विक्रमोर्वशीय : कविकुलगुरू ⇨कालिदासकृत पाच अंकी संस्कृत नाटक. ह्या नाटकाचे संविधान थोडक्यात असे : केशीनामक दानवाच्या तावडीतून राजा पुरूरव्याने उर्वशीची सुटका केल्यानंतर उर्वशी त्या राज्याच्या प्रेमात पडते. राजाही तिच्यावर अनुरक्त होतो. आपल्या पतीचे मन अन्य स्त्रीवर गेल्याचे कळल्यामुळे पुरूरव्याची राणी औशीनरी संतप्त होते. ऊर्वशीचे मन राजा पुनरव्याच्या विचाराने इतके भारावून गेलेले असते, की स्वर्गातील एका नाट्यप्रयोगात लक्ष्मीचे काम करीत असताना ‘पुरुषोत्तमावर माझे प्रेम आहे’ असे वाक्य म्हणावयाच्या ऐवजी ‘पुरूरव्यावर माझे प्रेम आहे’ असे वाक्य तिच्या तोंडून जाते. परिणामतः ‘ह्या दिव्यलोकी तुला जागा नाही’ असा शाप भरतमुनी तिला देतात. परंतु इंद्र तिला स्वर्गात परत येण्याची एक वाट मोकळी करून देतो. पुरूरव्यासह तू राहा आणि तुझ्या पासून झालेल्या अपत्याचे तोंड त्याने पाहिले, की तू स्वर्गलोकात ये असे तो तिला सांगतो. त्यानंतर पुरूरवा आणि उर्वशी एकत्र येतात. राणी औशीनरी हीसुद्धा ‘प्रियानुप्रसादन’ नावाचे व्रत पूर्ण करून ‘राजा जिच्यावर प्रेम करीत असेल, तिच्यावर मीही प्रेम करीन’ अशी प्रतिज्ञा करते. पुरूरवा व उर्वशी गंधमादन वनात विहारासाठी जातात. तेथे स्त्रियांना निषिद्ध अशा कार्तिकेय वनात उर्वशी शिरल्यामुळे तिचे रूपांतर एका लतेत होते. तिच्या विरहाने दुःखी झालेला राजा तिचा शोध घेत असतो (त्या वेळची पुरूरव्याच्या उन्मन अवस्थेतील विलापिका ही कदाचित सर्वांत प्राचीन संगीतिका (ऑपेरा) ठरेल. ह्या शोधात राजाला एक देदीप्यमान मणी दिसतो. हा संगमनीय मणी असून तुझ्या प्रियेशी तुझा संगम होईल, असे एका मुनीने सांगितल्यामुळे राजा तो मणी हातात घेतो व लता झालेली उर्वशी पुन्हा त्याच्या समोर प्रकटते. नाटकाच्या अखेरीस राजाची उर्वशीपासून झालेल्या त्याच्या पुत्राशी भेट होते. संगमनीय मणी पळवून नेणाऱ्या एका पक्ष्याला एका बालकाने बाण मारून ठार केलेले असते. च्यवन ऋषींच्या आश्रमातून एक तापसी त्या बालकाला घेऊन येते. हे बालक म्हणजेच उर्वशी-पुरूरवा ह्यांचा पुत्र (आयुः) असतो. पण राजाने पुत्राचे मुख पाहिल्यामुळे उर्वशीशी वियोग होण्याचा प्रसंग त्याच्यावर येतो. राजा राज्याचा भार पुत्रावर टाकून चतुर्थ आश्रमात जाण्याची तयारी करीत असतानाच ‘इंद्राने उर्वशीला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहण्याची अनुज्ञा दिली आहे’ अशी वार्ता नारदमुनी पुरूरव्याला देतात. शेवट आनंददायक होतो.

उर्वशी व पुरूरवा ह्यांची कथा फारच प्राचीन आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात (सूक्त ९५) पुरूरवा−उर्वशी ह्यांचा संवाद आलेला आहे. ह्या संवादाचा पूर्वसंदर्भ आणि त्यानंतरच्या घटना ह्यांचे वर्णन शतपथ ब्राह्मणात आहे. विष्णुपुराण, हरिवंश, मत्सपुराण, कथासरित्सागर ह्या ग्रंथांतूनही पुरूरवा-उर्वशी ह्यांची कथा येते.

पुरूरवा आणि उर्वशी ह्यांच्या प्राचीन कथेप्रमाणे उर्वशी पुरूरव्याच्या प्रेमात पडते पण तिने त्याला दोन अटी घातलेल्या असतात. एक, तिच्या परवानगीशिवाय त्याने तिच्याशी समागम करावयाचा नाही आणि दुसरी म्हणजे, नग्न स्थितीत त्याने तिच्या दृष्टीस पडावयाचे नाही. पण गंधर्व उर्वशीला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी युक्तीने नग्नावस्थेतील राजाचे दर्शन तिला घडवितात. उर्वशी त्याला सोडून जाते. ऋग्वेदातील संवाद पाहिला, तर उर्वशी पुरूरव्याकडे परत जात नाही. शतपथ ब्राह्मणातील कथेनुसार पुरूरवा उर्वशीच्या सांगण्या वरून स्वतःस गंधर्व करावे, असा वर गंधर्वाकडून मागून घेतो आणि गंधर्व होतो. त्याला तिचा सहवास मग कायमचा मिळतो. षडगुरूशिष्याच्या वेदार्थदीपिका ह्या टीकेत, उर्वशीला पाहिल्यानंतर मित्र आणि वरूण ह्यांचे रेतस्खलन होते आणि रेत एका कुंभात पडते, अशी हकीकत आहे. आपल्या ब्रह्मचर्यव्रताचा भंग उर्वशीने केल्यामुळे हे दोघे तिला शाप देऊन मनुष्यभोग्य होण्यासाठी पृथ्वीवर पाठवितात. त्यानंतर तिचा आणि पुरूरव्याचा संबंध येतो.

ह्या प्राचीन कथेचे नाटकात रूपांतर करताना कालिदासाने महत्त्वाचे बदल केले आहेत. केशी दानवाचा प्रसंग, नाटकातले वाक्य पुरूरव्याचे नाव घेऊन म्हटल्यामुळे भरतमुनींनी दिलेल्या शापाचा प्रसंग हे कालिदासाने स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेले आहेत. लग्न करण्यासाठी पुरूरव्याने घातलेल्या अटी नाटकात अंतर्भूत करणे, हे कालिदासाला असभ्य वाटले असावे. त्यामुळे इंद्राने शापाला घातलेली मर्यादा दाखवून उर्वशीचा स्वर्गलोकी परत येण्याचा मार्ग त्याने मोकळा केला. पुरूरव्याकडे पाठ फिरवून त्यांच्याकडे पुन्हा केव्हाही न जाणारी नायिका नाटकात दाखविणे अनुचित वाटल्याने इंद्राने उर्वशीला पुरूरव्यासह पृथ्वीवरच राहण्याची अनुज्ञा दिली, असे दाखवून नाटक आनंदपर्यवसायी केले आहे.

ह्या नाटकात पात्रांची संख्या फारच कमी आहे. पुरूरवा−उर्वशी हीच मुख्य पात्रे असून औशीनरी व चित्रलेखा ही पात्रे तशी गौण आहेत. विदूषक आहे परंतु त्याला फारसे महत्त्व नाही. मानवावर प्रेम करणारी स्वर्गीय अप्सरा नायिका म्हणजे एक दिव्य स्त्री, ह्या नाटकाखेरीज अन्य कोणत्याही प्रमुख संस्कृत नाटकात दिसत नाही. राजा पुरूरवा ह्याच्या ठायी अतिमानुष शक्ती−उदा., रथातून आकाशात संचार करणे सूर्यमंडळापर्यंत जाणे इ.−असल्याचे दाखविले आहे परंतु तो प्रेमाच्या बाबतीत सामान्य माणसासारखाच वागतो. ह्याउलट अप्सरा ही देवगणिका असली, तरी उर्वशीचे राजावरचे प्रेम अत्यंत उत्कट आहे. प्रेमात पडलेल्या सर्वसाधारण मानवी स्त्रीसारखेच तिचे वर्तन आहे. ती गणिका आहे असे वाटण्यासारखे तिचे चित्रण कालिदासाने केलेले नाही. ह्या नाटकात शृगांर हा प्रधान रस असून विप्रलंभ शृंगारावरच भर देण्यात आलेला आहे. हास्य व अद्भुत हे दोन रसही नाटकात आहेत पण ते थोड्या प्रमाणात आहेत.

ह्या नाटकाच्या एका पाठातील चौथ्या अंकात एका ठिकाणी प्राकृत गीते आलेली आहेत. काही अभ्यासक ती प्रक्षिप्त आहेत असे मानत असले, तरी त्या विशिष्ट प्रसंगी (उर्वशी लतारूप झाल्यानंतर पुरुरव्याने दुःखित अंतःकरणाने तिचा घेतलेला शोध) पुरूरवा बराच वेळ एकटाच रंगमंचावर असल्याने, नटाला व प्रेक्षकांना येणारा ताण टाळण्यासाठी संगीत−नृत्याची योजना व ही गीते कालिदासाने योजिली असणे शक्य आहे.

संदर्भ : 1. Velankar, H. D. Ed. The Vikramorvasiya of Kalidas New Delhi, 1961.

         २. कंगले, र. पं. कालिदासाची नाटके, मुंबई, १९५७.

          ३. भट, गो. के. संस्कृत नाट्यसृष्टी, पुणे, १९६४.

          ४. मिराशी, वा. वि. कालिदास, मुंबई, १९७५.

कुलकर्णी, अ. र.