भा : (इ. स. ६०० ते ७५० च्या दरम्यान). संस्कृत साहित्य शास्त्रकार. काव्यालंकार ह्या साहित्यशास्त्रविषयक ग्रंथाचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. त्याच्या पित्याचे नाव रक्रिलगोमिन् असे होते, हे काव्यालंकारातील एका उल्लेखावरून दिसते. राहुल, पोतल ह्यांसारख्या बौद्ध नावांशी रक्रिल ह्या नावाचे साम्य जाणवल्यामुळे, तसेच ‘गोमिन्’ हे बुद्धाच्या एका शिष्याचे नाव असल्यामुळे, रक्रिलगोमिन् हा असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे आणि भामहाचा पिता बौद्ध असल्यामुळे भामह हाही बौद्ध असावा, असे त्यांना वाटते. तथापि ह्याबाबत मतभेद आहेत. शिवाय भामह हा बौद्ध होता, असे दर्शविणारा निर्णायक असा कोणताही पुरावा काव्यालंकार ह्या त्याच्या ग्रंथात सापडत नाही. भामहाच्या काळासंबंधी विविध अभ्यासकांची मते विचारात घेता तो इ.स. ६०० ते ७५० च्या दरम्यान केव्हा तरी होऊन गेला असावा, असे दिसते. भामह आणि काव्यादर्शकार दंडी हे समकालीन असल्याचे म्हटले जाते.

भामहाच्या काव्यालंकारात एकूण सहा परिच्छेद (विभाग) असून त्यातील श्लोकसंख्या सु. ४०० आहे. आपल्या ह्या ग्रंथात त्याने एकूण ३९ अलंकारांचा परामर्श घेतला. प्रत्येक अलंकारात वक्रोक्ती असतेच तिच्याशिवाय अलंकार असू शकत नाही, अशी भामहाची भूमिका होती. काव्यशास्त्रात अलंकाराची स्वतंत्रपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे, हे भामहाने दाखवून दिले. काव्याच्या संदर्भात अलंकार हे उपरे किंवा अनावश्यक नसून शब्दव्युत्पत्ती (व्याकरणदृष्टया उचित अशी शब्दयोजना) आणि अर्थालंकार ह्या दोहोंचीही काव्याला गरज आहे, हे मत त्याने आग्रहपूर्वक मांडले. ‘शब्दार्थै सहितौ काव्यम्’ अशी त्याने काव्याची व्याख्या केली आहे. भामहाच्या काव्यालंकार हा भामहांलंकार ह्या नावाने ओळखला जातो. भामहाच्या ह्या ग्रंथावर उदभटाने भामहविवरण किंवा भामहवृत्ति अशी एक टीका लिहीली होती, असे दिसते. तथापि ती आज उपलब्ध नाही.

कुलकर्णी, अ. र.