बॉस्‌वेल, जेम्स : (२९ ऑक्टोबर १७४० – १९ मे १७९५). स्कॉटिश लेखक व विख्यात इंग्रज साहित्यिक सॅम्युएल जॉन्सन ह्याचा चरित्रकार. जन्म एडिंबरोत. त्याचे वडील न्यायाधीश होते. एडिंबरो, ग्लासगो आणि उत्रेक्त येथे त्याने कायद्याचा अभ्यास केला. १७६६ मध्ये त्याला वकिलीची सनद मिळाली. वकिलीचा व्यवसायही त्याने केला तथापि त्या व्यवसायापेक्षा वाङ्‌मयाकडेच त्याची ओढ अधिक होती. १७६३ मध्येच सॅम्युएल जॉन्सनशी त्याची ओळख झाली होती. ह्या ओळखीचे रूपांतर पुढे गाढ मैत्रीत झाले. जॉन्सनला भेटण्यासाठी तो एडिंबरोहून लंडनला येऊ लागला. जॉन्सन आणि अन्य साहित्यिक ह्यांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध ‘लिटररी क्लब’चे सदस्यत्व बॉस्‌वेलला १७७३ मध्ये मिळाले. १७८४ मध्ये जॉन्सनचे निधन झाल्यानंतर बॉस्‌वेलने जॉन्सनचे चरित्र लिहावयास घेतले. १७८६ मध्ये तो लंडनला आला आणि तेथेच स्थायिक झाला. तेथे त्याचा वकिलीचा व्यवसाय फारसा चालला नाही. तेथे आपला बहुतेक वेळ त्याने जॉन्सनच्या चरित्रलेखनात घालविला. लंडन येथेच तो निधन पावला.

बॉस्‌वेलकृत जॉन्सनचरित्र द लाइफ ऑफ सॅम्युएल जॉन्सन एल्-एल्.डी. ह्या नावाने १७९१ मध्ये प्रसिद्ध झाले. ह्याच चरित्राचा एक भाग म्हणून त्याने द जर्नल ऑफ ए टूर टू द हेब्रिडीझ विथ सॅम्युएल जॉन्सन एल्‌एल्.डी हे आपले प्रवासवर्णन १७८५ मध्ये प्रसिद्ध केले होते. हेब्रिडीझमध्ये जॉन्सनबरोबर व्यतीत केलेल्या १०१ दिवसांचा वृत्तांत ह्या पुस्तकात आहे. मनोवेधक निवेदनशैली हे ह्या पुस्तकाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. जगातील उत्कृष्ट चरित्रग्रंथात बॉस्‌वेलच्या जॉन्सनचरित्राचा अंतर्भाव करण्यात येतो. इतकेच नव्हे, तर काही अभ्यासकांच्या मते हे चरित्र म्हणजे चरित्रलेखनाच्या जागतिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. उत्तम चरित्रलेखनाचा एक आदर्शच बॉस्‌वेलने निर्माण केला आणि उत्तरकालीन अनेक चरित्रकारांनी बॉस्‌वेलच्या चरित्रलेखनपद्धतीचे कमीअधिक प्रमाणात अनुकरण केलेले दिसते. जॉन्सनच्या व्यक्तिमत्त्वाचे जिवंत चित्र बॉस्‌वेलने त्याच्या ह्या चरित्रग्रंथात रेखाटले आहे. हा चरित्रग्रंथ घडविण्यासाठी त्याने परिश्रमपूर्वक साधनसामग्री गोळा केली ती प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मांडली. विविध घटनांतील नाट्य नेमके हेरणारी त्याची मार्मिक कलादृष्टीही ह्या चरित्रग्रंथातून प्रत्ययास येते. जॉन्सनबद्दल बॉस्‌वेलला नितांत आदर वाटत असला, तरी ह्या ग्रंथाला त्याने विभूतिपूजेचे स्वरूप येऊ दिले नाही. आपण स्तुतिगाथा निर्माण करीत नसून एक जीवनचित्र रेखाटत आहोत जॉन्सन हा थोर पुरुष असला, तरी तो पूर्णत्व पावला होता असे समजता कामा नये, अशा आशयाचे उद्‌गार बॉस्‌वेलने काढलेले आहेत.

बॉस्‌वेलच्या ह्या ग्रंथाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. आपल्या हयातीतच–१७९३ साली-त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेली त्याने पाहिली. तथापि ह्या ग्रंथाचे कौतुक करीत असताना, बॉस्‌वेलला मात्र सामान्य लेखून त्याच्यासारख्या माणसाने हा ग्रंथ लिहावा, ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्रजी समीक्षेत बॉस्‌वेलबाबत हाच दृष्टिकोण प्राधान्याने राहिला तथापि आता तो स्वीकारला जात नाही. बॉस्‌वेल हा स्वतःही एक वाङ्‌मयीन कलावंत होता, हे आता मान्य झालेले आहे.

बॉस्‌वेलच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्याच्या अन्य लेखनात ॲन अकाउंट ऑफ कॉर्सिका ……………….(१७६८) ह्या त्याच्या प्रवासवर्णनाचा समावेश होतो. कॉर्सिकाला त्याने भेट दिली होती आणि त्या वेळी जेनोआच्या सत्तेखाली असलेल्या कॉर्सिकनांचा स्वातंत्र्यलढा जनरल पाओली ह्याच्या नेतृत्वाखाली चालू होता. ह्या लढ्याविषयी बॉस्‌वेलला सहानुभूती होती. पाओलीचे व्यक्तिचित्र ह्या पुस्तकात त्याने प्रभावीपणे उभे केले आहे. बॉस्‌वेलच्या ह्या पुस्तकाला चांगली प्रसिद्धी मिळाली. फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि डच भाषांतून त्याचे अनुवादही झाले. बॉस्‌वेलचे काही अप्रसिद्ध लेखन विसाव्या शतकात उपलब्ध झाले. जेफ्री स्कॉट आणि एफ्.ए. पॉटल ह्यांनी ते संपादून अठरा खंडांत प्रसिद्ध केले आहे (१९२८-३४). बॉस्‌वेल्स लंडन जर्नल १७६२-६३ (१९५१), बॉस्‌वेल इन हॉलंड १७६३-६४ (१९५२) ह्यांचा त्यांत अंतर्भाव होतो. बॉस्‌वेलला राजकारणात रस होता पण त्या क्षेत्रात त्याला काही स्थान मिळवता आले नाही.

संदर्भ : 1. Abbott, C. Colleer, Boswell, Newcastle, England, 1946.

2. Collins, Philip A. W. James Boswell, New York, 1956.

3. Hill, G. B. Ed. Life of Johnson and Journal of a Tour to the Hebrides, 6 Vols., Oxford, 1887 rev. and enlarged edition by Powell, L. F. 1934-50.

4. Pottle, F. A. James Boswell, the Earlier Years 1740-69, London, 1966.

5. Pottle. F. A. The Literary Career of James Boswell, Esq., Oxford 1929.

6. Tinker C. B. Young Boswell, Boston, 1922.

7. Wyndham Lewis, D. B. The Hooded Hawk, New York, 1946, reprinted as James Boswell, London, 1952.

कुलकर्णी, अ. र.