कोकानोव्हस्की, यान : (? १५३० – २२ ऑगस्ट १५८४). पोलिश कवी आणि नाटककार. जन्म सिसिन येथे. शिक्षण क्रेको व पॅड्युआ विद्यापीठांत. १५६७ पासून पोलंडचा राजा सिगिसमंड दुसरा ऑगस्टस (१५२० – ७२) ह्याचा सचिव म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्याने दरबारी जीवनाचा त्याग केला आणि झार्नोलास येथे राहून तो शेती करू लागला. त्याचे लेखन मात्र अखेरपर्यंत चालू होते.

ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचा त्याचा चांगला व्यासंग होता. त्याचे आरंभीचे काव्यलेखनही लॅटिनमध्ये आहे. त्याच्या उत्कृष्ट लॅटिन कविता Lyricorum libellus (१५८०) मध्ये अंतर्भूत आहेत. आपल्या मृत मुलीच्या स्मरणार्थ त्याने पोलिशमध्ये एकोणीस उत्कट विलापिका रचल्या. त्या Threny ( १५८०, इ. भा. लॅमेंट्स, १९२०) ह्या काव्यसंग्रहात आहेत. Piesni (१५८६, इ. भा. चांट्स, १९३२) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय काव्यसंग्रह. Odprawa poslow Greckich (१५७८, इ. भा. द डिसमिसल ऑफ द ग्रीक एन्व्हॉइज, १९१८) ही त्याची नाट्यकृती ग्रीक शोकात्मिकांचा आदर्श समोर ठेवून लिहिलेली आहे. पोएम्स बाय यान कोकानोव्हस्की (१९०८) ह्या नावाने त्याच्या अनेक कवितांचे इंग्रजी अनुवाद संगृहीत केले गेले आहेत. पोलिश भाषेचे भवितव्य घडविण्यात त्याचा वाटा मोठा आहे. ⇨मीट्सक्येव्हिच (१७९८–१८५५) आणि ⇨स्लॉव्हाट्स्की (१८०९–४९) ह्यांच्या उदयापूर्वी पोलिशमधील सर्वश्रेष्ठ कवी असा त्याचा लौकिक होता. लूब्लीन येथे तो निधन पावला.

मेहता, कुमुद