फ्रेड्रॉ, आलेक्सांडेर : (२० जून १९९३ – १५ जुलै १८७६). पोलिश नाटककार. सचोरो येथे एका खानदानी कुटुंबात जन्म. काही काळ सैन्यात नोकरी केल्यानंतर शेतीकडे वळला. पॅरिसमध्ये त्याचे वास्तव्य असताना फ्रेंच रंगभूमीकडे तो आकर्षित झाला. फ्रेंच नाटककारांचा-विशेषतः मोल्येरचा-आदर्श समोर ठेवून फ्रेड्रॉने सु. ४० सुखात्मिका लिहिल्या. लेडीज ॲन्ड हझर्स (१८२६, इं. भा. १९२५), मेडन्स व्हाउज (१८३४, इं. भा. १९४०) आणि व्हेंजन्स (१८३४, इं. शी.) ह्या त्यांपैकी काही उल्लेखनीय होत. फ्रेंच सुखात्मिकारांचा आदर्श फ्रेड्रॉच्या समोर असला, तरी आपल्या सुखात्मिकांना त्याने दिलेले रूप अस्सल पोलिश आहे. आधुनिक पोलिश सुखात्मिका त्याने आकारास आणली. लाव्हाव्ह येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.