वॉशबर्न, मार्गारेट फ्लॉय : (२५ जुलै १८७१-२९ ऑक्टोबर १९३९). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क शहरी. व्हॅसर कॉलेजमधून ए. बी. (बॅचलर ऑफ आर्ट्स) झाल्यानंतर मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी तिने कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला व तेथे ब्रिटिश-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨एडवर्ड ब्रॅडफर्ड टिचनर (१८६७-१९२७) ह्याच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करण्याची संधी तिला मिळाली. १८९४ साली कॉर्नेल विद्यापीठातून तिने पीएच्. डी. मिळविली. मानसशास्त्रात पीएच्. डी मिळविणारी ती पहिली स्त्री.

पीएच्. डी झाल्यावर वेल्स कॉलेज, कॉर्नेल विद्यापीठ अशा काही ठिकाणी तिने अध्यापन केले. त्यानंतर १९०३ पासून व्हॅसर कॉलेजमध्ये ती मानशास्त्राचे अध्यापन करू लागली ⇨वर्तनवाद आणि मानसशास्त्राच्या अन्य शाखा ह्यांच्यात मध्यममार्गी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिने केला. वर्तनाबरोबर जाणीव हाही मानसशास्त्राचा विषय होय, असे तिचे प्रतिपादन होते. द ॲनिमल माइंड (१९०८) हा तिचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

तिला अनेक सन्मान मिळाले. १९२१ साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ चे अध्यक्षपद तिला देण्यात आले. पुढे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ चे उपाध्यक्षपद तिला मिळाले (१९२७). ह्याच वर्षी व्हिटन्बेर्क कॉलेजकडून तिला डी. एससी. बहाल करून तिचा सन्मान करण्यात आला. तसेच त्या वेळी तिच्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी तर्फे तिच्या सन्मानार्थ मानसशास्त्रावरील निबंधांचा एक खंडही प्रकाशित करण्यात आला. १९२९ मध्ये ‘सोसायटी ऑफ इक्सपेरिमेंटल सायकॉलॉजिस्ट्‌स’चे आणि १९३१ मध्ये ‘नॅशनल अकॅडॅमी ऑफ सायन्सिस ’चे सदस्यत्व तिला देण्यात आले.

न्यूयॉर्क राज्यातील पकिप्सी येथे ती निधन पावली.

कुलकर्णी, अ. र.