मीट्‌सक्येव्हिच, आडाम : (२४ डिसेंबर १७९८–२६ नोव्हेंबर १८५५). थोर पोलिश कवी. तत्कालीन रशियन साम्राज्यातील नॉव्हगोरॉडजवळील झाओसाय येथे जन्मला. व्हिल्‌निअस (व्हिल्नो) विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. देशभक्त तरुणांच्या एका गुप्त संघटनेत तो सामील झाल्याबद्दल १८२३ मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि १८२४ मध्ये त्याला रशियात हद्दपार केले गेले. ह्या हद्दपारीच्या काळात पुश्किनसारख्या श्रेष्ठ रशियन साहित्यिकांशी त्याची मैत्री झाली. १८२९ मध्ये तो रशियातून पश्चिम यूरोपात गेला. १८३२ मध्ये तो पॅरिसला स्थायिक झाला. १८३९ मध्ये स्वित्झर्लंडमधील लोझॅन विद्यापीठात, लॅटिन साहित्याच्या अध्यासनावर त्याची नेमणूक झाली परंतु पुढल्याच वर्षी ‘कॉलेज द फ्रांस’ मध्ये तो स्लाव्हॉनिक साहित्याचे अध्यापन करू लागला. येथे तो १८४४ पर्यंत होता. इटलीचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होताच इटलीच्या बाजूने, ऑस्ट्रियाच्या विरुद्ध लढण्यासाठी एक लष्करी तुकडी त्याने १८४८ मध्ये संघटित केली आणि पोलंडच्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी पोपची मदत मागितली. १८४९ मध्ये ‘पीपल्स ट्रिब्यून’ (इं. शी.) नावाचे एक नियतकालिकही त्याने काही महिने चालविले. क्रिमियन युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध लढण्यासाठी एक पोलिश पथक संघटित करण्याच्या हेतूने तो तुर्कस्तानात गेला असता कॉन्स्टँटिनोपल (आताचे इस्तंबूल) येथे त्याचे निधन झाले.

‘पोएट्री I’ (इं. शी.) हा मीट्‌सक्येव्हिचचा पहिला काव्यसंग्रह १८२२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याने रचलेले बॅलड आणि रोमान्स त्यात अंतर्भूत आहेत. हे काव्यप्रकार पोलिश साहित्यात रुजविण्याची आपली इच्छा त्याने ह्या काव्यसंग्रहाला जोडलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केली होती. ‘फोअरफादर्स ईव्ह’ (इं. शी.) ही आपली वैशिष्ट्यपूर्ण नाट्यकृती त्याने १८२७ मध्ये पूर्ण केली. लोकसाहित्यातील ज्ञापके (मोटिफ्‌स) तीत परिणामकारकपणे वापरलेली असून उत्कट राष्ट्रवादाच्या निगूढ छायेने तिच्यातील वातावरण भारलेले आहे. १८२६ मध्ये क्रिमियाला भेट दिल्यानंतर त्याने काही सुंदर सुनीते-‘क्रिमिअन सॉनेट्‌स’ (इं. शी.)-लिहिली. पान टाडेऊश (१८३४) हे महाकाव्य म्हणजे त्याची सर्वश्रेष्ठ कृती होय. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीचे पोलिश जीवन ह्या महाकाव्यात प्रतिबिंबित झालेले आहे. त्याच्या अन्य उल्लेखनीय कृतींत ‘कोनराड-वालेनरॉड’ ह्या कवितेचा (१८२८) आणि ‘बुक्स ऑफ द पोलिश नेशन अँड इट्स्‌ पिल्‌ग्रिमेज’ (१८३२, इं. शी.) ह्या गद्यलेखनाचा समावेश होतो. पोलंडच्या शत्रूंवर ‘कोनराड वालेनरॉड’ मधून त्याने हल्ला चढवला आहे, तर ‘बुक्स……….’ मध्ये पोलिश जनतेच्या इतिहासाचा एक नैतिक अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे.

पोलिश साहित्यातील स्वच्छंदतावादाचा मीट्‌सक्येव्हिच हा प्रमुख प्रतिनिधी होय. स्लाव्ह जगतात पोलिश कवितेला मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय त्याला दिले जाते. देशभक्तीबरोबरच धर्मश्रद्धाही त्याच्या ठायी होती आणि ख्रिस्ती धर्मतत्त्वांच्या पायावर पोलंडची उभारणी करण्याच्या पोलिश जनतेच्या सामर्थ्यावर त्याचा विश्वास होता.

संदर्भ :1. Helsztynski, S. Ed Adam Mickiewicz: Selected Poetry and Prose, 1955.

            2. Kallenbach. J. Adam Mickiewicz. 2. Vols., 1926.

            3. Kridl, M. Ed., Adam Mickiewicz, Poet of Poland, a Symposium, New York, 1950.

            4. Lednicki, W. Ed. Adam Mickiewicz in World Literature, 1956.

            5. Pruszynsky, K. Adam Mickiewicz, The Life Story of the Greatest Polish Poet, 1950.

कुलकर्णी, अ. र.