वात्स्यायन : (इ.स.चे तिसरे किंवा चौथे शतक). संस्कृतातील कामसूत्र ह्या ग्रंथाचा कर्ता. ह्याचे नाव मल्लनाग आणि गोत्रनाम वात्स्यायन होते तथापि त्याच्या गोत्रनामानेच तो ख्याती पावला, असे दिसते. अक्षपदाच्या न्यायसूत्रावर भाष्य लिहिणारा वात्स्यायन आणि कामसूत्रकार वात्स्यायन हे एकच असण्याचीही शक्यता व्यक्तविली आहे. अक्षपदाच्या न्यायसूत्रावर वात्स्यायनाने न्यायसूत्रभाष्य लिहिले ह्या भाष्यावर उद्योतकराने न्यायवार्तिक लिहिले व उद्योतकराच्या न्यायवार्त्तिकावर वाचस्पतिमिश्राने न्यायवार्त्तिकतात्पर्यटीका लिहिली. वात्स्यानयाची चरित्रात्मक माहिती फारशी मिळत नाही परंतु कामसूत्रातील एकूण मांडणी आणि माहिती पाहिल्यास तो पश्चिम वा दक्षिण भारतीय असावा, असा एक तर्क केला जातो. द्रामिल आणि पक्षिलस्वामी ह्या नावांनीह हा ओळखला जातो. ह्या दोन नावांपैकी द्रामिल हे नाव तो दक्षिणेकडील असल्याचे सूचित करते.

वात्स्यायनाच्या कामसूत्रात कामविषयक विचारांचा सांगोपांग परामर्श घेतलेला आहे. पुढे लिहिल्या गेलेल्या कामशास्त्रविषयक अनेक ग्रंथांना आधारभूत असलेल्या ह्या प्राचीन ग्रंथावर यशोधराने (तेरावे शतक) लिहिलेली जयमंगला ही टीका प्रसिद्ध आहे.

वात्स्यायनकृत कामसूत्राचे रिचर्ड बर्टन आणि एफ्. एफ्.आर्बथनटकृत पहिले इंग्रजी भाषांतर व पहिली इंग्रजी आवृत्ती द कामसूत्र ऑफ वात्स्यायन १८८३ मध्ये प्रसिद्ध झाली. तीत मूळ संस्कत ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद सात भागांत देण्यात आलेला आहे. ह्या आवृत्तीस सर रिचर्ड बर्टन आणि एफ्. एफ्. आर्बथनट ह्यांनी प्रस्तावना लिहिली. अनुवादकांचे नाव मात्र ह्या पुस्तकाच्या पहिल्या आणि नंतर निघालेल्या दोन आवृत्त्यांतही दिलेले नव्हते. एस्. सी. उपाध्याय ह्यांनी केलेला कामसूत्राचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध आहे. ह्या ग्रंथाचा फ्रेंच अनुवाद प्रथम १८८५ साली, तर जर्मन अनुवाद प्रथम १९०७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हिंदी भाष्यासह संस्कृत संहिता प्रथम १९२९ मध्ये प्रकाशित झाली. बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री ह्यांनी ह्या ग्रंथाचा मराठी अनुवाद जयमंगला ह्या टीकेच्याही अनुवादासह प्रसिद्ध केला (श्रीवात्स्यायनमुनिप्रणीत कामसूत्रम्-प्रथम भाग, १९३८). ह्या पहिल्या भागात कामसूत्रातील एकूण सात अधिकरणांपैकी १ ते ४ संपूर्णपणे अनुवादिलेली आहेत. ह्या ग्रंथाचे गुजराती भाषांतरही झाले आहे (१९३९).

संदर्भ : Annda, Mulk Raj Dane, Lance ed., Kamsutra of Vatsyayan, New Delhi, 1982.

 

कुलकर्णी, अ. र.