मिज माशी : ही माशी डिप्टेरा गणात मोडते. या माश्यांची पुष्कळ कुले आहेत. त्यांपैकी सीसिडोमाइडी कुलातील काही जातींच्या माश्यांमुळे पिकांची बरीच हानी होते. प्रामुख्याने गहू, बाजरी व ज्वारी या पिकांवर या जातींच्या माश्या आढळतात. भारतात कॉन्टॅरिनिया सोर्घीकोला या माशीच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरत नाहीत. त्यामुळे ही एक महत्त्वाची कीड समजली जाते व याच माशीचे प्रामुख्याने खाली वर्णन दिलेले आहे.

मिज माशी आकारमानाने लहान असते. तिची लांबी १·५ ते २ मिमी. असते. नर मादीपेक्षा लहान असून गर्द लाल रंगाचा असतो. मादी गर्द नारिंगी किंवा तांबडी असते. मादीचा मागील भाग निमुळता होत जाऊन त्याचा लांब अंडनिक्षेपक बनतो. याचा उपयोग फुलामध्ये अंडी घालण्यासाठी होतो. कोषातून बाहेर पडल्यानंतर तासाच्या आतच नरमादीचा समागम होऊन तास दीड तासानंतर मादी अंडी घालण्यास सुरुवात करते. अंडी बहुधा सकाळच्या वेळेस घातली जातात. एक मादी सु. ३० ते ३५ अंडी घालते. सुरुवातीला अंडी पिवळसर व नारिंगी रंगाची असतात. पुढे ती गर्द नारिंगी रंगाची होतात. त्यांतून २ ते ५ दिवसांत डिंभ किंवा अळ्या बाहेर पडतात. अळ्या बीजकाच्या [→ फूल] कोशिका (पेशी) कुरतडतात आणि त्यातून बाहेर येणारा रस शोषून घेतात. यामुळे बीजकाचे दाण्यात रूपांतर होत नाही व कणसे दाण्याने भरत नाहीत. ही अळी तीन वेळा कात टाकते व तिची वाढ पूर्ण होते. तिचा रंग गर्द नारिंगी असतो. दोन-तीन दिवसांनी फुलातच ती कोषावस्थेत जाते. कोषावस्था ६ ते १० दिवसांची असते. माशी कोषातून बाहेर पडण्यापूर्वी कोष पुष्पकाच्या (फुलोऱ्यातील एकेका फुलाच्या) टोकावर सरकतात. कोषातून माशी सर्वसाधारणपणे सकाळी बाहेर पडते. या माश्या एक दोन दिवसांपेक्षा जास्त जगत नाहीत. यांची एक पिढी साधारणपणे १३ ते ३२ दिवसांत पूर्ण होते. बिगर हंगामात या माश्या सुप्तावस्थेत राहतात. दाणे काढल्यानंतर राहिलेले कणसाचे भाग, खळ्यातील किंवा शेतातील कणसे अगर भुसा यांशिवाय काही जातींची गवते (उदा., पाणकणीस) किंवा इतर पोषक वनस्पती यांत ही सुप्तावस्था आढळते.

या कीटकाच्या नियंत्रणासाठी वर निर्देश केलेल्या सुप्तावस्थेतील निवासस्थानांचा नाश करणे आवश्यक आहे. पोटऱ्यांतून ५० टक्के कणसे बाहेर पडताच १० टक्के बीएचसी, ४ टक्के एंडोसल्फान किंवा १० टक्के कार्बारिल भुकटी हेक्टरी २० किग्रॅ. या प्रमाणात पिकावर उडविल्यास व पुन्हा पाच दिवसांनी याचीच पुनरावृत्ती केल्यास या किडीचा नाश होतो.

कायरोनोमिडी कुलातील मिज माश्या चावत नाहीत. त्या थवे करून राहतात. त्यांच्या गुणगुणण्याचा आवाज मोठा असतो. त्यांचे डिंभ पाण्यात राहतात व ते माशांचे खाद्य आहेत. रंगाने ते तांबडे असतात म्हणून त्यांना रक्तकृमी म्हणतात.

सेरॅटोपोगॅनिडी कुलातील मिज माश्या चावणाऱ्या आहेत. क्युलिकॉइडीस गणातील माश्या हत्तीरोग कृमीच्या वाहक आहेत.

सीसिडोमाइडी कुलातील माश्यांमुळे झाडांना गाठी येतात. महाराष्ट्राच्या सर्व भागांत या मिज माशीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव आहे.

पोखरकर, रा.ना.