स्प्रिंग फील्ड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इलिनॉय राज्याच्या राजधानीचे ठिकाण व सँगमन परगण्याचे मुख्यालय. लोकसंख्या १,५३,५५२ (२०१२). राज्यातील एक आर्थिक, विमा व वैद्यक-विषयक महत्त्वाचे व्यापारकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर राज्याच्या मध्यवर्ती कोळसाक्षेत्रात, सँगमन नदीकाठावर वसलेले असून ते शिकागोच्या नैर्ऋत्येस २९८ किमी. वर आहे. अमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याची कर्मभूमी असलेल्या या शहराच्या जागी इ. स. १८१८-१९ मध्ये एलिश केली याने पहिली चौकी उभारली होती. आजही ती शहरातील क्लेइन व जेफर्सन मार्ग मिळतात त्या जागी आहे. येथून जवळच असलेल्या स्प्रिंग क्रीक या छोट्या प्रवाहाच्या नावावरून याला स्प्रिंगफील्ड हे नाव देण्यात आले. १८२१ मध्ये हे सँगमन परगण्याचे मुख्यालय करण्यात आले. १८३२ मध्ये याला शहराचा, तर १८४० मध्ये महा नगराचा दर्जा देण्यात आला. १८३७ मध्ये अब्राहम लिंकन व इलिनॉयच्या विधानमंडळातील अन्य आठ सदस्यांच्या (हे सर्व ङ्कलाँग नाईनङ्ख म्हणून ओळखले जात होत) प्रयत्नांमुळे राज्याच्या प्रशासनाचे ठिकाण म्हणून हे शहर जाहीर करण्यात आले. १८३९ मध्ये प्रशासकीय कार्यालये व्हँडेल्या येथून स्प्रिंगफील्ड येथे हलविण्यात आली. त्यानंतर येथील लोकसंख्या व उद्योगधंदे यांची झपाट्याने वाढ होत गेली. लिंकननेही आपले वास्तव्य १५ एप्रिल १८३७ रोजी न्यू सेलम येथून स्प्रिंगफील्ड येथे हलविले व पुढे राष्ट्राध्यक्ष होईपर्यंत (१८६१) तो येथेच राहिला होता. या काळात त्याने येथे वकिलीचा व्यवसाय केला होता.

राज्याच्या शेतीप्रधान व कोळसाक्षेत्रात असलेले हे शहर व्यापार, कारखानदारी व विविध मालाचे वितरण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेती अवजारे, अन्नपदार्थ, कापड, तंबाखू व सोयाबीनची उत्पादने, मोटारींचे सुटे भाग, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिकी व विद्युत् उपकरणे, विटा व इतर बांधकाम साहित्य, विविध प्रकारचे रंग, मापके, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचे निर्मिति उद्योग येथे विकसित झाले आहेत. यांशिवाय परिसरातील शेतमालाचे (मका, गहू, सोयाबिन इ.) हे घाऊक व किरकोळ विक्रीकेंद्र असून येथे गुरांचाही मोठा व्यापार चालतो. १९३४ मध्ये बांधण्यात आलेल्या लेक स्प्रिंगफील्ड या जलाशयातून शहरास पाणीपुरवठा केला जातो. शहरात अनेक राष्ट्रीय विमा कंपन्यांची कार्यालये आहेत. येथे १८९३ पासून दरवर्षी इलिनॉय राज्यमहोत्सव भरतो. शहरात स्प्रिंगफील्ड कॉलेज (१९२५), लिंकन लँड कम्युनिटी कॉलेज (१९६९), सँगमन स्टेट युनिव्हर्सिटी (१९७०) इ. उच्च शिक्षणसंस्था आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील जॅक्सन मार्गावरील लिंकनचे निवासस्थान, अमेरिकन कवी व्हॅचेल लिंड्से याचे निवासस्थान या राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यात आल्या आहेत. शहराजवळच असलेल्या ङ्कओक रिज सेमेटरीङ्ख येथे लिंकन, त्याची पत्नी व तीन मुले यांचे दफन करण्यात आले असून तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे (१८७४). या स्मारकाचा आकृतिबंध प्रसिद्ध अमेरिकन शिल्पकार एल्. जी. मीड याने तयार केला आहे. शहराच्या वायव्येस सु. ३२ किमी.वरील न्यू सेलम हे गाव ङ्कलिंकन्स न्यू सेलम स्टेट हिस्टॉरिकल साइटङ्ख म्हणून नव्याने उभारण्यात आले आहे. यांशिवाय शहराच्या आग्नेय भागातील द लिंकन मेमोरियल गार्डन अँड नेचर सेंटर, यादवी युद्धकाळात तुरुंग म्हणून वापरण्यात आलेले कँप बटलर नॅशनल सेमेटरी, लिंकन कुटुंबियांचे प्रार्थनास्थळ असलेले प्रेस्बिटेरियन चर्च, रेनेसान्स शैलीतील कॅपिटॉल (१८६७–८७), सध्या राज्य ऐतिहासिक ग्रंथालय असलेली जुन्या कॅपिटॉलची वास्तू, स्टेट आर्ट गॅलरी, लिंकनच्या जीवनपटाशी निगडित असलेली अनेक संग्रहालये, गव्हर्नरची हवेली (१८५३–५७), शहराच्या परिसरातील अनेक बागा व सरोवरे ही येथील प्रेक्षणीय व पर्यटन स्थळे आहेत. महापौर परिषदेमार्फत शहराचा प्रशासकीय कारभार चालतो.

चौंडे, मा. ल.