प्रूस, बॉलेस्लाव्ह : (२० ऑगस्ट १८४७ – १९ मे १९१२). पोलिश कथा – कादंबरीकार आणि पत्रकार. पूर्व पोलंडमधील ऱ्हूब्येशव्ह येथे जन्मला. काही काळ एका कारखान्यात काम केल्यावर पत्रकाराच्या व्यवसायात पडला विविध नियतकालिकांसाठी त्याने लेखन केले. सूक्ष्म निरीक्षण आणि जिवंत वर्णनशैली हे ह्या लेखनातून प्रत्ययास येणारे गुण त्याच्या कथा-कादंबऱ्यांतही आढळतात. वॉर्सा येथे त्याचे वास्तव्य असल्यामुळे तेथील जीवनाची विविध अंगे त्याने जवळून पाहिलेली होती. शेतमजूर आणि श्रमजीवी वर्गाचे जगही त्याने आस्थेने निरखले होते. त्यातूनच त्याला त्याच्या कथात्मक साहित्याचे विषय गवसले. Kamizelka (१८८२, इं.शी. वेस्टकोट) हा त्याचा विशेष उल्लेखनीय कथासंग्रह. Palac i rudera (१८७४, इं. शी. पॅलेस अँड हट) Lalka (दोन खंड, १८८७, १८८९ इं.शी. द डॉल) आणि Faraon (१८९५, इं.भा. द फेरो अँड द प्रीस्ट, १९०२) ह्या त्याच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या. ‘पॅलेस अँड हट’मध्ये पोलिश शेतमजुरांचे चित्रण केलेले असून ‘द डॉल’ मध्ये तत्कालीन व्यापाऱ्यांचे जग रंगविले आहे. प्राचीन ईजिप्तची पार्श्वभूमी द फेरो अँड द प्रीस्टमध्ये घेतलेली आहे. प्रूसचा दृष्टिकोण व्यापक मानवतावादी होता आणि मानवाच्या प्रगतिपरतेवर आणि निर्मितिक्षमतेवर त्याचा विश्वास होता. वॉर्सा येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.