त्सेत्से माशी (ग्लॉसिना पॅल्पॅलिस)

त्सेत्से माशी : ही माशी डिप्‍टेरा गणाच्या म्युसिडी कुलातील आहे. त्सेत्से माशीचे जवळजवळ २० प्रकार आहेत. त्यांतील ग्‍लॉसिना पॅल्पॅलिस  ह्या माशीच्या चावण्यामुळे मध्य आफ्रिकेत ⇨ निद्रारोग होतो. १९०१–१९०६ ह्या काळात युगांडामध्ये २,००,००० माणसे ह्या रोगाने मृत्युमुखी पडली. ग्‍लॉसिना मॉर्सीटान्स  ह्या माशीमुळे ऱ्‍होडेशियात एक प्रकारचा निद्रारोग होतो. गुरांमध्ये होणारा नगान हा रोगही त्सेत्से माशीमुळे होतो. ह्या माश्या घरातील माशीसारख्याच परंतु थोड्या मोठ्या असतात. त्यांचा रंग तपकिरी असून त्यावर काळपट खुणा असतात. ह्या माशीची सोंड डोक्याच्या पुढील बाजूस प्रामुख्याने दिसून येते. ही सोंड वाकत नाही व चावताना ती आत खुपसली जाते. जेव्हा ह्या माश्या बसतात तेव्हा त्यांचे पंख पाठीवर एकमेकांवर सपाट राहतात. डोळे एकमेकांपासून दूर असतात. सोंडेचे तीनच भाग असतात.

ह्या माश्या अंडी घालत नाहीत परंतु त्यांच्या गर्भाशयातून एकदम अळीच बाहेर पडते. सु. १० दिवसांच्या अंतराने एक अळी बाहेर पडते. ही अळी जमिनीवर पडते. ती लगेच जमिनीत शिरते वा स्वतःस दडविते व तिचे रूपांतर कोशात होते. कोशातून साधारण दीड महिन्यानंतर प्रौढ माशी बाहेर पडते. ह्या माशीचे आयुष्य ७–८ महिने असते.

ह्या माश्या उष्ण दमट हवेच्या ठिकाणी असतात. जेथे झुडपांची वाढ जास्त आहे अशा ठिकाणी अगर नदी, सरोवरे व बेटे ह्यांच्या आसमंतातील जंगलांतून त्या जास्त असतात. ह्या माश्या मध्य व दक्षिण आफ्रिकेत विशेष आढळतात. उष्ण व कमी उष्ण भागांत ह्या माश्या काही ठराविक पट्ट्यांतून आढळतात. ह्या भागांस त्सेत्से माशीचे पट्टे म्हणतात. ह्या माश्या दिवसा जास्त आढळतात. दिवसाच्या उष्ण काळात त्यांना विशेष जोर येतो.

नर व मादी त्सेत्से माश्या मनुष्याचे अगर जनावराचे रक्त शोषण करतात व त्याबरोबरच रोगाचे जंतू मनुष्याच्या रक्तात सोडतात. ह्या जंतूंना ट्रिपॅनोसोमा गँबिएन्स म्हणतात. ह्या जंतूमुळेच निद्रारोग होतो. ऱ्‍होडेशियातील त्सेत्से माश्या वेगळ्या प्रकारचे जंतू मनुष्याच्या रक्तात सोडतात. त्यांना ट्रिपॅनोसोमा ऱ्‍होडेसिएन्स म्हणतात.

दर चौ. मी. ला सु. ०·९ किग्रॅ. डीडीटी अगर १ किग्रॅ. लिंडेन ह्याचा फवारा मारल्यास प्रौढ त्सेत्से माश्या मरतात. आठवड्याच्या अंतराने ४ वेळा फवारा मारावा लागतो. गुरांना डीडीटी अगर बीएचसीच्या पाण्यातून नेतात.

गर्दे, वा. रा.