मतिराम : (सु. १६०३ – सु. १६९९). ब्रज भाषेत रचना करणारा रीतिकालीन प्रख्यात हिंदी कवी. तो कानपूर जिल्ह्यातील तिकवाँपुर (त्रिविक्रमपूर) येथील रहिवासी. रत्नाकर त्रिपाठी यांच्या चार पुत्रांपैकी भतिराम हा एक होय. प्रसिद्ध आचार्य – कवी चिंतामणी त्रिपाठी व कवी ⇨ भूषण हे मतिरामचे भाऊ होत. काही अभ्यसकांच्या मते तो काश्यपगोत्री कान्यकुब्ज त्रिपाठी ब्राह्मण होता, तर काहींच्या मते तो वत्सगोत्री होता.

फूलमंजरी हा त्याचा सुरुवातीचा काव्यग्रंथ असून तो त्याने मोगल सम्राट जहांगीर याच्या आज्ञेवरून आग्रा येथे लिहिला. त्याची रचना १६२१ च्या सुमारास झाली असावी. यातील प्रत्येक दोह्यात एका फुलाचे नाव व श्लेषार्थाने नायिकेचेही नाव त्याने गुंफले आहे.

मतिरामचे बहुतेक आयुष्य बुंदी येथील हाडा वंशीय राजाच्या दरबारात व्यतीत झाले. ललितललाम हा अलंकारशास्त्रावरील आपला ग्रंथ त्याने बुंदी दरबारात दिवान भावसिंह याच्या आश्रयास असताना लिहिला. त्यात त्याने राव सूरजन, राव राजा भोज, रतनसिंह, छत्रसाल, भावसिंह इ. राजांचे गुणवर्णन केले. विषयप्रतिपादनाच्या अनुषगाने त्याचा रचनाकाल सु. १६६३ मानला जातो. त्याने लिहिलेला सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ रसराज हा असून त्यात श‌ृंगाररस आणि नायक – नायिकाभेद याचे वर्णन आढळते. बिहारीकृत सतसईप्रमाणेच रीतिकालीन ग्रंथांमध्ये मतिरामचा रसराज हा ग्रंथ प्रख्यात आहे. त्याचा रचनाकाल १६३३ – ४३ या दरम्यानचा असावा. ऐन तारूण्यात त्याने तो लिहिला. कोणाही आश्रयदात्याची प्रेरणा नसलेला हा त्याचा स्वतंत्र ग्रंथ. त्यातील नायकनायिका चतुर, विदग्ध, सुसंस्कृत व भावनाशील आहेत. त्यात त्याची प्रतिमा, कल्पकता, अलंकारकौशल्य, छंदावरील प्रभुत्व इत्यादींचा उत्कट प्रत्यय येत असल्याने रसिकांच्या गळ्यातील ‘रत्‍नहार’ म्हणून तो गौरविला जातो. त्यावर अनेक टीकाही लिहिल्या गेल्या आहेत.

सतसई ही काव्यकृती दोह्यांमध्ये असून बिहारी – सतसईच्या प्रेरणेतून १६८३ च्या सुमारास त्याने त्याचे संकलन केले. मतिरामने सतसईचे संकलन कोणा भोगनाथ राजाच्या आज्ञेवरून केले. सतसईची भाषा रसाळ व मधुर अशी ब्रज आहे. त्यात मुख्यत्वे श‌ृंगार व नीती हे विषय आहेत. प्रेम, नायिकाभेद, रूपसौंदर्य, विरह इत्यादींवर ललित्यपूर्ण व कल्पकतापूर्ण असे दोहे त्यात आहेत.

मतिरामचे हे चारही ग्रंथ महत्त्वपूर्ण असले, तरी रसराज आणि ललितललाम यांमुळेच त्याची विशेष ख्याती झाली. रीतिकालीन कवींमध्ये एक श्रेष्ठ कवी म्हणून त्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

भगीरथ मित्र यांनी वरील महाकवी मतिरामशिवाय वृत्तकौमुदीची रचना करणारा आणखी एक मतिराम कवी असल्याचे म्हटले आहे. या मतिरामच्या वडिलांचे नाव विश्वनाथ असून तो वत्सगोत्रीय त्रिपाठी ब्राह्मण होता. त्याचे निवासस्थान तिकवाँपुरजवळील फतेहपुर जिल्ह्यातील बनपुर हे होते. त्याचे ग्रंथ अलंकार पंचाशिका, साहित्यसार, लक्षण – श‌ृंगार आणि छंदसार वा वृत्तकौमुदी हे मानले जातात. वृतकौमुदीचा रचनाकाल १७०१ च्या सुमाराचा मानला जातो. पहिल्या मतिरामप्रमाणे तो प्रतिभासंपन्न असा श्रेष्ठ कवी खचितच नाही.

संदर्भ : १. महेंद्रकुमार, मतिराम – कवि और आचार्य, दिल्ली, १९६०.

२. मिश्र, कृष्णबिहारी, संपा. मतिराम ग्रंथावलि, लखनौ, १९६१.

३. सिंह, त्रिभुवन, महाकवि मतिराम और मध्यकालीन हिंदी कविता में अलंकरणवृत्ति, वाराणसी, १९६०.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.