मिलोस्झ, झेस्लॉ : (३० जून १९११–    ) पोलिश–अमेरिकन कवी व निबंधकार, रशियन साम्राज्यांतर्गत लिथ्युएनियातील व्हील्ना येथे जन्मला. त्याचे वडील रशियात अभियंते म्हणून काम करीत असल्यामुळे मिलोस्झचा आरंभीचा काही काळ प्रत्यक्ष रशियात गेला. पहिल्या महायुद्धानंतर मिलोस्झ कुटुंब व्हील्ना येथे आले (त्यावेळी व्हील्नाचे नाव व्हील्नो असे झाले होते आणि ते पोलंडचा एक भाग बनले होते.) मिलस्झचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण व्हील्नो येथे झाले. ‘पोएम ऑफ द फ्रोझन टाइम्स’ (१९३२, इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याने समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला होता तसेच ‘कॅटस्ट्रॉफिक ग्रूप’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका कविमंडळाचे तो नेतृत्व करीत होता. ह्या कवींना, जागतिक पातळीवर काही संकटे येऊ घातली आहेत, असे वाटत होते आणि तो त्यांच्या कवितांचा विषय असे. मिलोस्झच्या कवितेतून ह्याचा प्रत्यय येतोच. अभिजाततावादी शैली हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. तत्त्वचिंतनाकडे असलेला त्यांचा ओढा आणि राजकीय समस्यांच्या विचाराने व्यापलेले त्याचे मन ‘द पोएटिक ट्रीटाइझ’ (१९५७, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहात प्रकर्षाने दिसून येते.

जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर, त्याच्या प्रतिकारार्थ पोलंडमध्ये सुरू झालेल्या चळवळीत मिलोस्झने भाग घेतला. पोलंडमध्ये साम्यवादी सरकार आल्यानंतरच्या काळात अगदी आरंभी जी पुस्तके प्रकाशित झाली, त्यांत मिलोत्झच्या ‘रेस्क्यू’ (१९४५, इं.शी.) ह्या काव्यसंग्रहाचा अंतर्भाव होतो. पोलंडच्या सरकारने त्याला पराराष्ट्रसेवेतही घेतले. तथापि १९५१ मध्य त्याने फ्रान्समध्ये राजकीय आश्रय मागितला. त्यानंतर नऊ वर्षांनी तो अमेरिकेस गेला. १९७० मध्ये त्याला अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले.

मिलोस्झ हा मुख्यतः कवी असला, तरी निबंध, कादंबऱ्या असे लेखनही त्याने केले आहे. द कॅप्‌टिव्ह माइंड (इं. भा. १९५३) हा त्याचा निबंधसंग्रह चर्चनीय ठरला. साम्यवादी समाज आणि राजकारण हा ह्या ग्रंथातील निबंधांचा विषय. द इस्सा व्हॅली (१९५५, इं. भा. १९८१) ही त्याची उल्लेखनीय कादंबरी, नेटिव्ह रिआम : ए सर्च फॉर सेल्फ डेफिनिशन (१९५९, इ. भा. १९६८) हे त्याचे आत्मचरित्र. पोलिश साहित्याचा इतिहासही त्याने लिहिला आहे.

मिलोस्झला १९८० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

कुलकर्णी, अ. र.