भट्टोजी दीक्षित : (सतरावे शतक). संस्कृत वैयाकरणी. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मीधर. शंकरभट्ट, अप्पय्य दीक्षित ह्यांच्यासारख्या गुंरुकडे त्यांनी काही विद्याध्ययन केले. व्याकरणाचे अध्ययन आंध्रातील प्रसिद्ध ‘शेष’ घराण्यातील कृष्णशेष ह्यांच्याकडे केले. ⇨ सिद्धांतकौमुदी (लेखन सु.१६२५ मध्ये) आणि प्रौढमनोरमा हे भट्टोजींचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सिद्धांतकौमुदीत पाणिनीची सूत्रे विषयावर संगृहीत असून त्यांवर थोडक्यात भाष्यही करण्यात आले आहे. ह्या ग्रंथाचे तयार करण्यात आलेले लघुरूप, त्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक टीका आणि त्याची उपलब्ध असलेली अनेक हस्तलिखिते त्याची लोकप्रियता दाखवून देतात. प्रौढमनोरमा म्हणजे भट्टोजींनी स्वतःतच आपल्या सिद्धांतकौमुदीवर लिहिलेले तपशीलवार भाष्य होय. भट्टोजींचे हे दोन्ही ग्रंथ संस्कृताच्या अध्ययनास पायाभूत मानले जातात. सिद्धांतकौमुदी कंठस्थ असेल, तर व्याकरणभाष्यावर परिश्रम करण्याची जरुरी नाही, अशा आशयाची जी प्रशस्ती केली जाते, ती काहीशी अतिशयोक्त असली, तरी तीवरुन ह्या ग्रंथाचे महत्व कळून येते. ज्ञानेंद्रसरस्वतींची तत्त्वबोधिनी आणि वासुदेव दीक्षितांची बालमनोरमा ह्या सिद्धांतकौमुदीवरील दोन टीका विशेष प्रसिद्ध आहेत. ह्या दोन ग्रंथांखेरीज भट्टोजींचा शब्दकौस्तुभ (पतंजलीच्या महाभाष्यावरील विस्तृत टीका, मात्र ती अपूर्ण राहिल्याचे दिसते.) ग्रंथही प्रसिद्ध आहे.

भट, गो.के.