पोलिश साहित्य : मध्ययुग : पोलंडमधील आरंभीचे साहित्य पोलिश आणि लॅटिन अशा दोन भाषांत आहे. ९६६ मध्ये पोलंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रवेश झाला ख्रिस्ती धर्मगुरूंबरोबरच लॅटिन भाषा तेथे आली विद्याभ्यासाची आणि राज्यकारभाराची प्रतिष्ठित भाषा म्हणून तिला मान्यता मिळाली. ख्रिस्ती संन्याशांनी आणि धर्मगुरूंनी लॅटिनमध्ये संतचरित्रे, इतिवृत्ते (क्रॉनिकल्स) लिहिली. यान द्लूगोश (१४१५–८०) ह्या पोलिश इतिहासकाराने लिहिलेला पोलंडचा इतिहास लॅटिन भाषेतच आहे. पद्धतशीर इतिहासलेखनाचा पोलंडमध्ये झालेला हा पहिला प्रयत्न. लॅटिनच्या वर्चस्वामुळे पोलिश भाषेची काही प्रमाणात उपेक्षा झाली.

पोलिश भाषेतील आज उपलब्ध असलेले सर्वांत प्राचीन साहित्य तेराव्या-चौदाव्या शतकांतील असून ते धार्मिक स्वरूपाचे आहे. त्यात बोगुरोजीत्सा (इं. शी. मदर ऑफ गॉड) हे धार्मिक गीत वाङ्‌मयीन गुणवत्तेच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे. पवित्र कुमारी मेरी हिचा गौरव ह्या गीतात केलेला आहे. ह्या गीताची उपलब्ध असलेली सर्वांत जुनी प्रत १४०७–०८मधली असली, तरी ते बहुधा तेराव्या शतकाच्या अखेरीस रचिले गेले असावे. लौकिक स्वरूपाचे पोलिश साहित्य पंधराव्या शतकापासूनचे आहे. त्यात उपरोधप्रचुर आणि नैतिक उद्‌बोधनात्मक अशा काही साहित्याचा अंतर्भाव होतो.

सोळावे शतक : पोलिश साहित्यातील हे सुवर्णयुग मानले जाते. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोलंडमध्ये मानवतावादाचे वारे वाहू लागले. १३६४मध्ये स्थापन झालेल्या क्रेको विद्यापीठाने ह्या काळात नवविचारवर्धनाची मोलाची कामगिरी बजावली. निकोलेअस कोपर्निकस (१४७३–१५४३) हा विख्यात ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती आणि वैद्य काही काळ ह्या विद्यापीठाचा विद्यार्थी होता. धर्मसुधारणेच्या आंदोलनानेही पोलंड प्रभावित झाला. राजा आणि उमरावशाही ह्यांना शह देऊन पूर्ण राजकीय सत्ता आपल्या हाती आणण्याची पोलंडमधील सरदारवर्गाची (नोबिलिटी) सुरू झालेली चळवळसुद्धा हे सुवर्णयुग अवतरण्यास उपकारक ठरली कारण मानवतावाद आणि धर्मसुधारणा ह्या यूरोपातील दोन महत्त्वाच्या विचारप्रवाहांबद्दल ह्या सरदारवर्गालाही आस्था होती.

मानवतावादाने भारलेल्या आरंभीच्या काही पोलिश साहित्यिकांनी लॅटिनमध्येच लेखन केले. उदा., यानीत्स्‌की (१५१६–४३) हा कवी. विख्यात रोमन कवी ऑव्हिड आणि टिबलस ह्यांच्या प्रभावातून लॅटिन भाषेत त्याने काही विलापिका रचिल्या. पोलिश भाषेतील लेखनाला प्रतिष्ठा आणि मोठा वाचकवर्ग प्राप्त करून देणारा पहिला साहित्यिक कॅल्व्हिन पंथीय ⇨मिकॉलाय रे (१५०५–६९) हा होय. पोलिश साहित्याचा जनक म्हणून तो गौरविला जातो. त्याने काव्यरचनाही केलेली असली, तरी पोलिश साहित्यातील त्याचे महत्त्व त्याला मुख्यतः त्याच्या गद्यग्रंथांमुळे मिळालेले आहे. ह्या गद्यग्रंथांत काही धार्मिक प्रवचनांचा आणि ‘लाइफ ऑफ ॲन ऑनरेबल मॅन’ अशा इंग्रजी शीर्षकार्थाच्या एका ग्रंथाचा समावेश होतो. त्याच्या धार्मिक प्रवचनांतून त्याचा ईश्वरविद्येचा व्यासंग प्रत्ययास येतो. ‘लाइफ ऑफ ॲन ऑनरेबल मॅन’ मध्ये आदर्श पोलिश सरदाराचे चित्र त्याने रंगविले आहे. तत्कालीन पोलंडमधील सामाजिक स्थितीवर त्यातून प्रकाश पडतो. रे ह्याच्या संपन्न आणि प्रभावी गद्यशैलीने पोलिश गद्याला विकासाकडे नेणारे वळण दिले. ⇨यान कोकानोव्हस्की (१५३०–८४) हा श्रेष्ठ पोलिश कवी. आपल्या काव्यलेखनाने त्याने पोलिश कवितेबरोबरच पोलिश भाषेलाही सामर्थ्य प्राप्त करून दिले. त्याचे दोन महत्वाचे काव्यसंग्रह लॅमेट्‌स आणि चांट्स ह्या नावांनी इंग्रजीत अनुवादिले गेले आहेत. आपल्या मुलीच्या अकाली निधनानंतर त्याने लिहिलेल्या विलापिका लॅमेट्‌समध्ये अंतर्भूत असून चांट्समध्ये प्रेमकवितांबरोबरच सामाजिक, तात्त्विक आणि देशभक्तिपर अशा कविता आहेत. अभिजात ग्रीक नाट्यकृतींचा आदर्श समोर ठेवून त्याने द डिस्‌मिसल ऑफ द ग्रीक एन्‌व्हॉइज ( इं. भा.) हे नाटक लिहिले (१५७८). शिमॉन शिमॉनॉव्हिज (१५५८–१६२९) आणि सेबास्ट्यान कॉल्नोव्हित्स (१५४५–१६०२) हे दोन कवीही उल्लेखनीय आहेत. शिमॉनॉव्हिचने पोलिश कवितेत गोपगीत (पास्टोरल) आणले. कॉल्नोव्हित्सच्या कवितेत तत्कालीन पोलिश जीवनाचे वेधक प्रतिबिंब पडले आहे. मिकॉलाय सेपॅं-शाजींस्की (१५५०–८१) ह्या थोर भावकवीच्या कवितेतून त्याची तत्वचिंतनात्मक आणि नैराश्याने भारलेली वृत्ती प्रत्ययास येते. ह्या कवीने पोलिश कवितेत सुनीत आणले. प्यॉटर स्कार्गा (१५३६–१६१२) ह्या जेझुइटाने लिहिलेल्या ‘लाइव्ह्‌ज ऑफ सेंट्स’ (१५७९) आणि ‘पार्लमेंटरी सर्मन्स’ (१५९७) अशा इंग्रजी शीर्षकार्थांच्या ग्रंथांचा उल्लेख आवश्यक आहे. स्कार्गाच्या वक्तृत्वपूर्ण आणि डौलदार लेखनशैलीचा, तसेच त्याच्या उत्कट देशभक्तीचा प्रत्यय त्यांतून येतो. स्टानीस्लाव्ह ओरेहोव्हस्की (१५१३–६६) ह्याने पोलिश गद्याची कलात्मक अभिव्यक्तिक्षमता वाढविली. इटालियन साहित्यिक कास्तील्योने बाल्दास्सारे ह्याच्या ‘द कोर्टिअर’ (इं. शी.) ह्या ग्रंथाच्या धर्तीवर, पोलंडमधील सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांचे भान ठेवून लिहिलेला ‘द पोलिश कोर्टिअर’ (इं. शी.) हा लुकाश गुर्नित्‌स्की (१५२७–१६०३) ह्याचा ग्रंथही सुंदर गद्यशैलीचा एक नमुना आहे.


सतरावे व अठरावे शतक : अलंकरणावर विशेष भर देण्याची बरोक प्रवृत्ती सतराव्या शतकातील पोलिश साहित्यात प्रभावी ठरली. बरोक साहित्यशैलीच्या ह्या प्रभावाची पूर्वचिन्हे सोळाव्या शतकातील मिकॉलाय सेपॅं-शाजींस्की ह्या कवीच्या कवितेत दिसून येतात. अलंकरणाबरोबरच लॅटिन शब्दांचा अतिरेकी वापर हे पोलिश साहित्यातील बरोक प्रवृत्तीचे एक ठळक वैशिष्ट्य ठरले. उपरोधिका, गोप-काव्ये आणि महाकाव्य हे ह्या कालखंडात हाताळले गेलेले महत्त्वाचे साहित्यप्रकार. क्रझिस्झटॉव्ह ओपालिन्स्की (१६१०–५६) हा उपरोधिकाकार विशेष उल्लेखनीय. विख्यात रोमन कवी जूव्हेनल ह्याचा आदर्श त्याच्या समोर होता. तत्कालीन समाजातील अपप्रवृत्ती आणि अन्याय ह्यांवर त्याने आघात केला. कडवटपणाबरोबरच दारुण निराशेचा एक स्रोत त्याच्या उपरोधिकांतून वाहताना दिसतो. सामूएल ट्‌वार्डोव्हस्की (१६००–६०) ह्याने एक इटालियन गोपाकाव्याच्या धर्तीवर ‘डॅफ्नी ट्रॅन्स्फॉर्म्‌ड इंटू अ बे ट्री’ (इं. शी.) हे गोपकाव्य लिहिले (१६३८). नादोब्ना पास्क्विलाना (१६५५, इं. शी. एंचांटिंग पास्क्विलाना) हा त्याने लिहिलेला रोमान्स बरोक शैलीचा वैशिष्ट्यपूर्ण नमुना म्हणून उल्लेखनीय. ⇨व्हाट्स्लाव्ह पॉटॉट्स्की (१६२५–सु. १६९७) ह्याने लिहिलेल्या ‘चोसीम्स वॉर’ (इं. शी.) ह्या महाकाव्याचाही ह्या संदर्भात निर्देश करता येईल. पॉटॉट्‌स्की ह्याने लिहिलेली काही लघुकाव्ये ‘गार्डन ऑफ राइम्स’ (इं. शी.) ह्या नावाने संगृहीत आहेत (प्रकाशित १९०७). तत्कालीन सामाजिक जीवनाचे जिवंत चित्र त्यांतून प्रत्ययास येते. यान आंजेई मोर्‌श्तिन (१६१३–९३) हा सतराव्या शतकाच्या उत्तरार्घातील महत्वाचा कवी. ‘कनिक्यूलम ऑर द डॉगस्टार’ (इं. शी.) आणि ‘द ल्यूट’ (इं. शी.) हे त्याचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तत्कालीन फ्रेंच आणि इटालियन कवितेचा त्याचा अभ्यास होता. इटालियन कवी मारीनों ह्याचा आदर्श त्याच्या समोर होता. संकुल घाट, तांत्रिक सफाई आणि कल्पनाप्राचुर्य ही त्याच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्य होत. शिमॉन झिमोरोव्हिच (१६०९–२९) ह्याने आपल्या कवितेतून प्रेमाच्या विविध अवस्थांचे विलोभनीय चित्रण केले आहे. रचनेच्या वेगवेगळ्या लयबंधांतून ही कविता व्यक्त होत राहते. ह्या प्रेमकवितांचा संग्रह ‘रूथेनिअन मेडन्स’ (इं. शी.) ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे (१६५४). बार्टलोमिएज यूझेफ (१५९७–१६७७) ह्या झिमोरोव्हिचच्या भावाने सुंदर गोपगीते लिहिली. ‘रूथेनिअन मेडन्स’चा कर्ताही तोच, असे एक मत आहे. प्यॉटर कोकानोव्हस्की (१५६६–१६२०) ह्याने तोरक्कातो तास्सो व लोदोव्हीको आरिऑस्तो ह्या इटालियन कवींच्या महाकाव्यांचा पोलिश अनुवाद केला.

ह्या कालखंडातील गद्यकृतींत यान पासेक (सु. १६३०–१७०१) ह्याच्या दैनंदिनीचा विशेष उल्लेख करावा लागेल. साध्या परंतु वेधक शैलीत लिहिलेल्या ह्या दैनंदिनीतून तत्कालीन पोलिश जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडते. अठराव्या शतकाचा पूर्वार्ध हा ‘सॅक्सन कालखंड’म्हणून ओळखला जातो कारण ह्या कालखंडात सॅक्सन राजवंशातील राजांनी पोलंडवर राज्य केले. पोलिश साहित्याचा सामान्यतः हा अवनतकालच असला, तरी काही आशादायक अशा घटनाही त्यात घडलेल्या दिसतात. द्रुझबाका (१६५१–१७६५) ही पहिली पोलिश कवयित्री ह्याच काळात उदयास आली फादर स्टानीस्लाव्ह कोनार्स्की (१७००–७३) ह्याचे विशुद्ध पोलिश भाषेची जडण-घडण करण्याचे मोलाचे कार्य ह्याच काळातले. पोलिश भाषेत त्याने स्वतः केलेले, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवरील लेखन म्हणजे प्रासादिक गद्यशैलीचा एक नमुना आहे. ह्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र पोलिश प्रबोधनाची प्रसादचिन्हे दिसू लागली. पश्चिम यूरोपातील वैचारिक वारे पोलंडात पोहोचले. विवेकवादाचा प्रभाव पोलंडवर पडला लोकशाही राज्यपद्धतीबद्दल पोलंडमधील बुद्धिमंतांना आकर्षण वाटू लागले. साहित्याच्या क्षेत्रात, फ्रेंचांनी जोपासलेल्या नव-अभिजाततावादी साहित्यविचाराचा पोलिश साहित्यिकांवर परिणाम झाला. ⇨ ईग्नाट्सी क्रासीट्स्की (१७३५–१८०१) हा पोलिश साहित्यातील नव-अभिजाततावादी युगाचा सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी. उत्कृष्ट बोधकथा आणि उपरोधिका त्याने लिहिल्या. ‘द अड्व्हेंचर्स ऑफ मिकॉलाय डॉस्वि-ऑड्सझिन्स्की’ (इं. शी.) ही पोलिश भाषेतील पहिली कादंबरी त्याचीच. स्टानीस्लाव्ह त्रेंबेत्स्की (१७३५–१८१२) आणि यूल्यान ऊर्सिन न्येमत्सेव्हिच (१७५७ ?– १८४१) हे अन्य दोन उल्लेखनीय साहित्यिक. त्रेंबेस्त्कीने काही बोधकथा आणि वर्णनात्मक काव्ये लिहिली. फ्रेंच अभिजात कवींचा आदर्श त्याच्या पुढे होता. त्याने लिहिलेल्या बोधकथांवर विख्यात फ्रेंच बोधकथाकार ⇨ ला फाँतेन (१६२१–९५) ह्याचा प्रभाव दिसतो. न्येमत्सेव्हिचच्या लेखनामागे उत्कट देशभक्तीची प्रेरणा होती. इंग्रजी साहित्याची उत्तम जाण असलेला हा पहिला पोलिश साहित्यिक. स्वच्छंदतावादी इंग्रज कवींच्या काही सुंदर कवितांचे त्याचे पोलिश अनुवाद केले. ह्या अनुवादांमुळे पोलिश साहित्यातील स्वच्छंदतावादाला प्रेरणा मिळाली. पोलिश भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी त्याने लिहिली. ज्यूंच्या प्रश्नासंबंधीची पहिली पोलिश कादंबरीही त्याचीच. फ्रानट्सीशेक कार्पीन्यस्कीने (१७४१–१८२५) प्रेमकविता लिहिल्या. नाट्यलेखनाच्या क्षेत्रातील एक आशादायक घटना म्हणजे १७६५ मध्ये वॉर्सा येथे पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीची झालेली स्थापना. ⇨ फ्रानट्सीशेक झाब्लॉट्स्की (१७५० ? –१८२१), फ्रानट्सीशेक बोहोमोलेक (१७२०–८४) आणि व्हॉइचेख बॉगूस्लाव्हस्की (१७५७–१८२९) हे तीन उल्लेखनीय नाटककार. फ्रेंच नाट्यकृतींचा त्यांच्यावर प्रभाव होता. झाब्लॉट्स्कीने पन्नासांहून अधिक पद्य-सुखात्मिका लिहिल्या आणि पोलिश रंगभूमीवर त्या फार लोकप्रिय झाल्या. बोहोमोलेक ह्याने एका जेझुइट महाविद्यालयातील प्राध्यापक ह्या नात्याने स्त्रीपात्रविरहित अशा २५ उद्‌बोधनात्मक सुखात्मिका लिहिल्या पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीसाठीही त्याने लेखन केले. विख्यात फ्रेंच सुखात्मिकाकार मोल्येर ह्याचा आदर्श त्याच्या समोर होता. पोलंडमधील उच्च वर्गीयांच्या सुस्त जीवनक्रमावर आणि त्यांच्या विवेकशून्यतेवर बोहोमोलेकने आपल्या सुखत्मिकातून उपरोधपूर्ण टीका केली. बॉगूस्लाव्हस्की हा जसा नाटककार, तसाच एक अभिनेताही होता. १७८३ मध्ये पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीचा तो दिग्दर्शक झाला. १८११ मध्ये नाट्याशिक्षण देण्यासाठी वॉर्सा येथे त्याने एक शाळा सुरू केली, ‘क्रॅकोव्हिअन्स अँड माउंटेनीअर्स’ (इं. शी.) ही एका पोलिश लोककथेवर आधारलेली त्याची सुखात्म संगीतिका (१७९४) प्रसिद्ध आहे. नाट्यलेखनाबरोबरच पोलिश रंगभूमीच्या विकासाला उपकारक अशा विविध उपक्रमांत त्याने मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्याला पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीचा जनक मानले जाते.

विवेकवादाच्या प्रभावामुळे उद्‌बोधनाची प्रवृत्ती प्रकट होऊ लागली. ती गद्यातून विशेषत्वाने दिसून येते. तत्कालीन पत्रकारितेवरही ह्या प्रवृत्तीचा प्रभाव दिसतो. जोसेफ ॲडिसन आणि रिचर्ड स्टील ह्या इंग्रज पत्रकारांच्या अनुक्रमें द स्पेक्टेटर आणि द टॅटलर त्या नियतकालिकांच्या धर्तीवर मॉनिटर सारखी नियतकालिके निघाली. स्टानीस्लाव्ह स्टास्‌झिक (१७५५–१८२६) ह्याने ‘वॉर्निंग ट पोलंड’ (इं. शी.) ह्या नावाने देशातील सामाजिक-आर्थिक दुःस्थितीचे चित्र रंगविले. सामूएल बॉगूमील लींडे (१७७१–१८४७) ह्याने पोलिश भाषेचा पहिला शब्दकोश तयार केला. आडाम स्टानीस्लाव्ह नारूशेव्हिच (१७३३–९६) ह्याने पोलंडचा चौदाव्या शतकापर्यंतचा इतिहास लिहिला.


 

एकोणिसावे शतक : १७९५ मध्ये पोलंडची तिसऱ्यांदा फाळणी झाली परंतु ह्या दुःखद घटनेमुळे राष्ट्र खचले नाही. त्याची चैतन्यशीलता उत्कट देशभक्तीच्या रूपाने साहित्यातून व्यक्त होऊ लागली. ह्या शतकातील पोलिश साहित्यात स्वच्छंदतावादाचा प्रभाव प्रकर्षाने प्रकटला. इंग्लंड आणि जर्मनी ह्या देशांच्या तुलनेने पोलंडात स्वच्छंदतावादी संप्रदायाचा उदय होण्यास काहीसा उशीर झाला परंतु त्याचा प्रभाव मात्र अधिक काळ राहिला. पोलिश साहित्यातील हा विशेष समृद्धीचा काळ होय. ⇨ आडाम मीट्सक्येव्हिच (१७९८–१८५५) ह्याने पोलिश स्वच्छंदतावाद्यांचे नेतृत्व केले आणि स्लाव्ह जगतात पोलिश कवितेला सर्वाधिक मानाचे स्थान प्राप्त करून दिले. बॅलड, रोमान्स, सुनीते, भावकविता अशी वैविध्यपूर्ण काव्यरचना त्याने केली. तीत धर्मपर कविता बऱ्याच आहेत. पान टाडेऊश (१८३०) हे महाकाव्य म्हणजे त्याची सर्वश्रेष्ठ काव्यकृती होय. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीचे पोलिश जीवन तीत प्रतिबिंबित झालेले आहे. ‘फोअरफादर्स ईव्ह’ (१८२७, इं. शी.) ही त्याची नाट्यकृतीही विख्यात आहे. एका उत्कट प्रेमकथेवर ती आधारित असून तीत लोकसाहित्यातील ज्ञापके (मोटिफ्‌स) प्रत्ययकारीपणे वापरलेली आहेत. वेचक शब्दकळा आणि कलात्मक साधेपणा ही त्याच्या काव्यरचनेची काही लक्षणीय वैशिष्ट्य होत. ⇨ यूल्यूश स्लॉव्हाट्स्की (१८०९–४९) हा कवी आणि नाटककारही स्वच्छंदतावादाचा एक ठळक प्रतिनिधी. इंग्रज स्वच्छंदतावादी कवी बायरन ह्याचा प्रभाव स्लॉव्हाट्स्कीवर होता. Beniowski (१८४१) सारख्या कथाकाव्यातून तो प्रकर्षाने प्रत्ययास येतो परंतु पुढे तो एक प्रकारच्या गूढवादाकडे वळला. देशभक्तीची प्रेरणा स्लॉव्हाट्स्कीच्या अनेक साहित्यकृतींतून दिसून येते. त्याच्या नाट्यकृतींनी आधुनिक पोलिश नाट्यसाहित्याचा पाया घातला. शेक्सपिअर, फ्रेंचमधील स्वच्छंदतावादी नाटके, अभिजात ग्रीक नाट्यकृती, स्पॅनिश नाटककार काल्देरॉन अशा विविध प्रभावप्रेरणांनी स्लॉव्हाट्स्कीच्या नाट्यकृतींची जडणघडण झाली. स्लॉव्हाट्स्की हा स्वच्छंदतावादी असला, तरी वास्तववादी व प्रतीकवादी प्रवृत्तीही त्याच्यात आढळतात. ⇨ झिग्मूंट क्रासीन्यस्की (१८१२–५९) ह्याच्या द अन्‌डिव्हाइन कॉमेडी (१९२४, इं. भा.) ह्या नाटकात सामाजिक क्रांतीचे एक प्रभावी चित्र उभे केलेले दिसते. हे नाटक सामाजिक असले, तरी ते स्वच्छंदतावादी वळणाने लिहिलेले आहे. रोमविरुद्ध लढणाऱ्या एका ग्रीकाचे जीवन इरिडिअन (१८३६) मधून त्याने रंगविले आहे. त्या शोकात्मिकेतून पोलंडच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूपकात्मक दर्शनही त्याने घडविलेले आहे. कवी म्हणूनही क्रासीन्यस्कीचे स्थान महत्वाचे आहे. ‘द डॉन’ (१८४३, इं. शी.) आणि ‘साम्स ऑफ द फ्यूचर’ (१८४५, इं. शी.) ही त्याची दीर्घकाव्ये मुख्यतः तत्त्वचिंतनात्मक आहेत. सिप्रिअन नॉर्व्हिड (१८२१–८३) हा एक मौलिक प्रतिभेचा आणि कोणत्याही प्रभावापासून मुक्त असा कवी म्हणून विशेष उल्लेखनीय ठरतो. मानवता, इतिहास, संस्कृती आणि कला ह्यांच्याशी संबंधित असलेल्या समस्या हे त्याच्या कवितेतले प्रमुख विषय होत. भावकविता, महाकाव्य ह्यांतून त्यांचा आविष्कार त्याने केलाच. तथापि नाटके, कथा अशा साहित्यप्रकारांतूनही त्याने ह्या समस्यांची मांडणी केली. स्वच्छंदतावादाच्या प्रभावकालात त्याचे वाङ्‌मयीन कर्तृत्व झालेले असले, तरी तो स्वच्छंदतावादी नव्हता. अनुभवांना एका वैश्विक आणि वस्तुनिष्ठ पातळीवर नेण्याची कलात्मक क्षमता त्याच्या ठायी लक्षणीय स्वरूपात आढळते. नॉर्व्हिडची भाषा कमालीची पृथगात्म आणि काही ठिकाणी दुर्बोधही वाटते परंतु नव्या अनुभूतींची प्रचीती देण्याचे सामर्थ्य त्या भाषेच्या ठायी आहे. आनतॉनी मालचेव्हस्की (१७९२ ?– १८२६) हा, यूक्रेनियन पार्श्वभूमीवर लिहिलेल्या मारिआ (१८२५, इं. भा. १९३५) ह्या कथाकाव्यामुळे प्रसिद्धी पावला आहे.

 इतिहासलेखनाच्या क्षेत्रात ईग्नाट्सी लेलेव्हेल (१७८६–१८६१) ह्याचे नाव विशेष उल्लेखनीय. ‘द हिस्टरी ऑफ पोलंड’ (१८२९, इं. शी.) आणि ‘द रिबर्थ ऑफ पोलंड’ (१८४३, इं. शी.) हे त्याचे पोलंडच्या इतिहासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यूझेफ कॉझेन्यॉव्हस्की (१७९७–१८६३), ⇨ यूझेफ ईग्नाट्सी क्राशेव्हस्की (१८१२–८७) हे कादंबरीकार. कॉझेन्यॉव्हस्कीच्या कादंबऱ्यांत तत्कालीन समस्या मांडलेल्या आढळतात. नैतिक उद्‌बोधनावर त्याचा भर होता. ऐतिहासिक कादंबऱ्याही त्याने लिहिल्या. ‘काप्रीआ अँड रोमा’, ‘काउंटेस कोझेल’आणि ‘द ओल्ड टेल’ह्या (सर्व इं. शी.) त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यांचे जर्मन, फ्रेंच, इंग्रजी अशा भाषांत अनुवाद झालेले आहेत. हेन्‍रीक झेव्हूस्की (१७९१–१८६६) ह्याने लिहिलेल्या कथांतून पोलंडमधील उमरावादी प्रतिष्ठितांच्या जीवनाचे वेधक चित्रण आढळते. ‘मेग्वार्स ऑफ सेव्हेरिन सोप्लिका’ (१८३९, इं. शी.) ह्या नावाने त्याने लिहिलेली कथामाला प्रसिद्ध आहे. अठराव्या शतकातील पोलंडमधील प्रागतिक आणि प्रतिगामी प्रवृत्तींचे दर्शन त्याने नोव्हेंबर (१८४५, इं. भा.) ह्या आपल्या कादंबरीतून घडविलेले आहे. ⇨आलेक्‌सांडेर फ्रेड्रॉ (१७९३–१८७६) हा एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ पोलिश नाटककार,  आधुनिक पोलिश सुखात्मिका त्याने आकारास आणली. मोल्येरसारख्या फ्रेंच सुखात्मिकाकारांचा आदर्श त्याच्या समोर असला, तरी आपल्या सुखात्मिकांना अस्सल पोलिश रूप त्याने दिलेले आहे. 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोलंडमध्ये स्वच्छंदतावादाच्या विरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. १८६३ मध्ये पोलंडमध्ये रशियाविरुद्ध उठाव झाला आणि तो अयशस्वी ठरला. ह्या अपयशानंतर त्या देशात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जाणीव निर्माण झाली. एक प्रकारची व्यवहारवादी प्रवृत्ती प्रत्ययास येऊ लागली. साहित्याच्या क्षेत्रात स्वच्छंदतावादाला झालेला विरोध आणि वास्तववादाचा झालेला पुरस्कार म्हणजे ह्या प्रवृत्तीचाच एक आविष्कार होता. वाङ्‌मयीन सिद्धांताचे साहित्यनिर्मितीवरील वर्चस्व ह्या काळात वाढले. देशाचे वैचारिक-सांस्कृतिक संचित जपण्याबद्दलची आस्था वाढली. राजकीय क्षेत्रातले परिवर्तन म्हणजे पोलंडने सशस्त्र प्रतिकाराच्या धोरणाचा त्याग केला. पोलंडमध्ये निर्माण झालेली ही नवी जाणीव ‘पॉझिटिव्हिझम’ (इं. अर्थ) ह्या नावाने ओळखली जाते. पॉझिटिव्हिझमच्या वातावरणात गद्यनिर्मितीला अधिक चालना मिळणे अपरिहार्य होते. ललित लेखनात कादंबरीला प्राधान्य मिळाले. ⇨बॉलेस्लाव्ह प्रूस (१८४७–१९१२) हा पॉझिटिव्हिझमच्या काळातील महत्त्वाचा कादंबरीकार. ‘द डॉल’ (इं. शी दोन खंड, १८८७१८८९) ही त्याची विशेष उल्लेखनीय कादंबरी. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील पोलिश समाजाचे प्रभावी चित्रण ह्या कादंबरीत करण्यात आले आहे. शेतमजुरांचे आणि अन्य श्रमजीवी लोकांचे जग प्रूसने आस्थेवाईकपणे निरखले होते. आपल्या कथात्मक साहित्याचे विषय त्याला ह्या जगातून गवसले. व्यापक मानवतावादी दृष्टिकोण हे प्रूसच्या साहित्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. माणसाची प्रगतिपरता आणि निर्माणक्षमता ह्यांवरील श्रद्धा त्याच्या साहित्यकृतींतून प्रत्ययास येते. ⇨एलिस ओरेष्कोव (१८४१–१९१०) ह्या कादंबरीकर्त्रीनेही मानवतावाद आणि प्रगतिपरता ह्यांचा पुरस्कार आपल्या कादंबऱ्यांतून केला. स्त्रीस्वातंत्र्य, ज्यूंवरील अन्याय ह्यांसारखे प्रश्न तिने प्रभावीपणे मांडले. ⇨हेन्‍रीक शेनक्येव्हिच (१८४६–१९१६) हा कादंबरीकार तर १९०५ मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला. पोलंडच्या वैभवशाली भूतकाळाचे दर्शन त्याने आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतून घडविले. विथ फायर अँड सोर्ड (१८८४, इं. भा. १८९५), द डेल्यूज (१८८६, इं. भा. १८९५) आणि पॅन मायकेल (१८८७–८८, इं. भा. १८९५) ह्या सतराव्या शतकातील पोलंडचे चित्र उभे करणाऱ्या कादंबरीत्रयीमुळे श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्याची प्रतिमा पोलंडमध्ये प्रस्थापित झालेली होती. नीरोच्या सत्तेखालील रोम त्याने को वादीस? (१८९६) ह्या आपल्या जगप्रसिद्ध कादंबरीतून उभे करण्याचा प्रयत्न केला. अनेक भाषांत ह्या कादंबरीचे अनुवाद झाले आहेत. गाब्रिएला झापॅल्‌स्का (१८६०–१९२१) हिने निसर्गवादी तंत्राने लिहिलेल्या आपल्या कादंबऱ्यांतून सामाजिक दंभावर प्रहार केले.


कवितेच्या क्षेत्रात मात्र आडाम आस्निक (१८३८–९७) व मार्या कॉनॉपनीट्स्का (१८४२ ? –१९१०) ही दोन नावेच उल्लेखनीय आहेत. आस्निकच्या भावकवितांतून त्याच्या विविध भाववृत्तींचा तसेच तत्त्वचिंतनाचा आविष्कार झालेला आहे. गरीब श्रमिकांबद्दलचा कळवळा कॉनॉपनीट्स्काच्या कवितेत आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या अगदी अखेरीअखेरीस मात्र कवितेला-कादंबरी, नाटक ह्यांसारख्या साहित्यप्रकारांनाही-बहर आला. ह्या घटनेमागे प्रेरणा होती ‘तरुण पोलंड’ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळीची. पॉझिटिव्हिझमला विरोध, हे ह्या चळवळीमागचे मुख्य सूत्र होते. व्यवहारी आणि उपयुक्ततावादी दृष्टिकोणाच्या मर्यादा अनेकांना जाणवू लागल्या होत्या आणि अशी जाणीव निर्माण झालेले अनेक गट ह्या चळवळीत अंतर्भूत झालेले होते. ह्या चळवळीची वाङ्‌मयीन अभिव्यक्ती नव-स्वच्छंदतावाद ह्या नावानेही ओळखली जाते. नैराश्याचा आणि दुःखमग्नतेचा सूर, उत्कट भावुकता, अभिव्यक्तीला नवे रूप देण्याचा प्रयत्न आणि नवनवे शब्द निर्माण करण्याची ओढ ही ह्या नव-स्वच्छंदतावादी साहित्याची वैशिष्ट्ये. ह्या चळवळीशी संबंधित असलेला वाङ्‌मयीन गट हा ऱ्हासाला लागलेल्या काही कवींचा होता भावनांचे प्रदर्शन, शब्दांचा हव्यास आणि कलात्मक संयमाचा अभाव ह्या प्रवृत्ती ह्या वाङ्‌मयीन चळवळीने पोसल्या, अशी टीकाही ह्या चळवळीवर झालेली आहे. फ्रेंच प्रतीकवाद्यांचा आणि निसर्गवाद्यांचा प्रभाव ‘तरुण पोलंड’वादी वा नव-स्वच्छंदतावादी साहित्यिकांवर होता. स्टानीस्लाव्ह प्शिबिशेव्हस्की (१८६८–१९२७) हा ‘तरुण पोलंड’ह्या चळवळीचा एक प्रमुख पुरस्कर्ता. आपल्या कादंबऱ्यांतून व नाटकांतून त्याने मनोविश्लेषणाला वाव असलेले विषय मांडले. तथापि त्याच्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद त्याच्या हयातीतच हळूहळू ओसरत गेला.

 काझीम्येश टेटमायेर (१८६५–१९४०), यान कासप्रॉव्हिच (१८६०–१९२६). ⇨ लेऑपॉल्ट स्टाफ (१८७८–१९५७) आणि ⇨ स्टानीस्लाव्ह व्हिसप्यान्यस्की (१८६९–१९०७) ही नावे भावकवितेच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. टेटमायेरच्या कवितेतून विषण्णतेने व्यापलेली एक भाववृत्ती प्रत्ययाला येते त्याचप्रमाणे उत्कट निसर्गप्रेमही दिसते. कासप्रॉव्हिचने आरंभी आपल्या कवितेतून सामाजिक अन्यायाविरुद्ध आणि ईश्वराविरुद्ध आवाज उठवला. त्याच्या ह्या भावकविता म्हणजे यातनासूक्तेच आहेत. त्याच्या अखेरीअखेरीच्या कवितांत मात्र ईश्वराप्रत जाऊ पाहणारे एक उत्कट मन दिसून येते स्थिरचित वृत्तीने ह्या जगाचा स्वीकार त्याने केलेला आहे. व्हिसप्यान्यस्कीचे व्यक्तिमत्व प्रबोधनकालातील चतुरस्त्र कलावंतांची आठवण करून देणारे. तो कवी, नाटककार, चित्रकार आणि आरेखक. त्याच्या भावकवितांची गणना पोलिश भाषेतील उत्कृष्ट भावकवितांत केली जाते. नाटकाच्या क्षेत्रात तर त्याने केलेली कामगिरी फारच मौलिक स्वरूपाची आहे. प्राचीन ग्रीक तसेच शेक्सपिअरकृत शोकात्मिकांची काही वैशिष्ट्ये सर्जनशीलपणे एकत्र आणून नाट्यकलेचा एक नवाच आविष्कार त्याने घडवून आणला. ह्या नाटकांचा गाभा मात्र अस्सल पोलिशच होता, हे विशेष. ग्रीक कथांना आधुनिक अर्थ देऊन त्यांतून पोलंडचा भूतकाळ आणि तत्कालीन काळ त्याने प्रभावीपणे साकार केला. ‘द वेडिंग’ (१९०१, इं. शी.), ‘नोव्हेंबर नाइट’ (१९०४, इं. शी.) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके होत. लेऑपॉल्ट स्टाफ ह्याने विविधरूपसमृद्ध अशी विपुल भावकविता लिहिली आहे. तंत्राच्या दृष्टीनेही त्याची कविता अत्यंत सफाईदार आहे. कथात्मक साहित्याच्या क्षेत्रात ⇨स्टेफान झेरॉम्‌स्की (१८६४–१९२५) ह्या कादंबरीकाराने लक्षणीय कर्तृत्व गाजविले, शेस (१९०४, इं. भा. १९२८), ‘स्टोरी ऑफ असिन’ (१९०८, इं. शी.) द फेथफुल रिव्हर (१९१२ , इं. भा. १९४३) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. उत्कट देशभक्ती आणि सामाजिक अन्यायाची तीव्र जाणीव झेरॉम्‌स्कीच्या कादंबऱ्यांतून आणि कथांतून दिसून येते. तत्त्वांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या व्यक्ती त्यांत आढळतात. ⇨व्ह्‌लाडिस्लाव्ह रेमाँट (१८६७–१९२५) ह्याच्या लेखनात निसर्गवादी आणि संस्कारवादी तंत्रांचा अवलंब केलेला दिसून येतो. द पीझंट्स (४ खंड, १९०४–०९, इं. भा. १९२४–२५) ह्या त्याच्या महाकादंबरीत पोलंडमधील शेतमजुरांच्या जीवनाचे भव्य चित्रण त्याने केलेले आहे. १९२४ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. ⇨ व्हाट्‌स्लाव्ह बेरेंट (१८७३–१९४०) ह्याने आपल्या ‘द प्रोफेशनल मॅन’ (१८९५, इं. शी.) ह्या कादंबरीतून पॉझिटिव्हिस्ट विचारसरणीचे विडंबन केले.

विसावे शतक : १९१८ साली पोलंडला मिळालेल्या स्वातंत्र्याचा साहित्यावरही अपरिहार्यपणे परिणाम घडून आला. आधुनिक जीवनाला अनुरूप अशा नव्या काव्यभाषेचा आणि नव्या काव्यतंत्राचा आग्रह धरणारा कवींचा एक गट स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दशकात प्रभावी ठरला. ‘स्कॅमन्‌ड्राइट्स’ह्या नावाने तो ओळखला जातो. स्कॅमन्‌डर ह्या त्यांच्या मुखपत्रावरून त्यांना हे नाव पडले. पोलिश कवितेला नवीन वळण देण्याचा प्रयत्न ह्या गटातील कवींनी केला. शहरीपणा (अर्‌बॅनिटी) हे ह्या कवींच्या कवितेचे ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य होते. ह्या कवितेची भाषा, तिच्यातून व्यक्तविले जाणारे अनुभव हे सारे शहरी जीवनाशी निगडित होते. ह्या कवींनी नव्या छंदांची आणि नव्या रचनातंत्रांची निर्मिती केली. यूल्यान टूव्हीम (१८९४–१९५३) हा स्कॅमन्‌ड्राइट कवींपैकी सर्वश्रेष्ठ होय. ‘लर्किंग गॉड’ (१९१८, इं. शी.) आणि ‘द जिप्सी बायबल’ (१९३३, इं. शी.) हे त्याचे दोन उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. ‘द पोलिश फ्लॉवर्स’ (१९४९, इं. शी.) ही त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिलेली दीर्घ कविताही विख्यात आहे. एक प्रचंड भावनिक ताण त्याच्या कवितेतून अभिव्यक्त झालेला आहे. भाषेबाबतची त्याची तीव्र संवेदनशीलताही तीतून व्यक्त होते. मार्या पाव्‌लिकोव्हस्का (१८९५–१९४५) ही कवयित्री ‘पोलिश साफो’म्हणून ओळखली जाते. अभिव्यक्तीचा सुभाषितात्मक नेमकेपणा हे तिच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. काझीम्येश ईलाकोविच (१८९२–   ) हिची तीव्र कल्पना शक्ती तिच्या विमुक्त छंदांतील रचनांतून प्रत्ययास येते. आनतॉनी स्लोनीम्‌‍स्की (१८९५–१९७६) ह्याच्या कवितेत शैली आणि घाट ह्यांचे कलात्मक भान राखलेले दिसते. यान लेचॉन (१८९९–१९५६) ह्याच्या कवितेचे नाते नॉर्व्हिड आणि स्टाफ ह्यांच्या कवितेशी आहे. काझीम्येश व्हेरझिन्यस्की (१८९४–१९६९) ह्याने लिहिलेल्या ‘द ऑलिंपिक लॉरेल’ह्या आपल्या कवितेत क्रीडा, आरोग्य, शरीरसंपदा ह्यांचे गुण गाईले आहेत. व्ह्‌लाडिस्लाव्ह ब्रोनिएव्हस्की (१८९८–१९६२) हा थोर कवी डाव्या विचारसरणीचा होता. श्रमजीवी लोकांच्या समस्या त्याने आपल्या कवितेतून मांडल्या. विसाव्या शतकातील श्रेष्ठ पोलिश कवींत बॉलेस्लाव्ह अलेस्मिन (१८७८–१९३७) ह्याचाही अंतर्भाव होतो. वैचारिका, प्रतीकात्मकता, तसेच कल्पकतेचा आणि नवनिर्मितिशीलतेचा प्रत्यय देणारी शब्दकळा ही त्याच्या कवितेची जाणवणारी वैशिष्ट्ये. तीत काही अभिव्यक्तिवादी प्रवृत्तीही दिसून येतात.

 पोलिश कवितेला क्रांतिकारक वळण लावण्याचा प्रयत्न कवींच्या एका गटाने केला. ‘व्हॅन्‌गार्ड ग्रूप’ (इं. शी.) ह्या नावाने हा गट ओळखला जातो. नवकालवादाचा (फ्यूचरिझम) प्रभाव ह्या गटावर होता. यूल्यान प्शिबोस (१९०१–   ) हा ह्या गटातील एक विशेष उल्लेखनीय कवी. कवितेचे नवे कलात्मक घाट घडविण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिश कवितेच्या रचनातंत्रावर ‘व्हॅन्‌गार्ड ग्रूप’ने काही प्रभाव पाडलेला आहे.


 १९३० नंतर पोलिश गद्य विशेष संपन्न होत गेलेले दिसते. कादंबरीलेखनाच्या क्षेत्रात स्त्रियांची कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. झॉया नालकॉव्हस्का (१८८५–१९५७) हिने आपल्या कथा-कादंबऱ्यांतून स्त्रीमनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. ‘विमेन’ (१९०६, इं. शी.) ‘द रोमान्स ऑफ टेरेसा हेन्नर्ट’ (१९२३, इं. शी.) व ‘द थ्रेड्स ऑफ लाइफ’ (१९४८–५४, इं. शी.) ह्या तिच्या महत्त्वाच्या कादबऱ्यांतून व्यक्तिरेखांचे खोल मनोविश्लेषण करण्याची तिची क्षमता दिसून येते. वास्तववादी पोलिश कांदबरी संपन्न करण्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे. मार्या डाँब्रॉव्हस्का (१८९२–१९६५) हिने, महाकाव्याची भव्यता असलेल्या आपल्या ‘नाइट्स अँड डेज’ (४ खंड, १९३२–३४) ह्या इं. शी.च्या कादंबरीतून सर्वसामान्य पोलिश जनतेच्या १८६३ ते १९१४ ह्या कालखंडातल्या जीवनाचे चित्रण केले. आधुनिक पोलिश साहित्यातील एक अभिजात कृती म्हणून ह्या कादंबरीकडे पाहिले जाते. पोला गोयाविचिंस्का (१८९६–१९६३), मार्या कूनत्सेव्हिचोवा (१८९६–   ) आणि झॉफ्या कोस्साक-श्चूट्स्का (१८९०–१९६८) ह्या अन्य उल्लेखनीय कादंबरीलेखिका होत.

 यूल्यूश काडेन-बानड्रॉव्हस्की (१८८५–१९४४) ह्याने आपल्या कादंबऱ्यांतून सामाजिक आणि राजकीय समस्या हाताळल्या. यारोस्लाव्ह ईवाश्‌क्येविच (१८९४–   ) हा कवी आणि कादंबरीकार. त्याच्यातील कवी त्याच्या कादंबरीलेखनातही प्रकट झालेला आहे. सूक्ष्म निरीक्षणाचे त्याचे सामर्थ्यही त्याच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते. ब्रनो शुल्ट्झ (१८९२–१९४२) ह्याने काफ्का ह्या जर्मन कथा-कादंबरीकाराच्या काही साहित्यकृतींचा पोलिशमध्ये अनुवाद केला होता. शुल्ट्झच्या स्वतःच्या कथात्मक साहित्यकार काफ्काचा प्रभाव दिसून येतो. ⇨ टाडेऊश झेलेन्यस्की (१८७४–१९४१) ह्याच्यावर फ्रेंच साहित्याचा प्रभाव होता. अनेक फ्रेंच साहित्यकृतींचे पोलिश अनुवाद त्याने केले होते. पोलंडमधील बौद्धिक वातावरण आपल्या सामाजिक व वाङ्‌मयीन विषयांवरील लेखनाने त्याने सचेत केले. त्याने केलेली नाट्यसमीक्षाही मोलाची आहे. यान परंडोव्हस्की (१८९५–   ) हा निबंधकार आणि कादंबरीकार. ग्रीस आणि रोम येथील अभिजात संस्कृतीची त्याला ओढ होती. विख्यात आयरिश नाटककार ऑस्कर वाइल्ड ह्याच्या जीवनावर त्याने लिहिलेले ‘किंग ऑफ लाइफ’ (१९३०, इं. शी.) हे नाटक प्रसिद्ध आहे. विटोल्ड गोम्‌ब्रोविच (१९०५–   ) ह्याने लिहिलेल्या एका प्रतिकादंबरीत (अँटीनॉव्हेल) त्याच्यातील उपरोधकार व्यक्त झालेला आहे. नाटकाच्या क्षेत्रात कारॉल हुबर्ट रोस्ट्‌वोरोव्हस्की (१८७७–१९३८) हे एक उल्लेखनीय नाव. सामाजिक–नैतिक समस्यांवरील नाटके त्याने लिहिली. काही पद्यनाटकेही त्याने लिहिली आहेत. स्टानीस्लाव्ह ईग्नाट्सी वीत्‌क्येविच (१८८५–१९३९) हा नाटककार विशुद्ध रूपवादी. आपल्या ह्या विशिष्ट वाङ्‌मयीन दृष्टीला अनुसरून त्याने जी नाटके लिहिली त्यांत वास्तवाशी विपरीत (अँटी-रीआलिस्ट) अशी मांडणी आढळते.

 दुसऱ्या महायुद्धाचा फार मोठा परिणाम पोलिश साहित्यावर झाला. त्या भेदक, ऐतिहासिक अनुभवामुळे नैतिक-वैचारिक संघर्षातून देशाला जावे लागले. १९४५ ते १९४८ ह्या वर्षांतील बरेचसे पोलिश साहित्य युद्धातील अनुभवांशी निगडित आहे. जर्मन वा सोव्हिएट तुरुंगातील आपल्या आठवणी काहींनी लिहून ठेवल्या आहेत. हर्मिनिया नाग्लेरोवा ह्या लेखिकेने लिहून ठेवलेल्या सोव्हिएट रशियाच्या तुरुंगातील आपल्या आठवणी ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. युद्धकाळात पोलिश ज्यूंचे जे हाल झाले, त्यांचे वर्णन आडॉल्फ रुद्नीत्सकी (१९९२–   ) ह्याच्या लेखनातून प्रत्ययकारीपणे आलेले आहे. १९४९ ते १९५५ हा काळ ‘सामाजिक वास्तववादा’चा. कलावंत आणि साहित्यिक ह्यांना सरकारने फार मोठा आधार दिलेला असला, तरी सरकारसंमत धोरणाला अनुसरून कला-साहित्यनिर्मिती करण्याचे दडपण आल्यामुळे ह्या क्षेत्रांत एक प्रकारचा एकसुरीपणा आल्यावाचून राहिला नाही तथापि १९५६ पासून मात्र साहित्याच्या कार्यासंबंधी एक व्यापक जाण दाखविली जात आहे.

‘सामाजिक वास्तववादा’च्या कालखंडातील साहित्यिकांत कॉनस्टांटी इल्डेफॉन्स गाल्‌चींस्की (१९०५–५३), म्येचिस्काव्ह यास्‌त्रुन (१९०३–   ) हे कवी उल्लेखनीय आहेत. गाल्‌चींस्कीच्या कवितेतल्या निर्भय उपरोधामुळे तरुण पिढीला त्याचे आकर्षण होते. अंतर्मुख होऊन तात्त्विक चिंतनात रमण्याची प्रवृत्ती यास्‌त्रुनच्या कवितेत आढळते. दुसऱ्या महायुद्धानंतर जी सामाजिक आणि राजकीय परविर्तने घडून आली, त्यांतून निर्माण झालेल्या तात्त्विक आणि नैतिक प्रश्नांची चिकित्सा येझी आँजेयेव्हस्की (१९०५–   ) ह्याच्या शिस अँड डायमंड्स (१९४८, इं. भा. १९६९) ह्या कादंबरीत दिसते. लेऑन क्रुच्‌कोव्हस्की (१९००–६२) ह्याच्या ‘कॉर्डिअन अंड द बूअर’ (१९३२, इं. शी.) ह्या ऐतिहासिक कादंबरीत त्याच्या मार्क्सवादी विचारसरणीचे प्रतिबिंब पडलेले आहे. ‘द जर्मन्स’ (१९४९, इं. शी.) आणि ‘द फर्स्ट डे ऑफ फ्रीडम’ (१९६०, इं. शी.) ही त्याची नाटके. विविध यूरोपीय देशातून त्यांचे प्रयोग झाले आहेत.

१९५६ नंतरच्या कालखंडातील उल्लेखनीय साहित्यिकांपैकी काझीम्येश ब्रांडिस (१९१६– ), टाडेऊश ब्रेझा (१९०५–  ), स्लावोमीर म्रोझेक (१९३०– ), स्टानीस्लाव्ह येझी लेक (१९०९–  ) झ्बिग्न्यू हर्बर्ट (१९२४–  ), टाडेऊश रुजेव्हिच (१९२१–  ) हे काही होत. ‘द सिटिझन्स’ (इं. शी.) ही ब्रांडिसची प्रसिद्ध कादंबरी. ‘द ब्रॉंझ गेट’ (१९५९, इं. शी.) ह्या निबंधसंग्रहात ब्रेझाने तत्कालीन जीवानाचे व विचारप्रवाहांचे विश्लेषण केले आहे. ‘द टर्की’आणि ‘द पोलिसमन’ (दोन्ही इं. शी.) ही म्रोझेकची दोन नाटके. त्यांचे प्रयोग पोलंडबाहेरही झालेले आहेत. स्टानीस्लाव्ह येझी लेक हा कवी आणि उपरोधकार. हर्बर्टच्या कवितेत बौद्धिकतेचा प्रत्यय येतो. रुजेव्हिचच्या अनेक कवितांतून दुसऱ्या महायुद्धातील दुःखद अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले आहे. आपल्या सर्जनशील अंतःशक्तीचा विकास साहित्याच्या माध्यमातून, विविध प्रयोगांच्या द्वारे करण्यात पोलिश साहित्यिक गुंतले असून त्यांच्या साहित्याबद्दल परदेशीही स्वारस्य निर्माण झालेले आहे.

सोनी, कोवाल्स्का ए. (इं.)

कुलकर्णी, अ. र. (म.) कुलकर्णी अ. र.