सूक्ष्मतंत्रे, जीवविज्ञानीय : सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासण्याकरिता वा तपासणीकरिता सूक्ष्मजंतू , प्राणी व वनस्पतींच्या सूक्ष्मछेदाच्या कोशिकांच्या (पेशींच्या) काचपट्ट्या तयार करणे व त्या काचपट्ट्यांचे परिरक्षण (संरक्षण व जतन) करणे यांचा समावेश जीवविज्ञानीय सूक्ष्मतंत्रात होतो. जीवाच्या नमुन्यावर प्राथमिक परिरक्षण, कठिणीकरण, पारदर्शिकीकरण, त्यांच्या परिक्षण करावयाच्या भागांना निवडक रंग देणे (अभिरंजन) व त्याचे सूक्ष्मछेद तयार करणे या क्रिया कराव्या लागतात. मात्र काही जीवांच्या नमुन्यावर कोणतीही प्रक्रिया न करता त्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यास उपयुक्त माहिती मिळू शकते. 

सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणासाठी सर्वसाधारणपणे पुढील चार प्रकारच्या काचपट्ट्या तयार करतात : पूर्ण आरोपण, लेपन, लगदा व सूक्ष्मछेद. यांपैकी शेवटच्या तीन पद्घती ज्या नमुन्याचे निरीक्षण सूक्ष्मदर्शकाखाली करावयाचे आहे त्याची जाडी (रुंदी) कमी करण्यासाठी व तो निरीक्षणयोग्य बनविण्यासाठी वापरतात. या चारही पद्घतींत नमुना काचपट्टी, माध्यम (कॅनडा बाल्सम) व आच्छादन पट्टी यांमध्ये कायमस्वरूपी परिरक्षित केला जातो. यामध्ये नमुन्याचे स्थिरीकरण, परिरक्षण, अभिरंजनक्रिया व अखेरीस माध्यमात त्या नमुन्याची काचपट्टी तयार करणे या सर्वसामान्य क्रियांचा समावेश होतो.

स्थिरीकरण व परिरक्षण : निरीक्षण नमुन्याचे भौतिक वा रासायनिक वातावरणात स्थिरीकरण करता येते. याद्वारे संप्रेरकाची (हॉर्मोनाची) क्रिया थांबवितात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही तसेच ऊतकाच्या विघटनाची क्रिया थांबते. अशा प्रकारे परिरक्षित केलेले जीवाचे नमुने क्वचितच शास्त्रज्ञांपुढे अभ्यासासाठी ठेवले जातात. यांमध्ये त्यांना नमुन्याची बाह्य व अंतर्गत रचना याचा अभ्यास करावा लागतो. यामुळेच जीवाचा नमुना परिरक्षित करण्यापूर्वी त्याचे स्थिरीकरण करणे महत्त्वाचे असते. यामुळे त्या नमुन्याची रचना मूळ जीवाच्या नमुन्यासारखी राहते. आदर्श स्थिरीकरण विद्रावात जीव पूर्णपणे ताणलेल्या अवस्थेत असतो. याच वेळी जीवाचे अवयव व कोशिकेच्या जीवद्रव्याची संरचना यांचे परिरक्षण केले जाते. हालचाल करणाऱ्या जीवांचे स्थिरीकरण करताना प्रथिनाच्या स्वरूपात लगेच बदल होणे गरजेचे असते. जीवद्रव्याच्या संरचनेचे परिरक्षण करताना त्याचे हळूहळू टॅनिंग होण्याची गरज असते. स्थिरीकरणासाठी वापरली जाणारी रसायने बहुधा ती शोधून काढणाऱ्या तंत्रज्ञांच्या नावांनी ओळखली जातात. प्रथिनांच्या स्वरूपात लगेच बदल घडवून आणणारी रसायने, कमी तीव्रतेच्या टॅनिंग द्रव्याबरोबर मिश्रण करून वापरतात. ट्रायनायट्रोफिनॉल (पिक्रिक अम्ल), क्रोमियम ट्राय-ऑक्साइड (क्रोमिक अम्ल), मर्क्युरिक क्लोराइड व एथेनॉल हे अकिलाटक म्हणून वापरतात. डायक्रोमेट, ऑस्मियम टेट्राऑक्साइड (ऑस्मिक अम्ल), ॲसिटिक अम्ल व फॉर्माल्डिहाइड ही टॅनिंग द्रव्ये म्हणून वापरतात. यांपैकी कोणतेच मिश्रण परिपूर्ण नाही. मिश्रणाची निवड करताना त्याचे स्थिरीकरण, किलाटन (साखळणे) तयार होणे व टॅनिंग गुणधर्म यांसोबत कोशिका केंद्रकाचे परिरक्षण व जीवद्रव्याचे परिरक्षण यांबाबत त्या मिश्रणाचे महत्त्व तसेच ऊतकांचा सूक्ष्मछेद घेताना निरीक्षण नमुन्यात निर्माण होणारा ठिसूळपणा याचाही विचार करावा लागतो. तीव्र अम्ल किलाटकामध्ये केंद्रक व गुणसूत्रे यांच्या नेहमीच्या प्रतिमा दिसतात. कमी तीव्रतेचे टॅनिंग रसायन वापरल्यास जीवद्रव्याची रचना चांगली राहते व नमुना कमीतकमी ठिसूळ बनतो. कमी तीव्रतेच्या अम्लधर्मीय स्थिरीकरण विद्रावात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने चांगली प्रतिमा मिळते परंतु प्रकाशीय सूक्ष्मदर्शक फारसा उपयुक्त ठरत नाही.

मुक्त स्थिरीकरण विद्राव निरीक्षण नमुन्यापासून पाण्याने धुवून वेगळा केला जातो. ट्रायनायट्रोफिनॉलामध्ये स्थिरीकरण केलेले नमुने ७०% एथेनॉलामध्ये धुतले जातात (पाण्यात विद्राव्य ॲल्ब्युमिन ट्रायनायट्रोफिनॉल हे संयुग सजीवाच्या नमुन्यात स्थिर राहण्यासाठी अशा प्रकारे प्रक्रिया केली जाते). अल्कोहॉलिक कारनॉय व लॅब्रन विद्रावामधील नमुने एथेनॉलामध्ये धुतले जातात. नमुने धुतल्यानंतर त्यांचे परिरक्षण ७०% एथेनॉल किंवा ४ % फॉर्माल्डिहाइडामध्ये केले जाते.

अभिरंजके व अभिरंजनाची क्रिया : पूर्ण आरोपण, लेपन, लगदा व सूक्ष्मछेद यांपासून काचपट्टी तयार करण्यापूर्वी त्यांवर अभिरंजनाची क्रिया केली जाते. निरीक्षण नमुन्यातील विविध भाग वेगवेगळे दिसण्यासाठी आणि त्यांचे कार्य व रचना समजण्यासाठी ही क्रिया केली जाते. काही वेळा अभिरंजन क्रिया केलेला व अभिरंजन क्रिया न केलेला नमुना या दोन्हींतून प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाने फारशी समाधानकारक माहिती मिळू शकत नाही.

सूक्ष्मदर्शकीय नमुन्यांना रंग देण्यासाठी वापरली जाणारी अम्ल अभिरंजके कोशिकांतील केंद्रकांस रंग देतात, तर क्षारक अभिरंजके कोशिकेच्या इतर भागांना रंग देतात. तसेच काही अभिरंजके रंग देण्यासाठी इतर कोणत्याही रसायनाच्या मदतीशिवाय वापरतात त्यांना सरळ अभिरंजके म्हणतात. काही अभिरंजके वापरताना दुसऱ्या रसायनाची गरज असते. हे रसायन अगोदर किंवा अभिरंजकानंतर वापरावे लागते, तर काही वेळा ते रसायन अभिरंजकात मिसळून वापरले जाते.

ऑरेसिन, सॅफ्रिनीन, मिथिलीन ब्ल्यू व क्रिस्टल व्हायोलेट ही केंद्रकीय अभिरंजके म्हणून वापरतात. कार्‌माइन, हीमॅटॉक्सिलीन व सेलेस्टिन ब्ल्यूबी ही अभिरंजके इतर रसायनांबरोबर वापरतात. अम्ल अभिरंजके सूक्ष्मजंतू व सेल्युलोज यांना रंग देण्यासाठी वापरतात. इओसीन, ऑरेंज-जी, लाइट ग्रीन-एसएफ १, पॉनसो २ आर मिथिलीन ब्ल्यू ही विविध क्षारक अभिरंजके आहेत. ही नमुन्यास एकाच प्रकारचा रंग देतात परंतु दुसऱ्या रसायनांबरोबर वापरल्यास वेगळा परिणाम देतात. अशा रसायनांना रंगबंधक (रंग पक्का होण्यास उपयुक्त पदार्थ) म्हणतात. उदा., मिथिलीन ब्ल्यू हे फॉस्फोटंगस्टिक अम्लाबरोबर वापरल्यास ते कोलॅजेनाला चिकटून राहते. अम्ल व क्षारक अभिरंजकांपासून उदासीन अभिरंजके तयार करतात. त्यांचा वापर कोशिकांच्या केंद्रक व जीवद्रव्यास रंग देण्यासाठी करतात. इओसिनापासून तयार केलेली अनेक संयुगे (थायझिनाचा वापर करून) उदा., इओसीन-वाय मिथिलीन ब्ल्यू हे रक्ताची काचपट्टी तयार करण्यासाठी वापरतात.

क्षारक अभिरंजके सर्वसामान्यपणे पाण्याबरोबर किंवा कमी तीव्रतेच्या एथेनॉलाबरोबर वापरतात. अम्ल अभिरंजके ही इतर रंगद्रव्यांबरोबर वापरतात. विविध प्रयोगांतून अशा प्रकारची अनेक मिश्रणे तयार करण्यात आली आहेत. ऑरेसिन व काही ऑक्साझिने सोडून इतर अभिरंजके दुसऱ्या रंगद्रव्यांबरोबर मिश्रण करून वापरतात. हिमॅटॉक्सिलीन हे अम्लाबरोबर वापरल्यास गुलाबी रंग प्राप्त होतो, तसेच तेच क्षारकाबरोबर वापरल्यास निळा रंग प्राप्त होतो.

काही संश्लेषित अभिरंजके कोशिकेतील घटकांवर रासायनिक विक्रिया करतात. या विक्रियेमुळे तयार झालेली संयुगे रंगीत असतात. उदा., अभिरंजकाच्या विशिष्ट विक्रियेमुळे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) कोशिकेत कोठे व किती प्रमाणात आहे हे समजू शकते. बहुसंख्य संश्लेषित अभिरंजकांची सूत्रे व समीकरणे माहीत झाल्यामुळे जीवविज्ञानीय सूक्ष्मतंत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 


माध्यमांचे प्रकार : निरीक्षण नमुना काचपट्टीवर बसविण्यासाठी जे माध्यम वापरले जाते, ते सामान्यपणे परिरक्षक स्वरूपाचे असते. त्याचा प्रणमनांक हा जास्त असल्याने ते पारदर्शक असते तसेच ते काचपट्टीस चिकटून राहते. कॅनडा बाल्सम हे अशा प्रकारचे माध्यम असून ते काचपट्टी तयार करण्यास वापरतात. अशा प्रकारची इतर माध्यमे असून त्यांमध्ये ग्लायक्लोरोजील वापरल्यास कोशिकेतील मेद (वसा) निघून जातो. बेरलेस माध्यम हे जीवाच्या लहान व कठीण नमुन्यांसाठी योग्य आहे. यास अभिरंजकाची गरज लागत नाही. ग्लायकोसिरॉल हे अशाच कामासाठी वापरले जाते, ते वापरल्यास आच्छादन पट्टीच्या कडा बंद कराव्या लागतात. फॅन्टस माध्यम वापरून आच्छादन पट्टीच्या कडा गरम सुईसारख्या टोकदार उपकरणाच्या (निडलच्या) साहाय्याने बंद करतात.

काचपट्टी तयार करण्याची पद्घत : वनस्पती व प्राण्यांचे पूर्ण आरोपण, लेपन, लगदा व ऊतकांचे सूक्ष्मछेद यांपासून काचपट्ट्या तयार करतात. पूर्ण आरोपणामुळे अभ्यासकाला संपूर्ण नमुन्याचा किंवा त्याच्या विशिष्ट भागांचा सखोल अभ्यास करता येतो. लेपनाचा वापर जीवाणूच्या अभ्यासासाठी व रक्ताच्या तपासणीसाठी करतात. गुणसूत्राच्या अभ्यासासाठी लगद्याचा वापर करतात. यामध्ये विवक्षित नमुन्यावर दाब देऊन तो सपाट करतात व त्यापासून लगदा बनवितात.

पूर्ण आरोपण : यामध्ये निरीक्षण नमुना कोरडा (निर्जलीकरण) करून परिरक्षित केला जातो. बिया, हरिता (अर्चीगोनिया), सूक्ष्मजीवाश्म व लहान भुंगेरे हे काचपट्टीवर ठेवून सेल्युलोज एस्टर सिमेंटाचा वापर करून त्यावर आच्छादन पट्टी ठेवली जाते.

लहान नमुने पारदर्शक असल्यास त्यास अभिरंजकाची गरज नसते. त्याची बेरलेस माध्यमात काचपट्टी तयार करतात. बहुतेक लहान कवचधारी व संधिपाद प्राण्यांवर कोणतीही प्रक्रिया (स्थिरीकरण व परिरक्षण) न करता त्यांवर माध्यमाचा थेंब टाकून आच्छादन पट्टी ठेवली जाते. बहुतेक पूर्ण आरोपणामध्ये अभिरंजक वापरून बाल्समामध्ये काचपट्टी तयार करतात. यासाठी स्थिरीकरण, परिरक्षण, निर्जलीकरण, पारदर्शकीकरण व माध्यम वापरून काचपट्टी तयार करणे या क्रिया क्रमाने कराव्या लागतात.

निरीक्षण नमुन्याचे एखाद्या द्रवात स्थिरीकरण करतात. आकुंचन पावणाऱ्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाऱ्या) प्राण्याचे स्थिरीकरण करण्यासाठी कोणते रसायन जास्त उपयुक्त आहे, ते परीक्षणातून ठरविले जाते. अत्यंत नाजूक जीवाचे उदा., रोटॅटेरिया, मेड्यूसा व गोड्या पाण्यातील आदिजीव यांचे स्थिरीकरण १०–२१ से.च्या गरम द्रवात मारल्यानंतर केले जाते. बहुतेक वेळा हायड्रा व अमीबा यांना न मारता त्यांचे स्थिरीकरण गरम द्रवात करतात. स्थिरीकरण केलेल्या तसेच पाण्याने धुतलेल्या जीवाच्या नमुन्याचे ७०% एथेनॉलामध्ये परिरक्षण केले जाते. पूर्ण आरोपणामध्ये केंद्रक अभिरंजक वापरून नमुन्याच्या आतील अवयव व केंद्रक यांमध्ये फरक केला जातो. काही वेळा असे नमुने अल्कोहॉलामधून काढून ते रात्रभर ग्रेनरर्स कारमाइन यामध्ये ठेवले जातात. त्यानंतर ते ०·१ टक्का हायड्रोक्लोरिक अम्ल व ७०% एथेनॉल यांच्या मिश्रणाने धुवून विक्रियक द्रवात ठेवतात.

निर्जलीकरण प्रक्रिया आवश्यक असते, कारण अशा जीवाच्या नमुन्यातील पाणी कॅनडा बाल्सम विद्रावात शिरण्यास विरोध करते. हे नमुने अम्ल व अल्कोहॉल यांच्या विविध प्रक्रियांतून न्यावे लागतात. अखेरीस ते १००% एथेनॉलामध्ये ठेवावे लागतात. निरीक्षण नमुन्यांतील पाण्याच्या प्रमाणावर निर्जलीकरणाची प्रक्रिया व कालावधी ठरविला जातो. उदा., जळूच्या निर्जलीकरणासाठी २४ तासांचा कालावधी लागतो, तर फर्न प्रोथॅलस या वनस्पतीच्या निर्जलीकरणासाठी १० मिनिटे वेळ लागतो. नंतर या नमुन्याचे पारदर्शकीकरण केले जाते. त्यासाठी तेलाचा वापर करतात. उदा., लवंग तेल व थाइम ऑईल. तेलातून नमुना बाहेर काढल्यावर काचपट्टीवर ठेवून त्यावर कॅनडा बाल्समाचा थेंब टाकतात. नंतर त्यावर आच्छादन पट्टी टाकून कायम स्वरूपाची संरक्षित नमुन्याची काचपट्टी तयार करतात.

लेपन : ही पद्घती जैविक द्रव्याच्या काचपट्ट्या तयार करण्यास वापरतात. एका काचपट्टीवर रक्ताचा थेंब घेऊन दुसऱ्या काचपट्टीने तो सबंध काचपट्टीवर पसरवतात. यामुळे काचपट्टीवर रक्ताचे एक पातळ पटल तयार होते. काचपट्ट्या वाळवितात व त्यावर मिथिलीन ब्ल्यू किंवा लिश्मन ब्ल्यू हे अभिरंजक पसरवितात. त्यामुळे रक्तातील कोशिका रंगविल्या जातात. दोन मिनिटांनी काचपट्टी ऊर्ध्वपातित पाण्याने धुवून सुकवितात. रक्ताच्या पटलाची काचपट्टी अशा पद्घतीने तयार करतात.

लगदा : कोशिकांच्या काचपट्ट्या तयार करण्यासाठी ही पद्घती वापरतात. या पद्घतीसाठी निवडलेल्या जीवाच्या नमुन्याच्या अवस्थेवर याचे यश अवलंबून असते. फुलाचे परागकोश किंवा कीटकाचे वृषण काचपट्टीवर ठेवून त्याचा लगदा तयार करतात. वनस्पतीच्या मुळांची टोके व वनस्पतीचे किंजपुट यांचे मृदूकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी सेल्युलोजाचा वापर करतात. ड्रॉसोफिलाच्या लाला ग्रंथीची काचपट्टी तयार करण्यासाठी अळीतून या ग्रंथी चिमट्याने बाहेर काढतात. त्या काचपट्टीवर घेऊन त्यावर लॅकोरर्स ॲसिटोऑरेसिनाचे थेंब टाकतात. नंतर त्यावर पाणी टाकून स्वच्छ करतात व आच्छादन पट्टीवर बिब्युलस कागदाचा तुकडा ठेवून, बोटाने दाब देऊन लगदा बनवितात. लाला ग्रंथी काचपट्टी तयार करताना, अळीचे विच्छेदन करून लाला ग्रंथी शोधतात. त्यावर लवण विद्रावाचे थेंब टाकतात व लाला ग्रंथी बाहेर काढून घेतात. त्यावर अभिरंजकाची क्रिया करतात. यशस्वी लगद्याच्या साहाय्याने गुणसूत्राच्या काचपट्ट्या तयार करतात. यामध्ये गुणसूत्रे गडद व त्याच्या पाठीमागील भाग फिकट गुलाबी दिसतो.

अशा काचपट्ट्या कायम स्वरूपीदेखील तयार करता येतात. त्यासाठी काचपट्टी पाच मिनिटे बर्फाच्या लादीवर ठेवतात, ब्लेडने त्यावरील आच्छादन पट्टी काढतात. लगद्यासाठी वापरलेला भाग काचपट्टीस चिकटून राहतो. ती काचपट्टी ७०% एथेनॉलमध्ये ठेवतात, नंतर त्याचे निर्जलीकरण व पारदर्शकीकरण करून कॅनडा बाल्समाचा थेंब त्यावर टाकतात. त्यावर आच्छादन पट्टी टाकून कायम स्वरूपाची काचपट्टी तयार करतात.

सूक्ष्मछेद : कोशिकांच्या संरचनेच्या अभ्यासासाठी पातळ निरीक्षण नमुन्याच्या छेदाची आवश्यकता असते, अशा नमुन्यास सूक्ष्मछेद म्हणतात [→ सूक्ष्मछेदक ].

प्रकाशीय सूक्ष्मदर्शकासाठी लागणारा सूक्ष्मछेद : यासाठी लागणाऱ्या छेदाची जाडी ही २–२५ म्यूमी. असावी लागते. १० म्यूमीचे छेद हे ऊतकविज्ञान (सूक्ष्मशारीरिक) व विकारविज्ञानाच्या अभ्यासासाठी लागतात (१ म्यूमी. =१०–६ मी.).

गाजर, मुळा, पानांची देठे व मऊ खोडे अशा प्रकारच्या नमुन्यांचे छेद योग्य प्रकारचे पाते वापरून हाताने घेता येतात. छेद घेताना नमुना व पाने सतत ओली ठेवावी लागतात. असे छेद काचेच्या बशीमध्ये पाण्याने स्वच्छ करतात. या छेदांवर अभिरंजन क्रिया करून ते काचपट्टीवर ठेवतात. त्यावर कॅनडा बाल्समाचा थेंब टाकून आच्छादन करून त्याची काचपट्टी तयार करतात.


साध्या हस्तसूक्ष्मछेदक यंत्राचा उपयोग ०·००२ मिमी. जाडीचे छेद घेण्यासाठी करतात. यामध्ये गाजरासारख्या ताज्या नमुन्याचा छेद किंवा पानाचा छेद घेण्याकरिता भेंडाचा उपयोग करून घेता येतो. हस्तसूक्ष्मछेदक यंत्रापेक्षा स्वयंचलित सूक्ष्मछेदकाची कार्यक्षमता जास्त असते. यामध्ये १–६० म्यूमी. जाडीचे छेद कापता येतात. कोणत्याही सूक्ष्मछेदकामधून छेद घेण्यापूर्वी नमुना योग्य प्रकारे संस्कारित करून योग्य अशा माध्यमात बुडवून त्याचा छेद घेण्यायोग्य ठोकळा बनवावा लागतो. ठोकळा बनविण्यासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरतात. उदा., पॅराफीन, जिलेटीन व नायट्रोसेल्युलोज.

कोशिकाविज्ञान व ऊतकविज्ञानाच्या अभ्यासात छेद घेण्यासाठी पॅराफिनाचे माध्यम ठोकळा बनविण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात ५०–५५ से. वितळबिंदू असणारे पॅराफीन, तर उन्हाळ्यात ६० से. वितळबिंदू असणारे पॅराफीन वापरतात. ठोकळा तयार करण्यापूर्वी पॅराफीन तापस्थायी नियंत्रणाखाली असलेल्या गरम पेटीत ठेवतात. नमुन्याचा पॅराफिनाचा ठोकळा बनविण्यापूर्वी निर्जलीकरण करण्यासाठी निरनिराळी अंशके असलेल्या अल्कोहॉलामधून तो नेण्यात येतो. प्राण्यांची ऊतके एथेनॉलामधून, तर वनस्पतींची ऊतके ब्युटेनॉलामधून नेतात. नंतर तो नमुना झायलीन अगर बेंझिनामधून नेतात. तो नमुना योग्य प्रकारे वितळलेल्या पॅराफिनामध्ये ठेवतात. २४ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ नमुना पॅराफिनामध्ये ठेवल्यामुळे नमुन्यातील ऊतकांमध्ये पॅराफीन योग्य प्रकारे जाऊन बसते. ठोकळा बनविताना पॅराफिनाला चिकटपणा येण्यासाठी त्यात रबर किंवा बेबेरी मेण मिसळतात. जाडसर कागदाचा चौकोनी साचा बनवून त्यात वितळलेले मेण ओततात व त्यात तापस्थायी नियंत्रणाखाली असलेल्या गरम पेटीत वितळलेल्या पॅराफिनामध्ये ठेवलेला नमुना गरम चिमट्याने उचलून व्यवस्थित मांडतात. दोन नमुन्यांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवतात. छेद घेण्यापूर्वी योग्य मापाचा छेद घ्यावयास सोपे जाते. त्वचेचा ठोकळा बनविताना पॅराफिनावर त्वचेच्या नमुन्याचा भाग पसरावा लागतो व ठोकळा गार होण्यासाठी थंड पाण्यात बुडवावा लागतो.  

छेद घेण्यापूर्वी नमुना असलेला पॅराफिनाचा ठोकळा पात्याने व्यवस्थित कापावा लागतो. काटकोन चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असाव्या लागतात. अन्यथा छेदकाची सरळ फीत घेता येत नाही. अशा प्रकारे संस्कारित झालेला ठोकळा घूर्णी सूक्ष्मछेदकाच्या नमुनाधारकावर बसवितात. याची सुरी १२–१५ सेंमी. लांब असते. नेहमीच्या तापमानामध्ये ५–१२ म्यूमी. इतक्या जाडीचे छेद येऊ शकतात. ३–५ म्यूमी. जाडीचे छेद हवे असल्यास छेद घेताना शीत खोलीचा किंवा शीत पेटीचा उपयोग करावा लागतो. शीत खोली नसेल तर ठोकळा व सुरी बर्फाने थंड करावी लागते. कार्बन डाय-ऑक्साइडाचा उपयोग करून मेणाचा ठोकळा व सुरी थंड ठेवता येते. सूक्ष्मछेदकाचा वेग एका मिनिटामध्ये ८०–१०० छेद घेता येतील असा ठेवावयाचा असतो, म्हणजे छेदासह मेणाची फीत तयार होते व क्रमवार छेद मिळू शकतात.

छेदाचा क्रम लक्षात राहण्यासाठी छेदांचे आरोपण करण्यापूर्वीच काचपट्टीवर खुणा करून ठेवाव्या लागतात. काचपट्टीला मेअरस अल्ब्युमीन किंवा स्टार्च लावून ठेवावा लागतो (त्यामुळे छेद काचपट्टीला चिकटून राहतात). काचपट्टीवर पाणी घालतात. दोन टाचण्यांवर फीत अलगद उचलून काचपट्टीवर ठेवतात, काचपट्टी थोडी तापवितात व फीत दोन्ही बाजूंनी ताणून काचपट्टीवर बसवितात. नंतर काचपट्टीवरील पाणी वाहून जाऊ देतात व काचपट्टी वाळविण्यास ठेवतात. धुळीपासून या काचपट्टीचे रक्षण करावे लागते. 

काचपट्टी वाळल्यावर झायलीन किंवा बेंझिनामध्ये ठेवतात. नंतर विद्रावक विरघळण्यासाठी १००% अल्कोहॉलामध्ये ठेवतात, त्यानंतर अभिरंजन करून काचपट्टी अल्कोहॉल-लवंग तेल-झायलॉल यांमधून नेऊन, काचपट्टीवर कॅनडा बाल्सम किंवा इतर द्रव्यांचा थेंब ठेवतात. शेवटी त्यावर आच्छादन पट्टी घालून कायम स्वरूपाची काचपट्टी तयार करतात.

नमुना संस्कारित करून झाल्यावर ठोकळा बनविण्यासाठी जिलेटिनाचा वापर करतात. जिलेटीन वापरताना नमुना १०%, २०%, ४०%, व ८०% असे अंशक (ग्रेड) असलेल्या द्रव जिलेटिनामधून न्यावा लागतो. नंतर ठोकळा फिनॉल घातलेल्या पाण्यामधून धुवून काढावा लागतो. गोठण सूक्ष्मछेदकाचा उपयोग करून नमुना आवश्यकतेप्रमाणे गोठवला जातो व त्याचे छेद घेतले जातात. सुरीवरून छेद काढून घेऊन १% फॉर्माल्डिहाइडामध्ये ठेवण्यात येतात. त्यामुळे जिलेटीन योग्य प्रमाणात कठीण केले जाते आणि नमुना अभिरंजनासाठी व काचपट्टी तयार करण्यासाठी योग्य केला जातो.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासाठी लागणारा सूक्ष्मछेद : यासाठी अत्यंत पातळ छेद (२०–३० नॅमी.) लागतात (१ नॅमी.=१९–९ मी.). त्यासाठी वेगळी साधने व साहित्य वापरतात. प्राण्यांच्या ऊतकाचे स्थिरीकरण पॅलेड स्थिरकात करतात, तर वनस्पती ऊतकासाठी ल्युफ्टस् स्थिरक वापरतात. या दोन्ही विद्रावकांचा अभिरंजक म्हणूनही उपयोग होतो.

स्थिरीकरण केलेले व धुतलेले नमुन्याचे तुकडे (०·२५ मिमी. आकारमानाचे चौकोनी तुकडे) निर्जलीकरण करून ॲसिटोनामध्ये किंवा ईथरमध्ये ठेवतात. नंतर ते प्लॅस्टिक (आकार्य) एकवारिकात ठेवतात. प्लॅस्टिकाची संरचना व त्याचे काठिण्य इच्छेनुसार ठरविता येते. मिथेल मिथॅक्रायलेट (काठिण्यासाठी)  व ब्युटिल मिथॅक्रायलेट (मृदीकरणासाठी) यांचे मिश्रण पूर्वी वापरले जात असे. आता प्लॅस्टिकीकारक त्यात मिसळतात.

जिलेटीन वेष्टचा वापर करून त्याचे ठोकळे बनवितात. ठोकळा दोन्ही बाजूंनी पात्याने पातळ करून त्यास प्रसूचीचा आकार देतात. तो अल्ट्रामायक्रोटोमच्या नमुनाधारकावर बसवितात. धारक ठोकळ्यास वरखाली नेत असतो. सुरीची धारधार बाजू ४५ अंशाच्या कोनात असावी. कठीण नमुन्याचे छेद घेण्यासाठी हिऱ्याचे (हिरकणीचे) पाते असलेल्या सुऱ्या वापरतात. या छेदाचे अभिरंजन करण्यासाठी शिसे किंवा युरेनियम लवणाचा रंजक म्हणून वापर करतात. जाळीच्या साहाय्याने सूक्ष्मछेद धारकातून बाहेर काढतात व त्याचा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केला जातो. 

काचपट्टीची स्वच्छता व साठवणूक : कॅनडा बाल्समाचा वापर करून बनविलेली काचपट्टी ४५ से. तापमानास तप्तपट्टी (हॉट प्लेट) तापवून कठीण बनविली जाते. जादा झालेले बाल्सम झायलॉलाचा वापर करून काढून टाकले जाते. त्यानंतर काचपट्टी साबणाच्या गरम पाण्याने धुतात. काचपट्टी वाळल्यावर एका बाजूस नमुन्याच्या नावाची पट्टी लावतात. पूर्ण आरोपण व छेदाच्या काचपट्ट्या पसरट तबकामध्ये ठेवतात. अशा प्रकारे तयार केलेल्या व थंड ठिकाणी ठेवलेल्या काचपट्ट्या सु. ५० वर्षे व्यवस्थित राहू शकतात.

पहा : रंजक, जीवविज्ञानीय रंजक व रंजकद्रव्ये सूक्ष्मछेदक सूक्ष्मजीव अभिरंजन.

पाटील, चंद्रकांत प.