सुंब : बेलोनिफॉर्मिस गणाच्या हेमिऱ्हँफिडी मत्स्यकुलातील हेमिऱ्हँफस प्रजातीमधील मासे ‘सुंब ‘ या नावाने ओळखले जातात. त्यांचे शरीर बरेच लांबट व दामटलेले असते. त्यांच्या खालच्या जबड्याचे लांब व बारीक चोचीसारखे रुपांतर झालेले असून तीवर संवेदनाक्षम झालर असते. वरचा जबडा म्हणजे एक त्रिकोणाकृती विस्तार असतो.

सुंब

हेमिऱ्हँफस जॉर्जाय ह्या जातीचा प्रसार भारत ते चीन असा असून भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर ही विपुल प्रमाणात आढळते. हिच्या शरीराचा रंग पाठीवर हिरवट निळा असून दोन्ही बाजूंवर एक रुपेरी व दुसरा काळा असे दोन पट्टे असतात. हिची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. दक्षिण भारतात हिची स्थानिक स्वरूपाची महत्त्वाची मासेमारी चालते. पामबन मंडपम्‌ कुसडाई बेट व तुतिकोरिन ही सुंबच्या मासेमारीची इतर केंद्रे आहेत. हे मासे वाळवून श्रीलंकेला व इतरत्र निर्यात केले जातात.

हे. ल्युकॉप्टेरस ही जाती मुंबईच्या किनाऱ्यालगत आढळते. तिच्या पृष्ठपक्षावर (पाठीवरील परावर) व गुदपक्षावर खवले नसतात.

सुंबच्या इतर महत्त्वाच्या जाती पुढीलप्रमाणे होत : हे झँथॉप्टेरस जाती मुख्यतः मलबार किनाऱ्यावर आढळते. तिचा चोचीसारखा आकार काहीसा आखूड व प्रौढात तो लाल पोवळ्यासारख्या रंगाचा असतो. हे. युनिफॅसिएटस ही जाती मलबार किनारा, अंदमान बेटे, मलाया प्रदेशात इतरत्रही आढळते. हिच्या शरीराचा रंग निळसर असून दोन्ही बाजूंवर रुपेरी पट्टा असतो. चोचीसारखा आकार लांब असल्याने ही जाती हे. झँथॉप्टेरस जातीपासून वेगळी ओळखता येते. हे. डुसुमेरी ही जाती पू. आफ्रिका, भारत व मलाया या प्रदेशांच्या समुद्रांत आढळते. हे. फार या जातीचा प्रसार लाल समुद्र ते भारत व मलाया या भागांत विस्तृत प्रमाणावर आढळतो. हिच्या दोन्ही बाजूंवर चार उभे काळे चट्टे असतात. हे. गेमार्डी ही जाती ओरिसा व कोरोमंडल किनाऱ्यांवर आढळते. तेथे ही जाती मुबलक प्रमाणात असून भरतीच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहात जाते. बऱ्याच वेळा ती गोड्या पाण्यातही पकडली जाते.

हायपोऱ्हँफस युनिफॅसिएटस (संटोकी) ही सुंबची उत्तर अमेरिकन जाती असून ती अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत आढळते. [→ मत्स्य वर्ग].

जमदाडे, ज. वि.