स्लॉव्हाट्स्की, यूल्यूश : ( ४ सप्टेंबर १८०९३ एप्रिल १८४९ ). पोलिश कवी आणि नाटककार. जन्म पोलंडमधील क्रेशेमयेन-येट्स येथे. त्याचे वडील प्राध्यापक होते. लिथ्युएनियातील व्हिल्ना येथून कायद्याची पदवी घेतल्यानंतर (१८२९) वॉर्सा येथील कोषागारखात्यात ( ट्रेझरी डिपार्टमेंट ) त्याने नोकरी केली. १८३० मध्ये पोलंडमध्ये झालेल्या उठावानंतर सत्तेवर आलेल्या क्रांतिकारी सरकारने त्याला राजनैतिक कामासाठी लंडनला पाठविले. हे सरकार पडल्यानंतर तो पॅरिसमध्ये राहू लागला. तेथे असतानाच ‘ पोएम्स ’ (दोन भाग, १८३२, इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. कोषागाराशी संबंध संपल्यानंतर ड्रेझ्डेन, लंडन, स्वित्झर्लंड अशा ठिकाणी त्याने वास्तव्य केले. तो स्वित्झर्लंडमध्ये असताना त्याच्या ‘ पोएम्स ’चा तिसरा भाग प्रसिद्ध झाला (१८३३, इं. शी.). १८३७–३८ मध्ये त्याने मध्य पूर्वेचा प्रवास केला. त्यातून ‘ व्हॉयेज टू द होली लँड ’ (१८६६, इं. शी. ) हे त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेले त्याचे कथाकाव्य जन्मास आले. Anhelli (१८३८) ह्या त्याच्या गद्यकाव्यात त्याने पोलंडची राष्ट्रीय वेदना, राष्ट्रासाठी त्याने स्वत: केलेला त्याग आणि भोगलेले दुःख उत्कटपणे प्रकट केलेले आहे. पोलिश साहित्यातील स्वच्छंदतावादाचा तो एक ठळक प्रतिनिधी मानला जातो. संपन्न शब्दकळा, आवाहक प्रतिमासृष्टी आणि कवितेच्या तांत्रिक बाबींवर असलेले प्रभुत्व ही त्याच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

स्लॉव्हाट्स्कीने नाटकेही लिहिली. आधुनिक पोलिश नाटकाचा तो पूर्वसूरी समजला जातो. त्याच्या नाटकाची संविधानके पोलंडचा इतिहास आणि त्या राष्ट्राचा आत्मा यांच्याभोवती फिरताना दिसतात. त्याची नाट्यलेखनशैली स्वच्छंदतावादी, नाट्यभाषा भावगेय, सूक्ष्मार्थसूचक आणि संकुल आहे. त्याच्या आरंभीच्या नाटकांवर मात्र अभिजाततावादी नाट्य-विचाराचा तसेच काही अंशी शेक्सपिअरचा प्रभाव जाणवतो आणि त्याच्या एकंदर नाट्यकृतींचा विचार केला, तर अभिजात ग्रीक नाटके, फ्रेंच स्वच्छंदतावादी नाट्यकृती, स्पॅनिश नाटककार काल्देरॉन असे अनेक प्रभावस्रोत त्यांतून वाहताना दिसतात. Anhelli (१८३४), Balladyna (१८३४), Mazeppa (१८४०), Agezylausz (१८४४) ही त्याची काही नाटके होत.

स्लॉव्हाट्स्कीचे बरेचसे आयुष्य पॅरिस येथे परागंदा अवस्थेत गेले. पॅरिसहून त्याने आपल्या आईला लिहिलेली पत्रे म्हणजे पोलिश गद्याचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

पॅरिस येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.