांतून ते बाहेर पडतात. अंड्यांचे निषेचन (फलन) पाण्यात होते. निषेचित अंड्यातून ट्रोकोफोर नावाचा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील अवस्था) बाहेर पडतो व त्याच्या रूपांतरणाने (डिंभावस्थेपासून प्रौढावस्था येईपर्यंत रूप व संरचना यांत होणाऱ्या बदलांनी) नीरीज कृमी तयार होतो.

कर्वे, ज. नी.