चिमोरा : आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघाच्या क्रस्टेशिया (कवचधारी प्राण्यांच्या) वर्गातील डेकॅपोडा गणातील हा प्राणी असून नद्या, ओढे, तलाव, तळी इत्यादींच्या गोड्या पाण्यात राहणारा आहे. काही चिमोरे दलदलीत खोल बिळे करून त्यांत राहतात. कित्येक जाती गुहांत राहणाऱ्या आहेत. इतर जातींपेक्षा यांचे शरीर लहान, सडपातळ व पारभासी (अर्धवट पारदर्शक) असते. यांच्या शरीरात वर्णक (रंग) नसतो व ते आंधळे असतात. चिमोऱ्यांचे कित्येक वंश आणि अनेक जाती असून त्या यूरोप, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये आढळतात. ॲस्टॅकस फ्लुव्हिॲटिलिस  ही एक विशेष माहीत असलेली जाती होय.

चिमोरा (ॲस्टॅकस फ्लुव्हिॲटिलिस)

कायटिनमय बहिःकंकाल (बाहेरचा सांगाडा), युग्मित संधियुक्त (जोड असलेली) उपांगे आणि रुधिरगुहा (खऱ्या देहगुहेची जागा घेणारा रुधिर तंत्राचा फैलावलेला भाग) ही आर्थ्रोपोडा संघाची विशेष लक्षणे चिमोऱ्यात स्पष्टपणे दिसून येतात. शरीराचे शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग) आणि उदर असे दोन भाग पडतात. शीर्ष आणि वक्ष या दोहोंच्या सायुज्यनाने (एकीकरणाने) शिरोवक्ष हा भाग बनलेला असतो. उदराचे सहा खंड पडलेले असतात आणि त्याच्या पश्च (मागील) टोकावर एक चपटा पुच्छखंड असतो. शीर्ष पाच खंडाचे आणि वक्ष आठ खंडाचे बनलेले असते परंतु हे खंड इतके एकरूप झालेले असतात की, त्यांचे कोणतेही बाह्य चिन्ह मुळीच दिसत नाही. प्रत्येक खंडावर उपांगांची एक जोडी असते. शिरोवक्षाच्या शीर्ष भागावर आखूड लघुशृंगिकांची (सांधे असणाऱ्या लहान स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, लांब शृंगिकांची (जोड असलेल्या स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, त्यांच्या मागे जंभांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्या संरचनांची) एक जोडी व तिच्या मागे जंभिकांच्या (ज्यांचे विविध कार्यांकरिता अनेक प्रकारे रूपांतर होते अशा उपांगांच्या) दोन जोड्या अशा उपांगांच्या एकंदर पाच जोड्या असतात.वक्षावर उपांगांच्या एकंदर  ‌अाठ जोड्या असतात  त्यापैकी पहिल्या तीन जोड्या जंभपादांच्या (अन्न मुखाकडे नेणाऱ्या उपांगांच्या) असून त्यांच्या मागे नखरपादांची (नखर असलेल्या पायांची) एक जोडी असते. नखरपाद मजबूत असून त्याच्या टोकावर चिमट्यासारखा मोठा नखर (नखी) असतो. त्याचा उपयोग आक्रमण व स्वसंरक्षण या दोहोंकरिता होतो. नखर पादांच्या मागे चालण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या पायांच्या चार जोड्या असतात. उदरावर उपांगांच्या सहा जोड्या असून त्यांपैकी पहिल्या पाचांना प्लवपाद (पोहण्याकरिता उपयोगी पडणारे अवयव) आणि सहाव्या जोडीला पुच्छपाद म्हणतात. उदरावरील या सर्व जोड्यांचा पोहण्याच्या कामी उपयोग होतो. पुच्छपाद तुलनेने बरेच मोठे असून ते आणि पुच्छखंड मिळून एक समर्थ प्लवांग (पोहण्याच्या उपयोगी पडणारे अंग) -पुच्छपक्ष बनलेले असते. नरामध्ये पहिल्या दोन प्लवपादांच्या परिवर्तनाने मैथुनांग बनलेले असते. चिमोऱ्याच्या उपांगांचे परिवर्तन हे क्रमिक समजाततेचे (इंद्रियाच्या किंवा भागांच्या संरचनेत आणि विकासात असणाऱ्या साम्याचे) एक उत्तम उदाहरण होय.

गोगलगाई, कृमी, कीटक, शैवले आणि इतर वनस्पती हे चिमोऱ्याचे भक्ष्य होय. जंभपाद आणि जंभिका यांच्या साहाय्याने अन्न मुखाकडे नेले जाते आणि तेथे जंभांच्या योगाने त्याचे तुकडे होऊन ते मुखात जाते. मुख एका आखूड ग्रसिकेत (ग्रसनी म्हणजे घसा आणि जठर यांच्या मध्ये असणाऱ्या मुखापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या म्हणजे आहारनालाच्या भागात) उघडते व ती जठरात उघडते. जठराचे दोन भाग असतात. एक मोठा अग्र (हृदीय) भाग आणि दुसरा लहान पश्च (जठर निर्गमी) भाग. अग्र भागात जठरपेषणी (अन्न दळण्याकरिता जठरात असणारी संरचना) असून तिच्यातील एक मध्य आणि दोन पार्श्व (बाजूच्या) दातांनी अन्न दळले जाते. दळलेले अन्न केसांच्या गाळणीतून पुढे जाते. पचन ग्रंथी (यकृत) दोन असून त्यांचा स्त्राव दोन वाहिन्यांमधून मध्यांत्रात (आहारनालाच्या मधल्या भागात) येऊन अन्नात मिसळतो व त्यामुळे अन्नाचे पचन होते. आंत्र (आतडे) सरळ आणि साधे असून ते गुदद्वाराने बाहेर उघडते.

प्रत्येक शृंगिकेच्या बुडाजवळ एक याप्रमाणे दोन हरित ग्रंथी असून त्या नायट्रोजनयुक्त क्षेप्यद्रव्ये (निरुपयोगी पदार्थ) बाहेर टाकण्याचे कार्य करतात.

क्लोम (कल्ले) ही चिमोऱ्याची श्वसनेंद्रिये होत. शिरोवक्षाच्या दोन्ही बाजूंना एकेक क्लोम-कक्ष असून त्यात प्रत्येकी क्लोमांच्या तीन ओळी असतात. क्लोम-कक्ष क्लोमावरकांनी (क्लोम- कक्षावरच्या झाकणांनी) झाकलेले असतात. क्लोम-क्षात पाणी मागच्या बाजूने शिरते आणि दुसऱ्या जंभिकेच्या (हिचे परिवर्तन झालेले असते) एकसारख्या हालचालींमुळे क्लोम-कक्षातून ते बाहेर ढकलले जाते. अशा तऱ्हेने क्लोम-कक्षात पाण्याचा प्रवाह सतत चालू असतो.

रुधिर परिवहन तंत्र (रुधिराभिसरण तंत्र) विवृत (उघडे) असते. पृष्ठीय हृदयातील रक्त सात रोहिण्यांमधून सगळ्या शरीराला पुरविले जाते. शिरा नसतात. रक्त लहान कोटरांत (खळग्यांत किंवा गुहिकांत) गोळा होऊन अखेरीस एक मोठ्या कोटरात जाते. तेथून ते क्लोमांत जाऊन ऑक्सिजनीकृत होऊन (ऑक्सिजन घेऊन) परत हृदयात जाते.

तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) पुष्कळसे गांडुळाच्या तंत्रिका तंत्रासारखे असते. शीर्षात वरच्या बाजूला एक गुच्छिका पुंज अथवा मेंदू असून तो दोन परिग्रसिका संयोजकांनी (दुसऱ्या गुच्छिकांना जोडणाऱ्या, ग्रसिकेच्या भोवती असणाऱ्या तंत्रिकांनी) अधर तंत्रिका रज्जूच्या पुढच्या टोकावरील अधोग्रसिका गुच्छिकेला (ग्रसिकेच्या खाली असणाऱ्या गुच्छिकेला) जोडलेला असतो. तंत्रिका रज्जू दुहेरी असून तिच्या वर खंडयुत मांडणी असलेल्या गुच्छिका असतात व त्यांच्यापासून तंत्रिका निघालेल्या असतात. यांशिवाय एक आंतरांग (शरीरातील पोकळ्यांत असणाऱ्या इंद्रियांविषयीचे) तंत्रिका तंत्र असते. मेंदूपासून निघालेली एक तंत्रिका आणि तिला जोडलेल्या परिग्रसिका संयोजकापासून निघालेल्या दोन तंत्रिका यांचे ते बनलेले असते. याच्यापासून जठराच्या लहान पश्च भागाला तंत्रिका गेलेल्या असतात.

लिंगे भिन्न असतात. मादी आपली अंडी प्लवपादांना चिकटविते व उदराखाली त्यांचा एक मोठा पुंजका तयार होतो. मैथुनाचे वेळी नर शुक्राणू (नराच्या पक्व जनन-कोशिका वा पेशी) मादीच्या वक्षाच्या अधर पृष्ठावर चिटकवितो. या शुक्राणूंमुळे अंड्यांचे निषेचन (अंडे व शुक्राणू यांचा संयोग होणे) होते. अंडी ५-६ आठवड्यांत फुटून पिल्ले बाहेर येतात व ती दिसायला प्रौढांसारखीच असतात. कित्येक आठवडे ती आईलाच चिकटलेली असतात. कित्येक निर्मोचनानंतर (कात टाकल्यानंतर) ती हळूहळू मोठी होत जातात आणि एक वर्षाची झाल्यावर त्यांची लांबी सुं. ५-६ सेंमी. होते. चिमोरे सामान्यतः ३–५ वर्षे जगतात.

चिमोरे पुष्कळ माशांचे भक्ष्य आहे. पुष्कळ देशांत मनुष्य त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतो.

पहा : आर्थोपोडा जठरपेषणी डेकॅपोडा शेवंडा.  

कर्वे, ज. नी. जमदाडे, ज. वि.