प्राण्यांचेवर्गीकरण: निरनिराळ्या प्राण्यांचा पद्धतशीरपणे अभ्यास करण्यासाठी काही मूलभूत शास्त्रीय तत्त्वे विचारात घेऊन त्यांचे वर्गीकरण आवश्यक आहे. प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचे पहिले प्रयत्न ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) या ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी केले. याकरिता त्यांनी प्राण्यांचे साम्य-भेद विचारात घेतले होते. नंतर ⇨ जॉनरे (१६२७-१७०५) या ब्रिटिश जीवशास्त्रज्ञांनी आधुनिक वर्गीकरण पद्धती सुचविली. ⇨ कार्ललिनीअस (१७०७-७८) या स्विडीश शास्त्रज्ञांनी प्राण्यांची द्विपद नामपद्धती आणि वर्गीकरण पद्धती प्रथम प्रचारात आणली. १७३५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लिनीअस यांच्या Systema Naturae या ग्रंथात दिलेली वर्गीकरण पद्धती सध्या प्रचलित असलेल्या वर्गीकरण पद्धतीचा मूळ आधार समजली जाते. लिनीअस यांच्या काळापर्यंत प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या ⇨ आकारविज्ञानावर आधारित होते. चार्लस् डार्विन यांनी क्रमविकासाची (उत्क्रांतीची) कल्पना पुढे मांडल्यावर या दृष्टिकोणातून वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली यास जातिवृत्तीय दृष्टिकोण म्हणता येईल [⟶ जातिवृत्त]. यानंतर आनुवंशिकी शास्त्रात जसजशी प्रगती होऊ लागली तसतसा या शास्त्राचाही वर्गीकरणावर प्रभाव पडू लागला. या सर्व दृष्टिकोणांच्या मुळाशी प्राण्यांच्या शरीररचनेचा तौलनिक अभ्यास हे मूलतत्त्व आहे. उच्च स्तरावर वर्गीकरण करताना तीन प्रकारचे दृष्टिकोण प्रामुख्याने विचारात घेतले जातात. पहिल्या दृष्टिकोणात प्राण्यांच्या शरीररचनेतील सारखेपणा विचारात घेतला जातो. याला प्राणिसाधर्म्य असे म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात या साधर्म्यास गौण स्थान दिले आहे. यात प्रामुख्याने जातिवृत्त व वंशावळ यांचा विचार केला जातो. या रीतीने केलेल्या वर्गीकरणात व प्राणिसाधर्म्य लक्षात घेऊन केलेल्या वर्गीकरणात पुष्कळ फरक आढळतो. नेहमीच्या वर्गीकरणाप्रमाणे ॲलिगेटर व मगर हे सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांत समाविष्ट केले जातात पण जर जातिवृत्त व वंशावळ यांच्या निकषावर या प्राण्यांचे वर्गीकरण केले, तर ते इतर सरीसृप प्राण्यांपासून वेगळे काढून पक्षिवर्गाच्या गटात आणावे लागतील. क्रमविकासनिष्ठ दृष्टिकोणात वरील दोन्हीही पर्यायांची तडजोड करून वर्गीकरणाचा आराखडा तयार केला आहे आणि हाच आराखडा प्रचलित वर्गीकरणात सर्वसाधारणपणे मान्यता पावला आहे.

 

प्रथमतः जीवसृष्टी दोनच गटांत विभागली जात असे. हे दोन गट म्हणजे वनस्पती व प्राणी पण नंतर जेव्हा सूक्ष्मजंतूंचा व इतर आदिजीवांचा शोध लागला तेव्हा हे जुने वर्गीकरण अपुरे पडू लागले. वर्गीकरणाच्या भिन्न कल्पना सुचविण्यात आल्या. याबाबत अजूनही शास्त्रज्ञांचे एकमत झालेले नाही परंतु नवीन पद्धतीची आवश्यकता सर्वांनाच पटली आहे.

 

या संदर्भात जर्मन प्राणिशास्त्रज्ञ ई. एच्. हेकेल यांनी १८६६ साली असे सुचविले की, जे जीव प्राणी किंवा वनस्पती यांच्यात विभागता येत नाहीत त्यांचा ‘प्रोटिस्टा’ या वेगळ्या गटात समावेश करावा. या वर्गीकरणाप्रमाणे या गटात एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीचे बनलेले आहे असे) आणि ज्यांत अजून ऊतकांचे (समान संरचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचे) प्रभेदन (कार्यविभागणीच्या विकासामुळे ऊतकांच्या संरचनेत फेरबदल होण्याची क्रिया) झालेले नाही अशा बहुकोशिक जीवांचा समावेश करण्यात आला. यानंतर यांपैकी जे आदिजीव या व्याखेत बसतात त्यांच्या गटाला ‘मोनेरा’ अशी संज्ञा देण्यात आली. यात सूक्ष्मजंतू (शिझोफायटा) व नील-हरित शैवल (स्यानोफायसी किंवा स्यानोफायटा किंवा मिक्झोफायसी) यांचा समावेश होतो आणि राहिलेले जीव, जसे ⇨ शैवल, ⇨ कवक व मिक्झोमायसिटीज (स्लाइम मोल्ड) हे प्रोटिस्टा या गटात घातले गेले.

 जीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा आराखडा

 वरील आराखड्यावरून असे आढळून येईल की ⇨ व्हायरसांची उत्पत्ती आदिकोशिकेपासून (आद्य कोशिकेपासून) होते व त्यांचा निराळाच गट तयार होतो. आदिकोशिकेपासून जे चार गट उत्पन्न होतात त्यांतील दोन प्रमुख गट म्हणजे प्राणी (मेटॅझोआ) व वनस्पती (मेटॅफायटा) हे होत.

 

वर्गीकरणपद्धती: प्राण्यांचे विभागीकरण पुढील क्रमाने केले जाते : प्रथम संघ, नंतर वर्ग, नंतर गण, नंतर कुल, नंतर वंश आणि शेवटी जाती. या पद्धतीने कुत्र्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे होईल :

प्राणिविभाग :

 

संघ -कॉर्डेटा

वर्ग- स्तनी वर्ग

गण –कार्निव्होरा

कुल – कॅनिडी

वंश – कॅनिस

जाती – कॅनिसफॅमिलिॲरिस

 

या पद्धतीत वर्गीकरणाची सुरुवात प्राण्याच्या जातीपासून होते. प्रजोत्पादनाबरोबरच समान आनुवंशिकता, सवयी, शरीररचना आणि शरीरक्रियाविज्ञान असणाऱ्या प्राण्यांच्या समूहास ‘जाती’ असे म्हणतात. नैसर्गिक परिस्थितीत एका जातीचा प्राणी दुसऱ्या जातीच्या प्राण्याबरोबर प्रजोत्पादन करू शकत नाही. यामुळे स्वजातीय प्रजोत्पादन व इतर जातींपासून विलगीकरण आपोआपच साध्य होते आणि जातीतील प्राण्यांचे व्यक्तिमत्व कायम राहते.

 

वरील वर्गीकरण पद्धतीचा कालांतराने विस्तार करण्यात आला व प्रत्येक विभाजन शब्दास ‘उप’ किंवा ‘अति’ हे उपसर्ग लावून नवीन समूह निर्माण करण्यात आले. उदा., संघ-उपसंघ, अतिवर्ग-वर्ग-उपवर्ग, गण-उपगण वगैरे.

 

लिनीअस यांच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक प्राण्याचे नामकरण वंश व जातिवाचक शब्द एकत्र घेऊन करतात. याला द्विपद नामपद्धती म्हणतात [⟶ प्राणिनामपद्धति]. घोडा, गाढव व झीब्रा हे एकखुरी सस्तन प्राणी होत. अशा सर्व प्राण्यांना एकवंशी प्राणी म्हणतात. वरील प्राण्यांचा वंश ईक्वस हा होय. यातील घोड्याचे गुणधर्म लक्षात घेऊन तत्सम सर्व प्राणी कॅबॅलसया जातीत घालण्यात आले व घोड्यास ईक्वसकॅबॅलस हे नाव देण्यात आले. या पद्धतीप्रमाणे एका वंशास अनेक जातींची नावे लावून निरनिराळे समूह करता येतात व हेच जातिवाचक नाव दुसऱ्या वंशाशी जोडून नवीन समूहास देता येते.

 


  

सध्याच्या वर्गीकरण पद्धतीत ‘जननिक समजातता’ (अवयवांच्या विकासात व संरचनेत आनुवंशिकतेने निर्माण होणारे साम्य) या गुणधर्माला विशेष महत्त्व आहे. लिनीअस यांनी ज्या वेळी आपले वर्गीकरण व द्विपदनामपद्धती सुचविली त्या वेळी डार्विन यांचा क्रमविकास सिद्धांत प्रसिद्ध झालेला नव्हता, तरीही डार्विन यांच्या क्रमविकास सिद्धांताच्या चौकटीत लिनीअस यांचे वर्गीकरण पुष्कळसे नीट बसते. लिनीअस यांच्या पद्धतीचा सर्वांत मोठा गुण म्हणजे ती लवचिक आहे व जसजसे नवे ज्ञान उपलब्ध होते तसतसे ते सामावून घेण्याची पात्रता या पद्धतीत आहे.

 

या वर्गीकरण पद्धतीने आतापर्यंत १० लक्षावर प्राण्यांचे वर्गीकरण झाले आहे आणि दरवर्षी १५,००० ते २०,००० नव्या जातींची त्यात भर पडत आहे. बऱ्याच प्राण्यांच्या काही जाती सर्व पृथ्वीवर पसरल्या आहेत व त्यांच्या समूहांत काही नवीन वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. त्यामुळे उपजाती कराव्या लागल्या आहेत.

 

वर्गीकरण पद्धतीत नावे देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी काही नियम केले आहेत. (जसे इंटनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजीच्या पंधराव्या परिषदेने संमत केलेली प्राणिनामपद्धतीची आंतरराष्ट्रीय संहिता). जर एखाद्या व्यक्तीला एखादा नव्या जातीचा प्राणी सापडला, तर त्याचे या नियमांच्या चौकटीत नामकरण करता येईल. या बाबतीत वरील परिषदेने केलेले काही नियम थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत : (१) नवीन जातीचे नाव द्विपदनामपद्धतीत बसले पाहिजे. (२) या नावाबरोबरच त्या प्राण्याचे सर्वांगीण वर्णन व त्याचे वर्गीकरण आले पाहिजे. (३) या नावाचा पूर्वी उपयोग झालेला नसावा. (४) या नावाचा प्राणी त्या वंशात ‘प्रकार’ म्हणून समजला जावा. (५) प्राण्याच्या शास्त्रीय नावापुढे ते सुचविणाऱ्याचे नाव व वर्ष असावे.

 

वरील नियमांचे जर काटेकोरपणाने पालन झाले नाही, तर वरील संस्थेस ते नाव मान्य होणार नाही.

 

पहा : प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग वर्गीकरणविज्ञान.

 

संदर्भ : Inamdar, N. B Dubash, P. J. Fundamentals of Life Sciences, Bombay, 1977. 

 

इनामदार, ना. भा. जोशी, अ.कृ.