लनरॉट, एल्यास : ( ९एप्रिल १८०२-१९ मार्च १८८४ ). फिनिश लोकविद्याभ्यासक आणि भाषाभ्यासक. सामाती येथे जन्मला. हेल्‌सिंकी विद्यापीठातून वैद्यकाची पदवी मिळविल्यानंतर (१८३२) पूर्व फिनलंडमधील काजानी ह्या दूरस्त ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्याने वीस वर्षे काम केले. लॅप, एस्टोनियन आणि वायव्य रशियाकडील फिनिश जमाती ह्यांच्यात तो वावरला,फिनो-उग्रिक भाषांच्या अभ्यासाच्या दृष्टिने त्याने महत्वाची सामग्री गोळा केली लोकगितेही जमवली. ही लोकगिते म्हणजे कालौगात नष्ट झालेल्या एका महाकाव्याचे भाग आहेत असे जाणवल्यामुळे, त्याने ते भाग जुलवून त्यांतून मूळ महाकाव्याची संहिता पुन्हा उभी करण्याचा प्रयत्‍न केला आणि ⇨कोलेवाला हे फिनिश लोकमहाकाव्य संपादून प्रसिद्ध केले( पहिली आवृ. १८३५-३६ दुसरी आवृ १८४९). फिनलंडमधील कला, संकृती, राष्ट्रभावना आणि राष्ट्रीय चळवळ ह्यांवर ह्या महाकाव्याचा अतोनात परिणाम झालेला आहे. स्वतःलनरॉट हा फनिश राष्ट्रीय चळवळीच्या आधाडीवर होता. लनरॉटच्या काळात, फिनलंडवर असलेल्या स्वीडनच्या सत्तेमुळे फक्त स्वीडिश भाषा हीच फिनलंडची अधिकृत भाषा समजली जात होती. तिला निदान दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळावे, ह्यासाठी लनरॉटने धडपड केली आणि आधुनिक फिनिश साहित्याच्या उद्याचा मार्ग खुला करून दिला. Kanteletarहा फिनलंडच्या लोकगीतांचा एक संग्रहही त्याने प्रसिद्ध केला (१८४०-४१). हेल्‌सिंकी विद्यापीठात १८५३-६२ ह्या कालखंडात त्याने फिनिश भाषा-साहित्याचा प्राध्यापक म्हणून काम केले. फिनिश स्वीडीश शब्दकोशही त्याने तयार केला होता ( १८७४- ८०). सामाती येथेच तो निधन पावला.

कळमकर, य. शं.