प्रयोजनवादी मानसशास्त्र : (हॉर्मिक सायकॉलॉजी). विल्यम मॅक्डूगलने (१८७१–१९३८) प्रवर्तित केलेला एक मानसशास्त्रीय संप्रदाय. मानसशास्त्राची आधुनिक वैज्ञानिक चौकट तयार होत असताना, मानवी वर्तन इतर भौतिक घटनांप्रमाणे सार्वत्रिक नियमांनी बांधलेले आहे, की मानवाला स्वेच्छेने वागता येते, या प्रश्नाला विशेष महत्त्व आले. या प्रश्नाच्या संदर्भात, वर्तनाला हेतूचे, उद्दिष्टाचे, प्रयोजनाचे अधिष्ठान असते आणि त्यामुळे त्यास दिशा मिळते, असे मानणारी विचारप्रणाली प्रयोजनवादी मानसशास्त्र म्हणून पुढे आली. वर्तनाचे पूर्ण स्पष्टीकरण यांत्रिक किंवा भौतिक-रासायानिक संज्ञांनी देता येणार नाही, त्यासाठी ‘उद्दिष्टाच्या दिशेने जाण्याची ओढ’ या घटकाला स्थान द्यावेच लागेल, असा प्रयोजनवादी मानसशास्त्राचा दृष्टिकोन आहे. हे उद्दिष्ट किंवा हेतू नेहमीच उघड असेल किंवा दाखवता येईल. असे नाही. परंतु निसर्गक्रमाची अपरिहार्यता म्हणून मनुश्य खातो, पितो, गातो, सतार वाजवतो, उद्योग करतो, खेळतो यांसारखे स्पष्टीकरण अपुरे तर आहेच पण त्यात मानवी शक्तींना योग्य स्थानही मिळत नाही, अशी प्रयोजनवाद्यांची तक्रार आहे. वेगळे प्रयोजन नसताना पाणी उताराकडे वाहते परंतु विशिष्ट दिशेने कालवा खोदून एका ठिकाणचे पाणी दुसऱ्या ठिकाणी नेणारा माणूस मात्र त्यातील प्रत्येक कृती करतो तसेच निर्णयही घेतो. त्या मागे प्रयोजन आहे. तेव्हा पाणी व माणूस यांच्यातील मुख्य फरक भौतिक- रासायनिक नसून तो प्रयोजकतेचा आहे, हा या विचारप्रणालीचा गाभा होय.

मानसशास्त्राची आधारसामग्री वस्तुनिष्ठ, सार्वत्रिक व प्रत्यंतरक्षम असते, की व्यक्तिनिष्ठ असते, या मुद्यावर मानसशास्त्रीय विचारप्रणालींचे जे भेद पडतात, त्यांत प्रयोजनवादी मानसशास्त्र व्यक्तिनिष्ठतेची बाजू घेते. जाणिवेचे आशय (कंटेन्ट्स ऑफ अवेअरनेस) आणि आंतरिक घटना वा प्रक्रिया ही मानसशास्त्राची आधारसामग्री होय. तिच्या अनुषंगाने ज्या नोंदी असतील त्याच महात्त्वाच्या. यामुळे अर्थातच अनुभव घेणाऱ्या तसेच कृती करणाऱ्या व्यक्तीला, तिच्याइच्छांना, प्रयोजनांना आपोआप केंद्रस्थान प्राप्त होते. या विशिष्ट भूमिकेमुळे प्रयोजनवादी मानसशास्त्रात प्रेरणा या संकल्पनेला विशेष स्थान प्राप्त झाले. [⟶ प्रेरणा-१].

या प्रणालीत (१) प्रेरणावादी वा गतिकीय मानसशास्त्र (डाय्‌नॅमिक सायकॉलॉजी), (२) अस्तित्ववादी मानसशास्त्र (एग्झिस्टेंशियल सायकॉलॉजी), (३) स्वयंप्रेरणावाद (व्हॉलंटरिझम) आणि (४) सहजप्रेरणावाद (इर्न्स्टिक्टीव्हिझम) यांचा समावेश होतो. फ्रॉइड, युंग, ॲड्लर व हार्टमानसारखे मनोविश्लेषणातील नवमतवादी यांच्या सिद्धांतांमध्ये प्रेरणांच्या विशिष्ट रचनेतून मानवी वर्तन साकार होते, या तत्त्वाला मुळात मान्यता आहे. आपापल्या विवेचनामागे प्रेरणांचे ‘कारण’ त्यांनी वर्तन या ‘कार्या’ साठी सूत्र म्हणून स्वीकारले आहे. बोध किंवा अबोध, व्यक्तिगत किंवा वांशिक, स्वयंप्रेरित किंवा समाजजन्य असे वेगवेगळे स्वरूप असणाऱ्या ‘प्रेरणा’ व्यक्तींना विशिष्ट दिशेने, विशिष्ट ध्येयवस्तूकडे व विशिष्ट गतीने नेतात आणि त्यातून वर्तन हे ‘कार्य’ दिसून येते, असे या विचारवंतांचे प्रतिपादन आहे.

अस्तित्ववादाच्या तत्त्वज्ञानानुसार जे मानसशास्त्रीय विचार मांडले गेले, त्यांत विश्व अहेतुक आणि विरोधभावी आहे, तेव्हा मानवाने स्वयंप्रेरणेने स्वतःची मुक्त इच्छाशक्ती या विश्वाच्या टकरीत उभी केली पाहिजे, या विचाराला सर्व वर्तनाच्या दृष्टीने महत्त्व आले. याखेरीज मानसशास्त्राचे कार्य म्हणजे अनुभवाचे वर्णन आणि निरीक्षण करणे हेच आहे हे वर्णन जितके थेट आणि अर्थ लावण्याच्या उच्चतर अन्वयप्रक्रियांपासून मुक्त, तेवढे ते अधिक ग्राह्य, हा विचारही त्यामागोमागच आला.

 प्रयोजनवादी मानसशास्त्राचे टोकाचे उदाहरण म्हणजे स्वयंप्रेरणावाद. स्वयंप्रेरित नाही ते मानसिक म्हणताच येणार नाही, अशी ही भूमिका आहे परंतु इतक्या ऐकांतिक भूमिकेपेक्षा घटनाक्रमाला वळण देण्याची कारकशक्ती म्हणजे मानवाची इच्छाशक्ती, असे मांडणारी भूमिका अनेकदा घेतली गेलेली आढळते. बाह्य शक्तींचा रेटा नसला, तरी आपली स्वयंप्रेरणाच माणसाला कार्यान्वित करते, हे तत्त्व विविध संदर्भांत मान्य करणारे विचारवंत मानसशास्त्राच्या शाखांमध्ये आढळतात.

या मताचा सर्वांत जोरदार आणि सर्वांत वादग्रस्त ठरलेला पुरस्कार मॅक्डूगलने केला. त्याने विसाव्या शतकाच्या आरंभीच्या पंचवीस वर्षांत जे लिखाण केले, त्यातून प्रयोजनवादी मानसशास्त्राची एक प्रमुख मांडणी सिद्ध झाली. सहजप्रेरणावाद ही प्रेरणाविषयक उपपत्ती मांडून त्याने मानवी वर्तनाचे अधिष्ठान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संज्ञेचा वापरही त्याने मुद्दाम सुरू केला. मॅक्डूगल हा मानसशास्त्राच्या अभ्यासविषयाबाबत ‘वर्तन’ या संज्ञेचा पुरस्कर्ता होता, हे लक्षात घेतल्यानंतर त्याला प्रयोजन या संकल्पनेची किती मातब्बरी वाटत होती, ते कळून येते. आपण आपल्या भोवतालच्या जगात पाहिले, तर आपल्याला काही वस्तू अशा दिसतात, की त्या जड, यांत्रिक आहेत बाह्य शक्तीच्या प्रभावाने हलणाऱ्या आहेत आणि काही वस्तू अशा आहेत, की त्या ‘वर्तन’ करतात. ‘या वस्तूंमध्ये आंतरिक शक्ती आणि स्वयंनियंत्रण आहेसे दिसते, स्वतःची ध्येये व उद्दिष्टे गाठण्याची त्यांची धडपड चाललेली दिसते तेव्हा उद्दिष्ट साध्य करण्याची धडपड हे वर्तनाचे वैशिष्ट्य होय आणि वर्तन हे सचेतन वस्तूंचे वैशिष्ट्य होय,’ अशा उद्दिष्टलक्षी वर्तनाची इतर वैशिष्ट्ये त्याने पुढीलप्राणे सांगितली : (१) हे वर्तन उद्दीपक थांबल्यानंतरही चालू राहते. (२) हे वर्तन परिवर्तनशील असते. (३) हे वर्तन उद्दिष्ट प्राप्त झाले, की थांबते व दुसरे वर्तन त्याची जागा घेते. (४) यातील कृती पुनःपुन्हा केल्याने सुधारतात. टोलमन आणि इतर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मॅक्डूगलच्या सहजप्रेरणावादाबद्दल जरी विरोधी भूमिका घेत असले, तरी हेतुलक्षी वर्तनाची ही संकल्पना आणि वैशिष्ट्ये त्यांनाही ग्राह्य वाटली. [⟶ वर्तनवाद]. 


 मानवी जीवनातील अशी ध्येये किंवा उद्दिष्टे कोणती, याचा मॅक्डूगलने शोध घेतला. त्यामध्ये त्याने काही प्रेरणा मूलभूत व सार्वत्रिक असतात आणि बाकी त्यांपासून मिळवता येतात, असे गृहीत धरले होते. त्याच्या मतानुसार प्रत्येक प्राणिजातीचे वर्तन काही विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक उद्दिष्टांच्या दिशेने घडून येते. उदा., अन्नसंपादन, कामतृप्ती, सजातीयांचा सहवास, सुरक्षितता इत्यादी. ही उद्दिष्टे निसर्गसिद्ध व म्हणूनच सार्वत्रिक असतात. ती पूर्वानुभव किंवा अनुकरण यांवर अवलंबून नसतात. अशा सहजप्रेरणा मानवी आणि अवमानवी प्राण्यांच्या वर्तनांत आदिप्रेरके (प्राइम मूव्हर्स) म्हणून कार्य करतात. सहजप्रेरणांची मॅक्डूगलने दिलेली व्याख्या अशी : ‘विशिष्ट वस्तूकडे किंवा वस्तुवर्गाकडे अवधान खेचले जाणे, त्या वस्तूंमुळे भावनिक प्रत्यय निर्माण होणे आणि त्यांच्या संदर्भात विशिष्ट कृती करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे, या तिन्ही प्रकारच्या घटना घडवणारी नैसर्गिक, जन्मजात, असंपादित आणि प्रजातिविशिष्ट प्रवृत्ती म्हणजे सहजप्रेरणा होय’ (१९२३). या सहजप्रेरणांमुळे वर्तनाचे दिग्दर्शन, व्यवस्थापन व प्रत्यक्ष कार्यवाही या गोष्टी घडून येतात.

 मॅक्डूगलने सहजप्रेरणांना आदिप्रेरके म्हटल्यामुळे काही वेळा त्या अपरिवर्तनी अहेत, असा त्याच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. त्याने अध्ययन व अनुभव यांच्यामुळे सहजप्रेरणांना कसे वळवा लागू, शकते, हेही सांगितले आहे. उद्दीपकांच्या बाजूने तसेच कृतींच्या बाजूनेही बदल होतात परंतु तिचा गाभा मात्र तसाच राहतो, असे त्याचे मत होते. सहजप्रेरणेत आकलन, भाव आणि कृती या तिन्हींचा समावेश व गुंफण झालेली असते. त्यांतील भावात्मक अंगाला जास्त प्रमाणात स्थिरता असते, असे त्याचे मत आहे. १९०८ मध्ये त्याने दिलेली सहजप्रेरणांची यादी बारा प्रेरणांची होती ती सुधारून १९३२ पर्यंत त्याने अठरावर नेली. सहजप्रेरणा (इर्न्स्टिक्ट) याऐवजी क्रियाप्रवृत्ती (प्रपेन्सिटी) हा शब्दही त्याने नंतर वापरला.

त्याच्या १९३२ च्या लेखनानुसार ही यादी अशी : (१) अन्नशोधन (कदाचित अन्नसंचयही). (२) नकोशा होणाऱ्या उद्दीपकापासून परावृत्ती. (3) प्रियाराधन आणि संभोग. (४) धोका अथवा वेदना टाळण्यासाठी पळून जाऊन लपणे. (५) जिज्ञासा. (६) अपत्यसंगोपन व वात्सल्य. (७) सहवास–सजातीयांबरोबर राहणे, त्यांचा शोध घेणे. (८) आत्मप्रस्थापन–वर्चस्व गाजवणे. (९) लीनता–वरिष्ठापुढे आत्मलोप. (१०) व्यत्ययास प्रतिकार. (११) मदतीची याचना व संकटात धावा करणे. (१२) आसरा व आयुधे बनवणे. (१३) उपयुक्त किंवा आकर्षक वस्तुंचा संग्रह करणे–स्वामित्व आणि संचय. (१४) दुसऱ्याचे व्यंग वा अपयश यांना हसणे. (१५) स्वास्थ्य टिकवण्यासाठी हालचाली करणे तापदायक उद्दीपक बाजूला सारणे. (१६) थकवा आल्यास विश्रांती वा झोप घेणे. (१७) स्थलांतर करणे–नव्या जागी जाणे. (१८) शरीरस्वास्थ्याशी निगडित अशा इतर अनेक गोष्टी करणे. उदा., खोकणे, शिंकणे, श्वासोच्छ्‌वास करणे, मलमूत्रविसर्जन इत्यादी. सहजप्रेरणांच्या या यादीतून इतर प्रेरणा मिळवता येतात त्या परिवर्तनाद्वारे किंवा मिश्ररचनांमधून प्रसंगानुसार विशिष्ट रूप धारण करतात, अशी मॅक्डूगलची धारणा होती.

एखादी सहजप्रेरणा उत्तेजित झालेली असताना शरीराची व मनाची जी प्रक्षुब्ध अवस्था अनुभवास येते, तीस मॅक्डूगलने ‘प्राथमिक मनोभाव वा भावना’ (प्रायमरी इमोशन) असे नाव दिले आहे. प्रत्येक सहजप्रेरणेशी संलग्न अशी प्राथमिक भावना वेगवेगळी असते. उदा., पलायनप्रेरणेशी संलग्न प्राथमिक भावना भीती युद्धप्रेरणेची क्रोध घृणा किंवा जुगुप्साप्रेरणेची घृणा इत्यादी. मॅक्डूगलच्या मते प्राथमिकभावनांचे कार्य संवेदनांच्या कार्याप्रमाणेच मुख्यतः बोधनात्मक (कॉग्निटिव्ह) स्वरूपाचे आहे. प्राथमिक भावनेच्या अनुभवामुळे कोणती सहजप्रेरणा प्रभावित झालेली आहे, हे आपणास कळते तसेच प्राप्त परिस्थितीमध्ये कोणत्या प्रतिक्रिया करणे आवश्यक आहे, याचा निर्णय घेणेही शक्य होते. या भावनिक अनुभवाला शारीरिक बाजूही असते. भावनेचा आविष्कार मुद्रा, हावभाव इ. माध्यमांतून होत असल्याने इतरांनाही आपल्यामध्ये जागृत झालेल्या सहजप्रेरणांचा बोध होतो व त्यानुसार सहानुभूतीच्या (सिंपथी) प्रक्रियेने त्यांच्यामध्येही त्याच सहजप्रेरणा जागृत होऊ शकतात. यावरून प्राथमिक भावनांचे कार्य हे प्रामुख्याने बोधनात्मक स्वरूपाचे आहे, असा निष्कर्ष मॅक्डूगलने काढलेला आहे.

मानवासारख्या विकसित प्राणिजातीमध्ये एकाहून अधिक सहजप्रेरणा एकाच वेळी जागृत होऊ शकतात. त्यामुळे एकाहून अधिक प्राथमिक भावनांचे उद्दीपन अनुभवास येते. अशा भावनांना ‘संमिश्र भावना’ (ब्लेंडेड इमोशन) अशी संज्ञा मॅक्डूगलने दिलेली आहे. अशा संमिश्र भावनांचे दुजोड (बायनरी), तिजोड (टर्शरी) इ. अनेक प्रकार संभवतात. उदा., तिरस्कार (स्कॉर्न) या संमिश्र भावनेमध्ये क्रोध व घृणा या दोन प्राथमिक भावनांचे मिश्रण आहे तसेच पराक्रमी पुरूषांच्या शौर्यचे जे ‘कौतुक’ (ॲडमिरेशन) वाटते त्यामध्ये आश्चर्य व नम्रता या दोन प्राथमिक भावनांचे मिश्रण आहे.

 याशिवाय अनुसाधित (डिराइव्ह्‌ड) भावना हा भावनांचा आणखी एक प्रकार मॅक्डूगलने वर्णिलला आहे. आत्मविश्वास, आशा, चिंता, विषण्णता, निराशा ही अनुसाधित भावनांची उदाहरणे होत. अनुसाधित भावनांचे वैशिष्ट्य हे, की त्या कोणत्याही विवक्षित सहजप्रेरणेशी संलग्न नसतात, कोणत्याही सहजप्रवृत्त वर्तनप्रणालीच्या विविध अवस्थांमध्ये त्या उत्पन्न होऊ शकतात. उदा., दक्षिण ध्रुवावर यशस्वी स्वारी करून धाडसी संशोधक छावणीकडे परतत असताना त्यांची मने उत्साहाने व आत्मविश्वासाने भरलेली असतात. सुदैवाने हवामानही अनुकूल असते परंतु हवामान एकाएकी बिघडले, तर त्यांचा पहिला आत्मविश्वास काहीसा ढळतो तथापि आपण आपल्या छावणीला सुखरूप पोहोचू व तेथे ऊब, गरम अन्न व विश्रांती आपणास मिळेल, अशी‘आशा’ त्यांना त्या क्षणीही वाटते. एवढ्यात दुर्दैवाने झंझावती वारे व बर्फाचे वादळ सुरू झाल्यास त्यांची ही ‘आशा’ मावळते आणि तिची जागा ‘चिंता’ (अँग्झाय्‌टी) घेते. वादळ अधिकच उग्र झाल्यास आता चिंतेचे रूपांतर ‘विषण्णते’ त (डिस्पॉन्डन्सी) होते. परिस्थिती तशीच प्रतिकूल राहिल्यास त्यांच्या मनातील आशा-निराशांच्या आंदोलनात निराशेचे पारडे अधिक जड होत जाते. एवढ्यात कोणी थकलेला सोबती मरगळू लागतो, त्याच्याने पाऊल टाकवत नाही. तो तसाच त्या बर्फावर अंग टाकतो व हताश (डिस्पेअर) भावनेने मृत्युची वाट पहात राहतो.

खेद (रिग्रेट), उद्वेग (रिमॉर्स) व दुःख (सॉरो) तसेच हर्ष (जॉय) याही अनुसाधित भावनाच होत. प्राथमिक भावनांची विवक्षितता त्यांच्यामध्ये असत नाही. मॅक्डूगलच्या मते त्या सर्वसामान्य स्वरूपाच्या असल्याने त्यांना खरोखर ⇨ मनोभाव किंवा भावना (इमोशन) म्हणण्याऐवजी ⇨भाव (फीलिंग) म्हणणेच अधिक युक्त ठरेल.

वर्तनात दिसून येणारा दुसऱ्या प्रकारचा बदल म्हणजे सहजप्रेरणांचे विविध प्रकारे होणारे संघटन व व्यवस्थापन होय. मानवी जीवनात सहजप्रेणांचे उद्दीपन सहसा एकाकी स्वरूपात होत नाही. अनेक सहजप्रेरणांचे उद्दीपन एकाच वेळी होते. यामधून संमिश्र व अनुसाधित भावनांचा प्रत्यय येतो. शिवाय समान परिस्थितीत त्या त्या सहजप्रेरणा व संमिश्र भावना पुनःपुन्हा अनुभवास येतात. काही मध्यवर्ती विचार-कल्पनांभोवती त्यांची स्थिर स्वरूपाची गुंफण होत असते व त्यांना ⇨स्थिरभावांचे (सेंटिमेंट्स) स्वरूप प्राप्त होते. उदा., स्वतःचे घर, मातापितरे, भावंडे, जातभाई, ग्रामस्थ, स्वदेश, स्वभाषा, आपले कुलदैवत. आपल्या कलाकृती या सर्वांभोवती आपल्या सर्व सहजप्रेरणांची किंवा भावनांची एक सुसंगत रचना वा गुंफण तयार होते व आपल्या वर्तनाला ती दिशा देते. वाढत्या वयोमानाप्रमाणे या सर्व रचनेला एक प्रकारचा दृढपणा व टिकाऊपणा प्राप्त होतो. प्रौढ जीवनात अशा सुस्थिर झालेल्या मनावृत्तींचे महत्त्व फार आहे. त्यांमुळेच जीवनास स्थैर्य लाभते व विशिष्ट वळण लागून वर्तनासही सुसंगता प्राप्त होते. जीवनमूल्ये व जीवनादर्श यांची सुस्पष्ट अभिव्यक्ती होते व व्यक्तिजीवनामध्ये साफल्यतेच्या अनुभूतीची प्रचीती येते. खरे मानवी जीवन म्हणजे अशा उत्कट व नीतिगर्भ स्थिरवृत्तींनी प्रेरित झालेले जीवन होय.


 व्यक्तिजीवनाच्या साफल्यासाठी जीवनातील विविध स्थिरवृत्तींचे सुसंघटन होणे आवश्यक आहे सुसंघटन म्हणजे विविध स्थिरभावांचे त्यांच्या कमीअधिक मूल्यांनुसार श्रेणींकरण व एखाद्या विवक्षित स्थिरभावाच्या वर्चस्वाखाली इतर सर्व स्थिरवृत्तींचे संघटन होय. असे सुसंघटन झाल्यानेच व्यक्तीच्या मनातील विविध स्थिरभावांमधील अंतर्विरोध टाळणे शक्य होते. ज्यांना असे अंतर्विरोध टाळता येत नाहीत, अशांचे व्यक्तिमत्त्व दुबळे बनते.

मॅक्डूगलच्या या विचारप्रणालीवर १९२० च्या सुमारास मानसशास्त्रीय विचारवंतांनी प्रखर टीकेची झोड उठवली. ‘सहजप्रेरणा’ मानल्या, तर त्यांचा स्पष्टीकरण म्हणून एक नाव देण्यापलीकडे उपयोग होत नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप होता. झेड्. वाय्. कूओच्या मते संशोधनासाठी ही संकल्पना निरूपयोगी ठरते. त्याने केलेल्या प्रयोगांमध्ये सहजप्रेरणांना पुष्टिकारक पुरावा मिळाला नाही उलट पूर्वानुभवालाच महत्त्व असल्याचे दिसून आले. प्रजातिविशिष्ट वर्तनाबाबतही निदान मानवी पातळीवर तरी अनुवंशाने कोणते गुण उतरू शकतील, यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. डनलॅपने म्हटले, की वर्तनात आनुवंशिक आणि संपादित हे घटक सुटे करणे अशक्यप्राय आहे. जसजसे अध्ययनविषयक प्रायोगिक संशोधन प्रगत होत गेले, तसतसे आधी सहजप्रेरित समजले जाणारे वर्तनप्रकार अध्ययनजन्य असल्याचे दिसून येऊ लागले.

काही काळ असा गेला, की ‘सहजप्रेरणा’ हा शब्द मानसशास्त्रीय लिखाणातून हद्दपार झाल्यासारखा दिसू लागला. १९५० च्या सुमारास आचारशास्त्राच्या (एथॉलॉजी) अभ्यासकांनी सहजप्रेरणांना पुन्हा वैचारिक मंथनाच्या क्षेत्रात आणले. आनुवंशिक रचनेनुसार प्राप्त होणाऱ्या वर्तनावर आधारलेल्या तत्त्वांच्या शोधात असताना ‘सहजप्रवृत्त’ असे काही वर्तन निश्वितपणे सांगता येईल किंवा नाही, असा हा प्रश्न होता. पुन्हा एकदा अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी सहजप्रेरणेची कल्पना ग्राह्य नसल्याचा निर्वाळा दिला व अनुवंश आणि परिस्थिती यांच्या आंतरक्रियेलाच प्राधान्य देण्याचा विचार मांडला. नंतरच्या काळात ग्रंथिस्त्राव आणि परिसर यांच्या विशिष्ट मूल्यांमुळे विशिष्ट वर्तनयंत्रणा कशा सिद्ध होतात, हेही प्रायोगिक रीत्या दाखवले गेले. मानवी किंवा अवमानवी प्राणिवर्तनाच्या बाबतीत सर्वसाधारण कौल सहजप्रेरणेच्या विरोधीच आहे. एक मत असेही आहे, की इतर प्राण्यांमध्ये सहजप्रेरणा व मानवात अध्ययन, असे प्रधान घटन मानावेत परंतु या दोहोंची अविभाज्यता संशोधकांना पुनःपुन्हा आढळून आली आहे.

 मॅक्डूगलच्या कल्पनांचा पाठपुरावा टोलमन, लॅशली, हेब, मॅस्लो, आर्. बी. कॅटेल यांनी आपापल्या क्षेत्रांत करून या वादाला धार न चढवता फक्त तत्त्वबोधावर लक्ष केंद्रित केले. व्यक्तीचे स्वत्व म्हणजेभाकडकथाही नव्हे किंवा गूढ अव्यक्तही नव्हे, ही जाण आधुनिक मानसशास्त्रीय विचारात दिसते याचे श्रेय मॅक्डूगलच्या प्रयोजनवादी मानसशास्त्रास निश्चितच आहे.

पहा : मॅक्डूगल, विल्यम सहजप्रेरणा.

संदर्भ :  1. Bernard, L. L. lnstinct : A Study of Social Psychology,New York, 1924.

            2. McDougall, William lntroduction ot Social Psychology, London, 1908.

            3. McDougall, William, Outline of Psychology, New York, 1923.

            4. McDougall, William, Psychology, the Study of Behaviour, London, 1912.

            5. McDougall, William, The Energies of Men : A Study of the Fundamentals of Dynamic Psychology, London, 1932.

            6. Tinbergen, N. The Study of lnstinct, New York, 1951.

हरोलीकर, ल. ब. वनारसे, श्यामला