नेरुदा, यान : (१० जुलै १८३४–२२ ऑगस्ट १८९१). चेक कवी आणि गद्यलेखक. प्राग येथे जन्मला. शिक्षणही तेथेच झाले. आरंभी काही काळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यानंतर साहित्याकडे व पत्रकारीकडे वळला. विख्यात स्वच्छंदतावादी चेक कवी⇨कारेल माखा ह्याचा प्रभाव पडलेल्या तरुण चेक कवींपैकी यान नेरूदा हा एक प्रमुख कवी होय. माखाच्या Maj (इं. शी. मे) ह्या महाकाव्याचे नाव घेऊन काढण्यात आलेल्या (१८५८) जर्नलमध्ये त्याने लेखन केले.

उत्कट देशभक्ती हे त्याच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य. Zpevy patecni (१८९६, इं. शी. गुड फ्रायडे साँग्ज) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहातून ते प्रकर्षाने प्रत्ययास येते. कॉस्मिक साँग्ज (१८७८), बॅलड्‌स अँड रोमान्सिस (१८८३), प्लेन थीम्स (१८८३) अशा इंग्रजी शीर्षकार्थांचे त्याचे अन्य काही कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत.

नेरुदाच्या गद्यलेखनात Povidky malostranske (१८७८, इं. शी. टेल्स ऑफ द लिट्‌ल कॉर्नर) ह्या नावाने त्याने लिहिलेल्याकथा आणि शब्दचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. प्रागमधील जीवनाचे जिवंत चित्रण त्यांत आढळते. प्राग येथेच तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.