त्रिवेदी, विष्णुप्रसाद रणछोडलाल : (४ जुलै १८९९– ). गुजरातीतील प्रसिद्ध साहित्यसमीक्षक. खेडा जिल्ह्यातील उमरेठ या गावी जन्म. मुंबई विद्यापीठातून १९२३ मध्ये एम्‌. ए. झाल्यावर ते सुरत येथील एम्‌. टी. बी. महाविद्यालयात गुजरातीचे व इंग्रजीचे प्राध्यापक (१९२१–६१) होते. १९६०–६६ ह्या काळात ते सुरत येथील विद्याभवनाचे संचालक होते.

पाश्चात्त्य व भारतीय साहित्यशास्त्रांचा त्यांचा व्यासंग सखोल आहे. त्यांची समीक्षा प्रामुख्याने सैद्धांतिक स्वरूपाची असून, तीत भारतीय व पाश्चात्त्य समीक्षातत्त्वांचा समन्वय साधलेला दिसतो. काव्यप्रयोजन, काव्यनिर्मिती, काव्यप्रतीके इ. काव्यांगांचे तसेच गोवर्धनरामांच्या साहित्याचे त्यांनी आपल्या समीक्षेत मूलगामी विवेचन केले आहे. विवेचना (१९३९), परिशीलन (१९४९), अर्वाचीन चिंतनात्मक गद्य (१९५०), उपायन (१९६१), गोवर्धनराम (१९६२) हे त्यांचे समीक्षाग्रंथ होत. उपायनला १९६३ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. रणजितराम सुवर्णचंद्रक आणि नर्मद सुवर्ण पदकाचेही ते मानकरी आहेत. साहित्य अकादेमीचे अधिछात्र (१९७४) तसेच गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष (१९६२–६३) होण्याचाही बहुमान त्यांना प्राप्त झाला. १९७१ मध्ये सुरत येथील दक्षिण गुजरात विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डी. लिट्‌. देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

पेंडसे, सु. न.