मलपंतरम (मलई पंदार्म) : भारतातील केरळ व तमिळनाडू राज्यांतील एक वैशिष्ट्यपूर्ण जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे क्विलॉन, कोट्टयम व त्रावणकोर या जिल्ह्यांत पंबियार नदीकाठच्या जंगलात आणि पर्वतरांगांतून आढळते. त्यांची लोकसंख्या सु. १,५६९ (१९७१) होती. रूंद छाती, अरूंद कपाळ, मध्यम उंची, काळा तपकिरी वर्ण, कुरळे केस, जाड भुवया आणि बसके नाक ही त्यांची नेग्रिटो वंशसदृश काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. हे आदिम भटके लोक अजूनही खाद्यसंकलनाच्या प्राथमिक आर्थिक अवस्थेत वावरतात. जंगलातून गोराडू, कुंदमुळे, मध आणि फळे गोळा करणे, हाच त्यांचा मुख्य उद्योग आहे. शिकार व मासेमारी हे जोड धंदेही ते करतात. शिकारीत कुत्रा हा त्यांचा एकमेव साथीदार असतो. नागरी संस्कृतीपासून पूर्णतः अलिप्त असलेली ही जमात अद्यापि झाडांच्या साली अथवा वल्कले (मरविरी) वस्त्र म्हणून परिधान करते. बहुतेक स्त्री-पुरूष अर्धनग्न  असून स्त्रियांचाही उरोभाग उघडाच असतो. जंगलातील विविध वस्तू स्त्रिया दागिने म्हणून परिधान करतात.

मलपंतरम यांची वस्ती डोंगरातील गुहा, प्रस्तरालये किंवा छोट्या झोपड्यांतून आढळते. एके ठिकाणी साधारणतः पाच-सहा गुहा किंवा झोपड्यांचा समूह असतो तथापि त्यांची स्थिर अशी वस्ती नसते. झोपडीत नवरा-बायको व दोन-तीन मुले एवढेच छोटे कुटुंब राहते. झोपडी बांबूच्या काठ्यांची असून ती केळीच्या पानांनी आच्छादिलेली असते. जंगलातून कंदमुळे खोदण्यासाठी ते अणकुचीदार काठीचा उपयोग करतात. ते पुर्णतः मांसाहारी असून दारू व धूम्रपान यांत रस घेतात.

या जमातीत कुळी नाहीत पण मुले-मुली वयात आल्यानंतर भिन्न समूहांमध्ये लग्नविधी होतो. जमातीत एकविवाहाची प्रथा रूढ असून वधूमूल्याची चाल आहे तथापि स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेने कमी असल्यामुळे वधूमूल्याची रक्कम परवडत नसेल तर अपहरण विवाहही घडून येतात. साटे-लोटे विवाह व आते-मामे भावंडांतील (मुरपेन्न वधूस) विवाहास प्राधान्य दिले जाते. घटस्फोट व नियोगपद्धत क्वचित प्रचारात असूनही एकपत्नीत्वाकडे जमातीचा विशेषत्वाने कल दिसतो. विवाहबाह्य लैंगिक संबंध निषिद्ध मानला जातो.

त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंब पद्धती रूढ असून मुलाकडे वारसा जातो. त्यांच्यात कणी किंवा मूप्पन हा वंशपरंपरागत जमातप्रमुख (भगत) असतो. त्याकडे पंचायतीतील वादंग मिटविण्याचे तसेच धर्मगुरूचे, भविष्यकथनाचे आणि धार्मिक समारंभांचे काम असते. मलपंतरम जंगलातील निसर्गदेवतांची पूजा करतात. यांशिवाय षष्ठवू (अयप्पन), काली, मरीअम्मा, चपलम्मा, कुरप्पुस्वामी, कटलापरम्मा इ. अनेक देवतांना ते भजतात.

मलपंतरम मृतास जाळत वा पुरत नाहीत, तर ते त्या व्यक्तीस त्याच जागी ठेऊन ते दुसरीकडे वस्ती हलवितात. मृत व्यक्ती असलेली वस्ती जाळून टाकतात. नागरी संस्कृतीशी संपर्क आलेले काही लोक मृत व्यक्तीस पुरू लागले आहेत. अशौच ते नऊ दिवस पाळतात.

संदर्भ : 1. Iyer, L.A. Krishna, Kerala and Her People, Palghat, 1961.

            2. Iyer, L. A. Krishna, Social History of Kerala : the Pre-Dravidians, Madras, 1968.

            3. Luiz, A . A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.

शेख, रूक्साना