माचवे, प्रभाकर : (२६ डिसेंबर १९१७ – ). मराठी मातृभाषा असूनही हिंदीत सर्जनशील व वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे दर्जेदार लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक. जन्म ग्वाल्हेर येथे. प्रारंभीचे शिक्षण रतलाम व इंदूर येथे. उच्च शिक्षण आग्रा विद्यापीठात. तत्त्वज्ञान व इंग्रजी साहित्य ह्या दोन्ही विषयांत ते एम्. ए. (अनुक्रमे १९३६ व १९४३) झाले. १९५८ मध्ये त्यांनी हिंदी साहित्यात पीएच्.डी. घेतली. ‘हिंदी और मराठी के निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन’ हा त्यांच्या डॉक्टरेट-प्रबंधाचा विषय होता. १९४० मध्ये म. गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमात त्यांचा विवाह झाला. त्यांनी उज्जैन येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९३८–४८). आकाशवाणीवर १९४८–५४ ह्या कालावधीत निर्माते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भाषाविषयक समितीचे विशेष अधिकारी (१९६४–६६) साहित्य अकादेमीचे वरिष्ठ सहायक सचिव (१९५४–६४ व १९६६–७१) आणि सचिव (१९७१–७५) ह्या महत्त्वाच्या जागांवर त्यांनी काम केले. अमेरिकेतील विस्कॉन्सिन व कॅलिफोर्निया विद्यापीठांत (१९५९–६१) तसेच श्रीलंका व जर्मनीत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. सध्या ते कलकत्ता येथे भारतीय भाषा परिषदेचे संचालक आहेत. १९७२ मध्ये त्यांना ‘सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ आणि १९७५ मध्ये उत्तर प्रदेश शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी रशिया, बल्गेरिया, बांगला देश इ. देशांचा प्रवास केला.

हिंदी, इंग्रजी, मराठी व इतर काही भारतीय भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून ह्या भाषांतील साहित्याचा त्यांचा तुलनात्मक व सखोल अभ्यासही आहे. त्यांनी हिंदी शिवाय इंग्रजी व मराठीतही काही ग्रंथ लिहिले आहेत. हिंदीत त्यांनी काव्य, कथा-कादंबरी, एकांकिका, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, समीक्षा, अनुवाद इ. प्रकारांत विपुल लेखन केले असून त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या ऐशीवर भरते. ‘अज्ञेय’ यांनी संपादित केलेल्या तार सप्तक (१९४३) ह्या प्रतिनिधिक काव्यसंग्रहात प्रमुख नवोदित कवी म्हणून माचवे यांच्या काही कविता संगृहीत आहेत. हिंदी काव्यातील नव्या प्रवाहांशी त्यांचा निकटचा संबंध असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्यिक चळवळी व घडामोडी यांविषयी ते जागरूक असतात. हिंदीतील ‘प्रयोगवादी’ व ‘नई कविता’ यांतील माचवे यांचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या अनेक ग्रंथांची भाषांतरे भारतीय व विदेशी भाषांत झाली आहेत.

त्यांची उल्लेखनीय ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : काव्य–स्वप्नभंग (१९५७), अनुक्षण (१९५८), मेपल (१९६३) कथा–संगीनो का साया (१९४३) कांदबरी–परंतु (१९४१), द्वाभा (१९५८), साँचा (१९५८), एक तारा (१९५८), जो (१९६५), तीस-चालीस-पचास (१९७३), दर्द के पैबंद (१९७४) एकांकिका-गली की मोड पर (१९५८) निबंध–खरगोश के सिंग (१९५०) समीक्षा–जैनेंद्र के विचार (१९३७), नाट्य चर्चा (१९५१), समीक्षा की समीक्षा (१९५२), व्यक्ति और वाङ्‌म(१९५२), मराठी और उसका साहित्य (१९५२), संतुलन (१९५४), हिंदी और मराठी निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन (१९६३) इत्यादी. जगजीवनराम : व्यक्ती आणि विचार (१९७७) हा त्यांचा मराठी भाषेतील चरित्रपर ग्रंथ होय.

संदर्भ : बुधकर, कमलाकांत जायस्वाल, शिव, संपा. अक्षर अर्पण (माचवे अभिनंदन ग्रंथ), हरिद्वार, १९७७.

बांदिवडेकर, चंद्रकांत