गाडीभाडे मापक : प्रवाशाने टॅक्सी किंवा रिक्षा घेतल्यावर त्याच्या झालेल्या प्रवासाचे भाडे निश्चित करणारे व ते दाखविणारे यांत्रिक साधन. गाडीभाडेमापकाचा एक प्रकार पुढील पानावरील आकृतीत दाखविला आहे. निरनिराळ्या कंपन्यांच्या मापकांचा आकार आकृतीतल्याप्रमाणे चौकोनीच असतो. त्याच्या दर्शनी बाजूवर (आणि काही कंपन्यांच्या मापकात मागील बाजूलाही) एक फलक (तबकडी) असतो. गाडीत बसलेल्या प्रवाशाला मापकाची जी बाजू दिसते तिला दर्शनी किंवा पुढची बाजू म्हणतात व तिच्या विरुद्धची ती मागची बाजूस समजतात. मापकाचा कार्यप्रेरक भाग म्हणजे त्याला मागील बाजूस लावलेला बावटा हा होय. मापकाचे चालन एक लवचिक दंडाने केले जाते. गाडीच्या दंतचक्रपेटीच्या मागे जोडलेल्या दुसऱ्या एका स्वतंत्र पेटीमध्ये असलेल्या चक्राला या लवचिक दंडाचे टोक जोडलेले असते व दुसरे मापकाला खालच्या बाजूने जोडतात.

गाडीभाडेमापाकाचा दर्शनी फलक

दर्शनी फलकावर निरनिराळी माहिती मिळण्याकरिता खिडक्या ठेवलेल्या असतात व प्रत्येक खिडकीच्यावर तीत काय दर्शविले जाते ते लिहिलेले असते. आकृतीत फलकाच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात भाडेमापकाचा क्रमांक असतो. भाडोमापक चालू झाला की, या खिडक्यांतून ती ती माहिती दिसू लागते. फलकाच्या वरच्या बाजूच्या लांबट खिडकीत (जिच्यावरती FARE ‘भाडे’ अशी अक्षरे आहेत त्या खिडकीत) गाडीची स्थिती दाखविली जाते. गाडीच्या तीन प्रकारच्या स्थिती (‘रिकामी’, ‘गुंतलेली’ व ‘बंद’) असू शकतात व त्या बावट्याच्या स्थानांशी निगडीत असताना त्यावर ‘रिकामी’ (FOR HIRE) अशी अक्षरे समोरून येणाराला दिसतात आणि या खिडकीतही  ‘रिकामी’ असे दिसत असते. बावटा ठराविक अंशांतून योग्य दिशेने फिरविला म्हणजे तो उलटा होतो.

उतारूने टॅक्सी घेतल्यावर प्रवासात बावट्याची हीच स्थिती कायम राहते. काही भाडेमापकांत फलकावर वरच्या बाजूस TARIFF अशी अक्षरे असून त्यांच्या शेजारच्या खिडकीत गाडीची स्थिती दर्शविली जाते. बावटा उलटा केल्यानंतर या खिडकीत ‘गुंतलेली’ (HIRED) अशी अक्षरे येतात. भाडे दर्शविणाऱ्या खिडकीत रुपये व पैसे यांसाठी  प्रत्येक दोन भोके असतात. यात प्रवासाचे अंतर व खोळंब्याचा वेळ यांसाठी सरकारने ठरवून दिलेल्या दराने प्रथम किमान भाड्याचा व पुढे गाडी किमान अंतर गेल्यावरच्या जादा अंतराचा आणि प्रवासात गाडीचा खोळंबा झाला असल्यास त्या वेळाचा असा तीनही प्रकारचा एकत्रित आकार रुपये-पैशांत दाखविला जातो. हे तीन आकार निरनिराळ्या राज्यांसाठी निरनिराळे असू शकतात व ते त्या त्या राज्याच्या परिवहन अधिकाऱ्याकडून ठरविले जातात. मापकाचा बावटा जेव्हा ‘रिकामी’ या स्थानावर असतो तेव्हा या खिडकीत रूपये-पैशांची भोके न दिसता येथे ‘रिकामी’ अशी अक्षरे दिसतात. बावटा जेव्हा ‘गुंतलेली’ या स्थानावर  आणला जातो तेव्हा वरील अक्षरे जाऊन तेथे  किमान भाडे दिसू लागते. किमान  भाड्याचे अंतर संपताच या किमान आकारात पुढील ठरवून दिलेल्या अंतराच्या प्रत्येक टप्प्याला त्याच्या आकाराएवढी आगाऊ वाढ होत जाते व अशीच प्रत्येक टप्प्याच्या शेवटी पुढील टप्प्याची वाढ होते. उतारूने प्रवासात जर मध्येच गाडी थांबवून धरली किंवा पेट्रोल भरण्यासाठी चालकानेच थांबविली, एवढेच नव्हे, तर रस्त्यावरील वाहतूक दिव्यामुळे गाडी थांबली तरीही भाड्यात वाढ होत राहते व गाडी पुन्हा चालू होईपर्यंत ती होतच राहते. या निरनिराळ्या आकारांची नीट कल्पना यावी म्हणून उदाहरणादाखल महाराष्ट्र राज्य परिवहन संचालकांनी मुंबई विभागासाठी ठरवून दिलेले टॅक्सीचे सप्टेंबर १९७१ पासून अमलात आलेले दर पुढे दिले आहेत्त. ऑटो रिक्षांचे दर निराळे आहेत.

(अ) लहान टॅक्सी : चालकासह पाच माणसे. प्रती किमी. रु.०·६०  पुढील  / किमी. च्या प्रत्येक टप्प्याला किंवा त्याच्या भागाला १० पैसे. किमान भाडे रु. १·००, १·६o किमी. कमाल अंतराकरिता.

(आ) मोठी टॅक्सी : चालकासह सहा माणसे. प्रती किमी. रु. ०·८० पुढील / किमी. च्या प्रत्येक टप्प्याला किंवा त्याच्या भागाला १० पैसे. किमान भाडे रु. १·३०, १·६० किमी. कमाल अंतराकरिता.

(इ) खोळंब्याच्या काळात प्रत्येक दोन मिनिटांना १० पैसे. भाड्याचे दर बदलले, तर त्यानुसार मापकाचे समायोजन (रचनेत फेरबदल) करणे शक्य होईल अशी मापकाची अंतर्गत रचना असते.


फलकाच्या खालच्या भागात डावीकडील कोपऱ्यात ज्या दोन लहान खिडक्या आहेत त्यांपैकी वरच्या खिडकीत (TOT. KM.) गाडी एकूण चाललेल्या अंतराची किमी. मध्ये नोंद होते. खालच्या खिडकीत भाड्याने गेलेल्या एकंदर अंतराची (PD. KM.) किमी. मध्ये नोंद होते. उजव्या कोपऱ्यातील वरच्या खिडकीमध्ये (UNITS) किमान भाड्याचे अंतर गाडी चालल्यावर पुढे ठराविक अंतराच्या टप्प्यांना किती वेळा वाढ झाली हे दाखविले जाते. त्याखाली असलेल्या (TRIPS) खिडकीत गाडीने भाडे घेऊन किती खेपा केल्या याची नोंद केली जाते.

बावटा पुन्हा ठराविक अंशांतून फिरविला म्हणजे गाडी गुंतलेली पण मापक मात्र बंद असतो आणि ‘रिकामी’ च्या ऐवजी  ‘बंद’ (STOPPED) असे वरच्या खिडकीत दिसते.

भाडेमापक चालू केल्यानंतर चालकाने त्यात ढवळाढवळ करू नये अथवा त्याने तसा प्रयत्‍न केल्यास गाडीतील प्रवाशाचे तिकडे लक्ष वेधावे या दृष्टीने मापकाचा बावटा फिरविताना आवाज होण्यासाठी घंटा यंत्रणा बसविलेली असते. शिवाय त्याला मापकाला सहज हात लावता येऊ नये म्हणून ते टॅक्सीचालकाच्या बैठकीपासून दूर पण प्रवाशाला व तसेच त्यालाही सहज वाचता येईल अशा रीतीने (भारतात डाव्या बाजूला) बसवितात. काळोखात भाडे वाचता येण्यासाठी त्यावर दिव्याचीही व्यवस्था असते. टॅक्सी रिकामी आहे हे काळोखातसुद्धा दुरून समजावे याकरिता बावटा  ‘रिकामी’ या स्थानी असताना त्यात दिवा लागण्याची योजना असते. यासाठी बावट्याची बाहेरची बाजू काचेची ठेवतात.

परदेशातून आयात केलेल्या सर्व मापकांमध्ये प्रवाशाबरोबरचे मोठे बोजे गाडीच्या मागील पेटीतून नेताना त्या सामानाच्या वाहतुकीचे भाडे प्रत्येक नगाला किती आहे हे दाखविले जाते. अर्थात हा दर सरकारने ठरवून दिलेला असतो. सामानाबद्दल झालेली रक्कम मापकात (EXTRAS) च्या खिडकीत दाखविली जाते, पण हे काम चालकाने स्वतः हाताने करावयाचे असते. यात अप्रामाणिकपणाला वाव असतो. देशी बनावटीच्या सर्व मापकांतून ही बाब वगळलेली आहे. भाडेमापकाच्या खालील भागात ज्या चार लहान खिडक्या आहेत त्यांतील माहिती टॅक्सीच्या मालकाच्या उपयोगाची असते. मालक जेव्हा गाडी दुसऱ्याला चालवायला देतो तेव्हा त्याला या माहितीची  आवश्यकता असते. मापकाच्या काही प्रकारांत या खिडक्या मागील किंवा खालच्या बाजूला ठेवलेल्या असतात.

प्रत्येक मापकामध्ये टॅक्सीच्या प्रवासात ती थांबवून ठेवली असता भाड्यात वाढ होत राहते, हे वर आलेच आहे. या खोळंब्याच्या  आकारासाठी असणारी यंत्रणा संयुक्त स्वरूपाची असून फक्त गाडीचा वेग साधारणपणे ताशी चार ते पाच किमी. पेक्षा कमी झाला की, मापकातील घड्याळयंत्र कार्यप्रवण होऊन त्याच्यायोगे आकार वाढतो. मात्र गाडीचा वेग वरील मर्यादेपेक्षा वाढला म्हणजे भाडेवाढ केवळ अंतरावर (वेगावर नव्हे) अवलंबून राहते व त्यावेळी घड्याळयंत्र भाडेवाढीच्या दृष्टीने निष्प्रभ होते.

पूर्वीच्या काळी दिवसा व रात्री प्रवासाचे वेगळे दर असत आणि ते त्याच मापकात दाखविण्याची सोय असे. पण याबाबतीत दिवसेंदिवस अप्रामाणिकपणा वाढू लागल्याने आता सगळीकडे दिवसा व रात्री भाड्याचे दर एकच ठेवण्यात आले आहेत.

भाडेमापकासंबंधी शासकीय नियम व विनिर्देश : गाडी-भाड्याचे दर हे निरनिराळ्या राज्यांच्या परिवहन संचालकाकडून नियमित केले जातात. मापक कोणत्याही गाडीवर बसविण्यापूर्वी राज्यात असलेल्या तांत्रिक महाविद्यालयाकडून त्यांची टेबल तपासणी (प्रयोगशाळेतील) करून घ्यावी लागते व महाविद्यालयाच्या शिक्क्याने तो नंतर शिशाने मोहोरबंद केला जातो. अशा तऱ्हेने तांत्रिक महाविद्यालयाने मोहोरबंद केलेला मापक जेव्हा एखाद्या गाडीवर बसविला जातो तेव्हा पुन्हा एकदा त्या विशिष्ट उपकरणाचे त्या विशिष्ट गाडीवर बसवून मार्गपरीक्षण (गाडी चालू असतानाचे परीक्षण) राज्याच्या त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून केले जाते व उपकरण या परीक्षणाने योग्य ठरल्यास या अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या शिक्क्याने तो भाडेमापक पुन्हा एकदा मोहोरबंद केला जातो. अशा तऱ्हेने मापक मोहोरबंद केल्यानंतरच मालकाला भाड्यासाठी गाडी वापरण्याचा परवाना दिला जातो. गाडीभाडेमापक मोहोरबंद केल्यानंतर ती मोहोर चालकाला स्वत:ला तोडता येत नाही कारण मोहोर तांत्रिक महाविद्यालयाच्या आणि परिवहन अधिकाऱ्याच्या शिक्क्यांनी बंद केलेली असते व तोडल्यास मोहोर निकामी होते.

सामान्य माहिती : भारतात मेट्रिक पद्धती सुरू होऊन ५-६ वर्षे उलटल्यानंतर ही देशातील टॅक्सीमापकांमध्ये भाडे आकारणी रुपये-आण्यांमध्ये दाखविली जात असे. परंतु १९६o सालच्या जून महिन्यात महाराष्ट्र (त्यावेळच्या मुंबई) सरकारच्या गृहखात्याने पुढाकार घेऊन मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली  टेक्‍निकल इन्स्टिट्यूट या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून मापकांची मेट्रिक परिमाणातील जुळणी प्रयोगदाखल कारवून घेतली. जुळणी सर्व दृष्टींनी पसंत ठरल्यामुळे ऑगस्ट १९६० पासून मापकांमध्ये ‘रुपये-आणे’च्या ऐवजी ‘रुपये-नये पैसे’ (कालांतराने रुपये-पैसे) आणि अंतराच्या खिडक्यांत मैलांऐवजी किलोमीटरांची नोंद राज्यात वापरात असलेल्या भाडेमापकात दर्शविण्यात यावी असा आदेश देण्यात अाला.                                         

हाटे, ज. ना.