पालाट्स्की, फ्रांट्यिशेक : (१४ जून १७९८ -२६ मे १८७६). चेक इतिहासकार. हॉड्स्लाव्हिस, मोरेव्हिया येथे जन्मला. त्याचे बरेचसे शिक्षण स्लोव्हाकियात एका प्रॉटेस्टंट शिक्षणसंस्थेत झाले. चेक आणि स्लोव्हाक विचारवंतांनी चेतविलेल्या राष्ट्रीय भावनेचा प्रभाव पालाट्स्कीवर विद्यार्थिदशेतच पडला. आपला वाङ्मयीन-सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याचा साक्षेपी प्रयत्न हे विचारवंत करीत होते आणि स्लाव्हॉनिक बंधुत्वाची कल्पना उदयाला येत होती. आरंभी साहित्य आणि सौंदर्यशास्त्र ह्या विषयांकडे आकर्षित झालेला पालाट्स्की देशभक्तीच्या भावनेतून इतिहासाच्या अभ्यासाकडे वळला आणि पुढे राजकारणातही पडला. १८२३ मध्ये तो प्राग येथे स्थायिक झाला. तेथे १८२७ पासून ‘जर्नल ऑफ द बोहीमियन म्यूझीअम सोसायटी’ (इंग्रजी शीर्षकार्थ) नावाच्या एका नियतकालिकाचे संपादन त्याने केले. त्याचा इतिहासाचा व्यासंग लक्षात घेऊन १८२९ साली बोहीमियाचा अधिकृत इतिहासकार म्हणून त्याची नियुक्ती झाली. बोहीमियाचा आणि मोरेव्हियाचा १५२६ पर्यंतचा विस्तृत इतिहास त्याने १८३२ साली लिहावयास घेतला. पालाट्स्कीकृत बोहीमियाचा इतिहास(१८३६-६७) पंचखंडात्मक असून त्याचा पहिला खंड जर्मन भाषेत लिहिलेला आहे. मोरेव्हियाच्या इतिहासाचेही पाच खंड आहेत (१८४८-७६). स्लाव्ह लोकांचा रोमनांशी आणि जर्मनांशी झालेला संघर्ष आणि घडलेला संपर्क हा पालाट्स्कीच्या मते, चेक इतिहासाचा गाभा होय. विचारस्वातंत्र्यासाठी रोमन कॅथलिक चर्चबरोबर वाद घेऊन हौतात्म्य पत्करणारा चेक धर्मसुधारक ⇨ यान हुस आणि त्याच्या अनुयायांची ‘हुसासट चळवळ’ ही पालाट्स्कीच्या राष्ट्रीय आणि धार्मिक लढ्यांंची प्रतीके वाटत होती. पालाट्स्कीच्या ह्या इतिहासलेखनाने चेक भाषेतील आधुनिक इतिहासलेखनाचा पाया घातला अभिजात चेक गद्यकृती म्हणूनही ते मोलाचे आहे.

तो एक राजकीय विचारवंतही होता. यूरोपमध्ये ऑस्ट्रियाचे संघराज्य अस्तित्वात येण्याची अत्यंत आवश्यकता असून ह्या संघराज्याच्या चौकटीत समान हक्कांच्या तत्त्वावर ऑस्ट्रो-स्लाव्हॉनिक ऐक्य प्रस्थापित झाले पाहिजे, असा विचार त्याने १८४८ मध्ये मांडला होता. रशियनांच्या आणि जर्मनांच्या सततच्या दडपणामुळे त्याला अशा संघराज्याची आवश्यकता भासत होती. त्याच वर्षी प्राग येथे भरलेल्या स्लाव्हॉनिक काँगेसचा तो अध्यक्ष होता. परंतु त्यानंतर मात्र सक्रिय राजकारणातून तो १८६१ पर्यंत निवृत्त झाला. ह्या वर्षी ऑस्ट्रियन पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व त्यास प्राप्त झाले. १८६५ मध्ये संघराज्याचा विचार त्याने पुन्हा मांडला. तथापि त्यात इतिहासकालीन प्रांत एकत्र आणण्याची कल्पना होती. प्राग येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.