झेरॉम्‌स्की स्टेफान : (१ नोव्हेंबर १८६४–२० नोव्हेंबर १९२५). पोलिश कादंबरीकार. जन्म स्ट्राच्‌झीन येथे. वॉर्सा येथे पशुविकारविज्ञानाचे शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच रशियन सरकारने त्यास अटक केली. तुरुंगात असताना त्याला क्षयाचा विकार जडला. त्यानंतर पशुविकारविज्ञानाचा अभ्यास सोडून देऊन चरितार्थासाठी शिक्षक व ग्रंथपाल अशा नोकऱ्या केल्या. Ludzie bezdomni (१९००, इं. शी. द होमलेस) ह्या कादंबरीने त्याला प्रथम प्रसिद्धी मिळवून दिली. तथापि Popioly (१९०४, इं. भा. ॲशेस, १९२८) ह्या त्याच्या तीन खंडात्मक कादंबरीने यशस्वी कादंबरीकार म्हणून त्याची प्रतिमा निश्चित केली. Dzieje grzechu (१९०८, इं. शी. स्टोरी ऑफ अ सिन), Wierna rzeka (१९१२, इं. भा. द फेथफुल रिव्हर, १९४३) आणि Przedwiosnie (१९२५, इं. शी. फर्स्ट स्प्रिंग) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या.

उत्कट देशभक्ती आणि सामाजिक अन्यायाची तीव्र जाणीव त्याच्या कादंबऱ्यांतून प्रत्यायास येतात. व्यक्तिगत सुखाचे मोल देऊन उच्च आदर्शांसाठी झगडणाऱ्या व्यक्ती झेरॉम्‌स्कीने आपल्या कादंबऱ्यांतून रंगविल्या. नैराश्याचा सूर त्यांतून उमटत असला, तरी ‘शिवम्’च्या अंतिम विजयावरील श्रद्धाही जाणवते. झेरॉम्‌स्की हा केवळ लोकप्रिय कादंबरीकार राहिला नाही पोलिश जनतेला त्याच्या व्यक्तिमत्त्वात राष्ट्राच्या सदसद्‌विवेकबुद्धीचे प्रतीक आढळले.

शब्दांचा हव्यास, विस्कळित रचना ह्यांसारखे त्याच्या कादंबऱ्यांतील दोष समीक्षकांनी दाखवून दिले असले, तरी कादंबरीलेखनाची एक संपन्न, भावगेय (लिरिकल) शैली निर्माण केल्याचे श्रेय त्याला दिले जाते.

झेरॉम्‌स्कीने काही नाटकेही लिहिली. Uciekla mi przepioreczka (१९२४, इं. शी. माय लिट्ल क्वेल हॅज फ्लेड अवे) ही त्याची यशस्वी सुखात्मिका. वॉर्सा येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.