डॉब्रॉव्हस्की, यॉसेफ : (१७ ऑगस्ट १७५३ – ६ जानेवारी १८२९). चेक भाषाभ्यासक आणि वाङ्‌मयेतिहासकार. जन्म हंगेरीतील ग्यार्मट येथे. जेझुइट धर्मोपदेशक म्हणून पूर्वेकडील देशांत जावयाच्या उद्देशाने धर्मशास्त्र व पौर्वात्य भाषा ह्यांचा अभ्यास त्याने प्राग येथे केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘जेझुइट ऑर्डर’चा मोठ्या प्रमाणावर उच्छेद झाल्यानंतर त्याने आपले सारे आयुष्य विद्याव्यासंगास वाहून टाकले.

चेक राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या चळवळीतील [→ चेक साहित्य] एक अग्रणी आणि स्लॅव्हॉनिक भाषांच्या तौलनिक अभ्यासाचा आद्य प्रवर्तक म्हणून डॉब्रॉव्हस्की ओळखला जातो. Geschichte der bohmischen Sprache und Litteratur  मध्ये (१७९२, सुधारित आवृ. १८१८) त्याने पूर्वकालीन चेक साहित्याच्या संपन्न वारशाकडे विचारकर्त्यांचे लक्ष वेधले. चेक भाषेवर एक उत्कृष्ट ग्रंथ लिहून चेक भाषेच्या नियमसंकेतांचे व्यवस्थितीकरण केले आणि चेक भाषाविकासाच्या संदर्भात मोलाची कामगिरी बजावली. डॉब्रॉव्हस्कीने स्वतःचे लेखन मात्र जर्मन आणि लॅटिन भाषांत केले. Institutiones linguae Slavicae dialecti veteris  (१८२२) हे प्राचीन चर्च स्लॅव्हॉनिकचे व्याकरण लिहून त्याने स्लॅव्हॉनिक भाषांच्या तौलनिक अभ्यासाचा पाया घातला. बरनॉ येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.