एंग्‍लर, (हाइन्‍रिक गुस्टाफ) आडोल्फ : (२५ मार्च १८४४–१० ऑक्टोबर १९३०). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतींचे वर्गीकरण व वनस्पति-भूगोल यांसंबंधी महत्त्वाचे काम. त्यांचा जन्म झागान येथे झाला. ते ब्रेस्लॉमध्ये (१८६६-७७) प्रथम शिक्षक व नंतर क्रमाने म्यूनिकमध्ये (१८७१–७८) वनस्पतिसंग्रहालयाचे प्रमुख, तसेच कील (१८७८–८४), ब्रेस्लॉ (१८८४–८९), बर्लिन (१८८९–१९२१) इ. ठिकाणी प्राध्यापक होते. डालेम येथील बर्लिन शास्त्रीय उद्यानाचे व वस्तुसंग्रहालयाचे संचालक असताना त्यांनी स्वतः, त्यांचे सहकारी व शिष्य यांनी प्रसिद्ध केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रबंधांचा आणि वनस्पतिवर्णनात्मक प्रकाशनांचा वर्गीकरणात्मक वनस्पतिविज्ञानावर मोठा प्रभाव पडला.सॅक्सिफ्रागा वंश, ⇨ ॲरेसी, ⇨ बर्सेरेसी इ. कुले व अनेक आफ्रिकी वंश यांसंबंधीचे संशोधनात्मक निबंध त्यांनी प्रसिद्ध केले. ए. डब्ल्यू. ऐक्लर (१८३९–८७) यांच्या वनस्पतींच्या वर्गीकरण पद्धतीवर आधारलेले पण स्वतःच्या वर्गीकरण पद्धतीने वनस्पतिसृष्टीचे बहुमोल सर्वेक्षण करून त्यांनी कार्ल फोन प्रँट्ल (१८४९–९३) व इतर तज्ञांच्या साहाय्याने Die Naturlichen Planzen Familien (१८८७–९९) हा ग्रंथ संपादित केला. याशिवाय जर्मन भाषेतील वनस्पतीविषयक आणखी पाच प्रमुख ग्रंथांचे ते लेखक वा संपादक होते. त्यांनी जगप्रवास करताना आफ्रिका, भारत, जावा, उ. अमेरिका, रशिया, जपान इ. प्रदेशांना भेटी दिल्या. ते डालेम येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.