सूर्यनारायण शास्त्री : (१८८०–१९८०). नामवंत संस्कृत पंडित. आंध्र प्रदेशातील कडियापुलंका ह्या गावी जन्म. प्राथमिक शिक्षण ह्या गावातच पूर्ण केल्यानंतर ते धवेलेस्वरम् येथे पारंपरिक पद्घतीने संस्कृत शिकण्यासाठी गेले. त्यानंतर काही काळ ते पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अमलापुरम् येथे तेलुगू पंडित म्हणून काम करीत होते. त्यानंतर त्या काळी चेन्नईमध्ये असलेल्या आंध्र साहित्य परिषदेत संशोधक (रिसर्च स्कॉलर) म्हणून कार्यरत झाले. पुढे राजमहेंद्री येथील ‘आर्ट्‌स कॉलेजा’त अध्यापन करु लागले (१९१९–३१). यथावकाश राजमहेंद्री विद्यापीठात अधिव्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्यांच्या ग्रंथसंपदेत जवळपास वीस पुस्तके तेलुगूत लिहिलेली असून तीन संस्कृतात आहेत. त्यांनी दोन खंडांत लिहिलेला संस्कृत साहित्याचा इतिहास, तसेच संस्कृत कवींच्या चरित्रांवरील ग्रंथ ह्यांना मोठी मान्यता प्राप्त झाली. आंध्र भाषानुशासन हा संस्कृत व्याकरणावरचा त्यांचा ग्रंथही उल्लेखनीय आहे. भवभूतीच्या उत्तररामचरिता चा आणि धनंजयाच्या दशरुपका चा तेलुगू अनुवादही त्यांनी केला. सौरतत्त्वविवेक ह्या त्यांच्या संस्कृत ग्रंथावरुन वैदिक साहित्याचा त्यांचा खोल व्यासंग प्रत्ययास येतो.

सूर्यनारायण शास्त्री हे कवीही होते. वेंकटगिरीचे महाराज व्ही. आर्. के. यचेंद्र ह्यांच्या दरबारी ते काही वर्षे राजकवी होते. अन्य काही संस्थानिकांचाही त्यांना सन्माननीय आश्रय लाभला होता.

कुलकर्णी, अ. र.