हंस-२ :  ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी पक्षिकुलातील ॲन्सरिनी उपकुलामधील आणि ⇨ राजहंस व ⇨ बदक या दोहोंशी पुष्कळ साम्य असलेला पाणपक्षी. याच्या ॲन्सर (करडा हंस) व ब्रँटा (काळा हंस) या दोन प्रजाती असून सु. १५ जाती व त्यापेक्षा जास्तउपजाती आहेत.

ॲन्सर प्रजातीच्या हंसांचे पाय व चोची साधारणपणे गुलाबी, नारिंगी किंवा करडे असतात. या प्रजातीत बार-हेडेड (. इंडिकस), ग्रेलॅग (. ॲन्सर), बिन (. फॅबिलिस), पिंक फूटेड (. ब्रॅकिर्‍हिंकस), स्वान (. सिग्नॉइड्स), व्हाइट फ्रन्टेड (. एरिथ्रोपस) इ. जाती समाविष्ट होतात. ब्रँटा प्रजातीतील हंसांच्या चोची या नेहमीच काळ्या असतातआणि त्या ॲन्सर प्रजातीतील हंसांच्या चोचींपेक्षा मऊ असतात. या प्रजातीत बारनॅकल (ब्रँ. ल्यूकॉप्सिस), ब्रेंट (ब्रँ. बेर्निक्ला), कॅनडा (ब्रँ. कॅनाडेन्सिस), हवाईयन (ब्रँ. सँडव्हिसेन्सिस) व रेड ब्रेस्टेड (ब्रँ. रुफिकॉलिस) आदी जाती समाविष्ट होतात.

हंसांच्या जाती : (अ) कॅनडा (ब्रँटा कॅनाडेन्सिस ), (आ) ग्रेलॅग (ॲन्सर ॲन्सर ).

हंसांच्या विविध प्रकारच्या जाती जगात सर्वत्र सापडतात व बहुतेक सर्व जाती स्थानांतर करतात [→ स्थलांतर]. काही जातींच्या हंसांचे प्रजनन उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते व हिवाळ्यात ते दक्षिणेकडे उष्ण- कटिबंधीय यूरोप, आशिया व अमेरिका या खंडांत स्थानांतर करतात. हिवाळ्यात उत्तर भारताच्या पश्चिमेकडील भागात पुष्कळ हंस दिसतात.

हंसाचा आकार व रंग प्रत्येक जातीत वेगवेगळा असतो. एखाद्या मोठ्या राजहंसाइतका किंवा लहान कबुतराएवढा किंवा त्याच्या मधले कोणतेही आकार त्यांच्यात दिसून येतात. रंग शुभ्र पांढरा ते राखी, तपकिरी व काळपट हिरवट या रंगांचे मिश्रण असलेला असा असतो. चोच रुंद, चपटी व टोकाकडे गोलाकार असते. पंख अरुंद व निमुळते असतात. त्यामुळे त्यांना लांबवर उडता येते. शेपूट लहान, पाय आखूड व बदका-प्रमाणे पडदे असलेले पाऊल असते. अंगावर भरपूर लहानलहान पिसे असतात व इतर पाणपक्ष्यांप्रमाणे दाट पिसारा असतो. हंस जमिनीवरील विशेषेकरून पाण्याच्या आसपास असलेल्या वनस्पती खातात.

सर्व जातींच्या हंसांचे जीवनचक्र समान असते. नर-मादीची जोडी सबंध आयुष्यभर कायम असते. काही कारणाने नर किंवा मादी मेली अथवा कायमची दूर गेली तर क्वचित दुसरा जोडीदार निवडला जातो.दुसरा जोडीदार निवडताना अनेक वर्षे ते वाट पाहू शकतात वा आयुष्यभर एकाकी देखील राहतात. हंसांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी प्रौढावस्था येते. नैसर्गिक अधिवासातील जातीत मादी तिसऱ्या वर्षी अंडी घालायला लागते. एकदा वयात आल्यावर मादी दरवर्षी अंडी घालते. लहान पक्षी अंडी घालणाऱ्या मोठ्या पक्ष्यांपासून वेगळे राहतात.

स्थलांतर करणारे हंस अतिशय तीव्र उपजत प्रवृत्तीमुळे ३,२००-४,८०० किमी. अंतराचा प्रवास करून आपल्या जन्मस्थानी जोडी जमविण्यासाठी व घरटे बांधण्यासाठी येतात. नर हंस घरटे करण्यासाठी एखादा प्रदेश निवडतो व तेथे तो कोणालाही अतिक्रमण करू देत नाही. नंतर मादी हंस त्या प्रदेशातील विशिष्ट जागा निवडते व तेथे घरटेकरते. घरट्याचा आकार वेगवेगळ्या जातींत वेगवेगळा असतो. घरटी तळ्याच्या काठावर किंवा चिचुंदरीच्या रिकाम्या झालेल्या बिळात असतात. घरट्याचा आतील भाग पक्ष्याच्या शरीरावरील अगदी लहानलहानपिसांचा बनलेला असतो. त्यामुळे अंडी चटकन दिसून येत नाहीत. मादी दिवसाला एक याप्रमाणे साधारण ४-७ अंडी घालते. अंडी उबविण्याचा काळ जातीप्रमाणे २१-३० दिवस असतो. नर घरट्याजवळ राहूनघरट्याचे संरक्षण करीत असतो. अंडी उबल्यानंतर त्यातील पिलूत्याच्या दाताने (चोचीच्या टोकाला असलेल्या कठीण भागाने) अंड्याचे कवच फोडून बाहेर येते. अंड्याचे कवच फोडून बाहेर यायला पिलाला साधारणपणे २४ तास लागतात. सर्व पिले बाहेर येईपर्यंत मादी घरट्यातच थांबते. पिलांचे वय एक दिवस असतानाच पिले नर-मादीच्या संरक्षणा-खाली साधारण ९-१२ मी. खोल असलेल्या पाण्यात पोहण्यास शिकतात. प्रत्येक जातीप्रमाणे ४०-८५ दिवसांत पिले उडण्यायोग्य होतात. पिले२-३ महिन्यांची (उडणारी) झाल्यानंतर सर्वच थवा स्थलांतर करतो.

सुमारे एक वर्ष वयाचे किंवा त्याहून लहान अननुभवी पक्षीजाळ्यात सापडून किंवा शिकाऱ्याच्या हातून मरतात. पाळलेले पक्षीमात्र २०-३० वर्षे जगतात. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या जाती१०-१५ वर्षांपर्यंत जगतात.

बहुतेक सर्व हंस एकाच थव्यात कायम राहत असल्याने ते एकमेकांना सहज ओळखतात. काही जातींच्या हंसांच्या थव्यात हजारो पक्षी असतात. एखाद्या संकटाची सूचना काही पक्ष्यांनी केली, तर क्षणार्धात सर्व थवाउडून जातो. संकटाची कल्पना जर थोडी आधी कळली, तर हंस आपले डोके जमिनीवर २-३ वेळा आपटतो. त्यामुळे आसपासच्या परिसरातील इतर पक्ष्यांनाही संकटाची जाणीव होऊन ते सावध होतात. उडताना हंस २-३ पावले जमिनीवर चालत जाऊन मग उडतात.

थव्यामध्ये असताना या पक्ष्याचे इतर सदस्यांशी प्रेमाचे संबंध असतात. थव्यातील एखादा पक्षी जखमी झाल्यास किंवा आजारीपडल्यास त्याला सुरक्षित जागी सोडण्यात येते. अशा वेळी थव्यातीलकाही हंस त्याच्या मदतीसाठी व सुरक्षिततेसाठी थांबतात. जोपर्यंत तो उडण्यास योग्य होत नाही अगर त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत ते त्याची सोबत करतात. तो हंस उडण्यायोग्य झाल्यास ते स्वतंत्रपणे एकत्रित उडतात किंवा उडणाऱ्या एखाद्या थव्यात सामील होतात.


हंस स्थलांतर करताना त्यांचा थवा खूप उंचीवरून ‘V’ या इंग्रजी अक्षराच्या आकारात उडत जातो. उडत असताना पुढील भागातील हंस थकल्यास त्यांची जागा इतर हंस घेतात. अशा वेळी त्यांचा वेग कायम ठेवण्यासाठी इतर हंस विशिष्ट ध्वनी काढून त्यांना प्रोत्साहित करतात. ते रात्री किंवा दिवसा प्रवास करतात. वाऱ्याची दिशा व ढगाळ हवामान यांचा त्यांच्या प्रवासावर परिणाम होतो. प्रवासाचा मार्ग नेहमी तोच असतो. संशोधनान्ती असे आढळून आले आहे की, आकाशातील ताऱ्यांच्या व नक्षत्रांच्या स्थानावरूनही प्रवासाचा मार्ग बिनचूक ठरविला जातो. ते प्रवासात नेहमी ठराविक जागीच थांबतात. त्याचप्रमाणे हंस एकमेकांशी संवाद साधण्यासाठी परिस्थितीनुसार विविध प्रकारचे सु. १० आवाज काढू शकतात.

वर्षातून एकदा प्रौढ हंसाला शेपटीची पिसे गळल्यामुळे आपला थवा सोडून द्यावा लागतो. नवीन पिसे येईपर्यंत तो उडू शकत नाही. नवीन पिसे येईपर्यंत सहा आठवड्यांचा कालावधी लागतो, तोपर्यंत शत्रूंपासून स्वसंरक्षण करण्याकरिता तो पाण्याच्या आसपासच राहतो.

भारतात देखील हंसांच्या काही जाती आढळतात. ग्रेलॅग हंस हीजाती जगात बहुतेक सर्व ठिकाणी सापडते. सर्व पाळीव जाती त्या जातीपासूनच तयार झाल्या आहेत. हिवाळ्यात उत्तर भारतामध्ये काश्मीर व पंजाब येथे त्या जातीचे हंस पुष्कळ आढळतात. त्यांचा रंग शुभ्र पांढराव पाठीमागचा भाग तेवढा करड्या रंगाचा असतो. ईस्टर्न ग्रेलॅग, व्हाइट फ्रन्टेड वगैरे जातीही उत्तर भारतात आढळतात.

बार-हेडेड हंस ही जाती काश्मीर, पंजाब, राजस्थान, नेपाळ वआसाम या भागांत आढळते. त्यांचे प्रजनन लडाखच्या परिसरात होतेव इतर भागांत ते हिवाळ्यात आढळतात. त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे असून डोके पांढरे, शेपटी राखाडी, छातीचा भाग पांढरा–तपकिरी, चोच पिवळी व पाय नारिंगी असतात. बार-हेडेड हंस सर्वोच्च उंचीवर उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे. तो सु. ५,५०० मी. उंचीवर उडून हिमालय पर्वत ओलांडून हिवाळा व्यतीत करण्यासाठी तिबेट व भारतात येतो.

कोल्हा, घुबड, रॅकून व समुद्री कासव हे हंसांचे नैसर्गिक शत्रू आहेत. जेव्हा हंस घाबरतात तेव्हा स्वसंरक्षणासाठी ते मान उंच करून मोठमोठ्याने ओरडतात. नर नेहमीच मादीचे संरक्षण करतो.

हंसाची शिकार हा फार लोकप्रिय खेळ आहे. हंस अत्यंत सावध असल्याने त्याची शिकार साधणे फार कौशल्यपूर्ण काम असते. त्याची तीक्ष्ण दृष्टी व श्रवण शक्ती यांमुळे पूर्वी रोमन लोक त्यांचा उपयोग पहारेकऱ्यासारखा करीत.

ग्रेलॅग या पाळीव हंसाची उडण्याची शक्ती जवळजवळ नाहीशी झालेली असून ते लठ्ठ असतात. पाइटीर (फ्रान्स) येथे हंसाच्या एका विशिष्ट जातीची पैदास करतात. त्यांच्या अंगावर खूप दाट लहानलहानपिसे असतात. त्यांपासून पावडर लावायचे फूल तयार करतात. हंसांच्या यकृतापासून फवा-ग्रास नावाचा पदार्थ तयार करणे हा स्ट्रॅस्बर्गच्या आसपासच्या लोकांचा मोठा व्यवसाय आहे. फवा-ग्रास हा पदार्थअत्यंत रुचकर पक्वान्न समजतात. पाश्चात्त्य देशांत कुक्कुटपालनात हंसाचाही समावेश केला जातो. हंस रोगाला लवकर बळी पडतनसल्याने त्यांना पाळणे सोपे असते. 

संदर्भ : 1. Ali, Salim Futehally, Laeeq Common Birds, New Delhi, 1967.

           2. Whistler, H. Popular Handbook of Indian Birds, London, 1963.  

चिन्मुळगुंद, वासंती 


बार-हेडेड हंस (ॲन्सर इंडिकस) ग्रेलँग हंस (ॲन्सर ॲन्सर)
पिंक फूटेड हंस (ॲम्सर ब्रॅकिऱ्हिंकस) स्वान हंस (ॲन्सर सिग्नॉइड्‌स)
कॅनडा हंस (ब्रँटा कॅनाडेन्सिस) ब्रेंट हंस (ब्रँटा बेर्निक्ला)
हवाईयन हंस (ब्रँटा सँडव्हिसेन्सिस) बारनॅकल हंस (ब्रँटा ल्यूकॉप्सिस)