माखा, कारेल : (१६ नोव्हेंबर १८१०–५ नोव्हेंबर १८३६). श्रेष्ठ चेक कवी. जन्म प्राग येथे एका गरीब कुटुंबात. प्राग विद्यापीठात त्याने कायद्याचा अभ्यास केला मात्र वकिलीचा किंवा अन्य कोणता व्यवसाय केला नाही. स्वच्छंदतावादी इंग्रज साहित्यिकांचे–विशेषतः वॉल्टर स्कॉट आणि बायरन ह्यांचे–अनुवादित साहित्य त्याने वाचले होते आणि त्याने तो प्रभावित झाला होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चेकोस्लोव्हाकियामध्ये राष्ट्रीय पुनरुत्थानाची जी चळवळ सुरू झाली होती, तीही माखाच्या काव्यनिर्मितीला प्रेरक ठरली. त्याचप्रमाणे बोहीमियात आणि इटलीत त्याने केलेल्या भ्रमंतीचाही त्याच्या कवितेवर परिणाम घडून आला.

‘द मंक’ (१८३२), ‘अ पिल्‌ग्रिमेज टू जायंट माउंटन्स’ (१८३३), ‘पिक्चर्स ऑफ माय लाइफ (१८३४)’ आणि ‘जिप्‌सिज’ (१८३६) – सर्व इ. शी. – ही माखाची काही उल्लेखनीय काव्ये होत. तथापि Maj (१८३६. इं. शी. मे) ही माखाची सर्वश्रेष्ठ काव्याकृती होय. वैश्विक मूल्ये, धर्म, समाज ह्यांविरुद्धचे बंड हा ह्या स्वच्छंदतावादी कथाकाव्याचा विषय. मानवी जीवन, प्रेम, निसर्ग हे सर्व अर्थहीन असून ज्या शून्यातून आपण जन्मलो आणि ज्या शून्यात आपण मृत्यूनंतर विलीन होणार, ते शून्यच तेवढे सत्य आहे, असा निष्कर्ष माखाने ह्या काव्यातून व्यक्तविला आहे. चेक काव्येतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ह्या काव्याकडे पाहिले जाते. समकालीनांनी माखाच्या ह्या काव्याची फारशी दखल घेतलेली नव्हती. तथापि माखाच्या कवितेने प्रभावित झालेल्या काही तरुण कवींनी १८५८ मध्ये Maj ह्याच नावाने वाङ्‌मयीन जर्नल सुरू केले. त्यासाठी लिहिणारे साहित्यिक Maj अथवा ‘मे ग्रूप’ ह्या नावाने ओळखले जात. विसाव्या शतकातील चेक कवी आणि समीक्षकही माखाच्या कवितेकडे आकृष्ट झाले.

कमालीच्या दारिद्र्यामुळे लिटोमेरिस येथे एका वकीलाच्या कचेरीत कारकुनाची नोकरी त्याने पतकरली. तथापि तेथेच, एका महिन्याच्या आत त्याचा अकाली अंत झाला.

देसाई, म. ग.