महावीरप्रसाद द्विवेदी

द्विवेदी, महावीरप्रसाद : (१५ मे १८६४-११ डिसेंबर १९३८). प्रसिद्ध हिंदी साहित्यिक  व संपादक. महावीरप्रसाद द्विवेदी हे मौलिक साहित्यनिर्मिती करणारे स्वतंत्र प्रतिभेचे लेखक नसले, तरी आपल्या संपादनाच्या व कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप हिंदी साहित्यावर उमटविली आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर गावी झाला वडिलांचे नाव रामसहाय. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण गावीच झाले. नंतर ते शिक्षणासाठी रायबरेली येथे गेले. तेथे त्यांना फार्सी शिकावे लागले. उन्नाव, फतेपुर व मुंबई येथे त्यांनी शिक्षण घेतले. मुंबईस त्यानी संस्कृत, इग्रंजी, मराठी व गुजराती भाषांचा अभ्यास केला. नंतर काही काळ त्यांनी नागपूर, अजमेर, मुंबई, झांशी इ. ठिकाणी रेल्वेत नोकरी केली परंतु स्वाभिमानाला झळ लागताच ते नोकरी सोडून सरस्वती मासिकाचे संपादक म्हणून काम पहावे लागले १९०३-२० या काळात त्यांनी सरस्वती या दर्जेदार मासिकाचे संपादन केले व अनेक प्रतिभावंतांना उत्तेजन देऊन लेखक बनविले. त्यामुळे या कालखंडाला ‘द्विवेदी युग’ असे म्हटले जाते. १९२० मध्ये सरस्वतीचे संपादकत्व सोडून ते स्वतःच्या गावी जाऊन शांत जीवन जगू लागले. रायबरेली तेथे त्याचे निधन झाले.

संपादक या नात्याने त्यांची कामगिरी विशेष मोलाची आहे. तरुण लेखकांना उत्तेजन देऊन त्यांना अविरत लेखनसाधना करण्याची स्फूर्ती त्यांनी दिली. महाकवी मैथिलीशरण गुप्तांनी त्यांचे हे ऋण मान्य केले आहे. हिंदी गद्य त्यावेळी अव्यवस्थितपणे लिहिले जात होते. व्याकरणाच्या निश्चित नियमांनुसार गद्य लिहिले जावे, यासाठी त्यानी खुप परिश्रम घेतले. विरामचिन्हे, परिच्छेद वगैरे बाबींविषयी ते चोखंदळ होते. स्थानिक शब्दांच्या ऐवजी तत्सम शब्द वापरून भाषेला साहित्यिक दर्जा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हिंदी काव्य मुख्यतः परंपरेने व्रज भाषेत लिहिले जाई व खडीबोले (गद्याची भाषा) काव्याला फारशी अनुकूल नाही, असे कवींचे सामान्यतः मत होते. द्विवेदीनी खडीबोलीत काव्य लिहिण्याचा आग्रह धरून काव्याची भाषा व गद्याची भाषा यांत असलेले द्वंद्व वा अंतर निपटून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. खडीबोली काव्यानुकूल बनविण्यात द्विवेदींचा वाटा मोठा आहे, हे निर्विवाद आहे. हिंदी भाषा व साहित्य सामर्थ्यसंपन्न व समृद्ध व्हावेत, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजी, फार्सी, संस्कृत, बंगाली, वगैरै भाषांतून श्रेष्ठ साहित्य हिंदीमध्ये आणण्यासाठी त्यांनी स्वतः अनेक ग्रंथांचे अनुवाद केले व इतराकडूनही ते करवून घेतले. ते चांगले संकलनकर्ते होते. संग्रहप्रियतेच्या गुणामुळे मौलिक प्रतिभा नसतानाही ते युगनिर्माते बनले. इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, राजकारण, चरीत्रे, समाजकारण इ. विविध विषयांवरचे उत्तमोत्तम लेखन हिंदीत व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता.

द्विवेदींचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यनिर्मितीपेक्षा मोठे होते. ते विद्याव्यसनी होते आणि हिंदी वाचकांच्या अभिरुचीचा दर्जा वाढावा अशी त्यांची आकांक्षा होती. त्याच दृष्टीने त्यांनी अविरत परिश्रम केले. त्यांच्या लेखनात व त्या काळच्या लेखनात उपदेशात्मकता, आस्तिक्य, न्यायनिष्ठा, समाजसुधारणेची तळमळ, रंजकतेपेक्षा बोधवादाकडे कल, गांभीर्य, संयम, नैतिक मुल्यांचा पुरस्कार, राष्ट्रीय भावना इ. वैशिष्ट आढळतात. त्यांनी अनुवाद केले, काव्य लिहिले, काव्यचर्चा केल्या, समीक्षणे लिहिली, निबंधलेखन केले परंतु आज त्याच्या कार्याचे मूल्यमापन करताना त्याच्या लेखनापेक्षा त्यांनी हिंदी साहित्यास दिलेल्या प्रेरणांचे ऐतिहासिक महत्त्व विशेष मानले जाते.

 

त्यांच्या स्वतंत्र व अनुवादित गद्य-पद्य ग्रंथांची संख्या ८० च्या वर भरते. त्यानी स्वतंत्रपणे लिहिलेल्या गद्यग्रंथांची संख्याच सु. ५० भरते. काव्याकडे त्यांचा विशेष ओढा नव्हता, तरीही त्यांनी ८ अनुवादित व ९ स्वतंत्र काव्यग्रंथ रचले. हिंदीतील नव्या युगाचे आचार्य म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. १९०३-२० ह्या काळात त्यांनी हिंदी साहित्याचे उत्तम नेतृत्व केरून ‘स्वतःचे युग’ निर्माण केले.

संदर्भ : सिंह, उदयभानू, महाविरप्रसाद द्विवेदी और उनका युग, लखनौ,१९५१.

बांदीवडेकर, चंद्रकांत